सायबर गुन्हे साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
सायबर गुन्हे साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज व जे.एस.एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड – अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हे साक्षरता व विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे यशस्वी आयोजन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व ॲड. नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांनी केले तर प्रा. श्वेता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. संदीप घाडगे,प्रा. डॅा.प्रेम आचार्य, प्रा. पियुषा पाटील प्रा.कौशिक बोडस, प्रा.सुरज पुरी, प्रा. विनायक साळुंखे , प्रा. हर्षला महाजन ,विधी सहाय्य बचाव पक्ष वकिल प्रणालीचे प्रमुख श्री.सी.सी.कामथे, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य तसेच व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती आर. जी. नदाफ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे–अलिबाग यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जी.डी.पीच्या १०% आहे अशी माहिती दिली.मोबाईल वापरातील अटी–शर्ती काळजीपूर्वक वाचणे, अज्ञात ॲप्स व लिंक डाउनलोड न करणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणवर्ग सायबर गुन्ह्यांना सर्वाधिक बळी पडत असल्याने विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर पोलीस हवालदार श्री. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांबद्दल प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. मोबाईल सिम कार्ड फसवणूक, ई-केवायसी, क्रेडिट व आधार कार्ड फसवणूक, डिजिटल अरेस्ट, इन्स्टंट लोन ॲप्स तसेच WhatsApp Privacy यासंबंधी त्यांनी माहिती दिली. त्यांनी NCCRP पोर्टलवर 1930 व 1945 या क्रमांकांवर तात्काळ तक्रार नोंदविता येते, CEIR पोर्टलच्या माध्यमातून चोरीचा मोबाईल शोधता किंवा ब्लॉक करता येतो, TAFCOP द्वारे स्वतःच्या नावावर किती सिम कार्ड आहेत याची माहिती मिळते, संचार साथी पोर्टलमधून मोबाईल चोरीचा आहे का याची पडताळणी करता येते तसेच जुना फोन खरेदी करताना तो चोरीचा आहे की नाही हे तपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येकाने CyberDost I4C WhatsApp चॅनल फॉलो करून सायबर सुरक्षेबाबत सतत अपडेट राहावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधावा असे ठामपणे सांगितले.
विधी सहाय्य बचाव पक्ष वकील प्रणालीच्या सहाय्यक मा. ॲड. निलोफर शेख यांनी भारतीय साक्ष अधिनियम २०२३, माहिती तंत्रज्ञान अधिनियम व इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टमधील सुधारणा सविस्तर समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.



