“पुरवावाच लागतो तो …बालहट्ट”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“पुरवावाच लागतो तो …बालहट्ट”; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
पौराणिक म्हणी किंवा वाड़्मयीन अभ्यासानुसार हट्टाचे प्रमुख तीन प्रकार मानले जातात. राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बालहट्ट. असे म्हटले जाते की हे तिन्ही हट्ट पूर्ण करावेच लागतात. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता असेलही तथ्य कारण तेव्हा राजेशाही होती. असो तर आज आपण बोलणार आहोत बालहट्ट या विषयावर.
बालहट्ट म्हणजे काय? तर लहान मुलांचा गोड किंवा निरागस हट्ट, जिद्द किंवा मागणी. मराठी भाषेत हा शब्द कथा, कविता आणि वाक्प्रचारांमध्येही वापरला जातो. कथांचा विचार करता अकबर बिरबलाची कथा, श्रीराम प्रभूची कथा, हनुमानाचा बालहट्ट अशा पुरातन कथा ऐकायला ,वाचायला मिळतात. प्रसिद्ध वाक्प्रचार असा आहे की ,”बालहट्ट ,स्त्रीहट्ट व राजहट्ट हे पुरविल्याशिवाय माणसाला गत्यंतर नसते.” या म्हणीनुसार बालहट्ट पूर्ण करणे किती अत्यावश्यक आहे हे सांगितले गेले आहे. जोपर्यंत बालक निरागस असते, त्याला योग्य अयोग्य तेची जाण नसते, तोपर्यंतच त्याचे हट्ट हे बालहट्ट असतात. पण अतिलाड आणि हवे ते पुरवण्याची पालकांची धडपड यामुळे बालकांच्या हक्काचे रूपांतर विकृतीत होण्यास वेळ लागत नाही. आवश्यक त्या ठिकाणी त्यांना “नकार” देणे आणि त्यांना “नकराचे समायोजन” करण्यासाठी त्याला मदत करणे आजच्या काळाची गरज बनली आहे.
योग्य- अयोग्य गोष्टी समजावून सांगता येणे आणि त्यांना ऐकण्याची सवय लावणे ही पालकांची महत्त्वपूर्ण जिम्मेदारी बनली आहे. आजचे वातावरण पाहता लहान लहान मुलांमध्येही आत्महत्येचे प्रमाण बळावताना दिसत आहे आणि याला कारणीभूत कुठे न कुठे पालकांचे फाजील लाड आहेत हे कुठेतरी मान्य करणे आवश्यक आहे.
लहानपणापासूनच आपणाला प्रत्येक गोष्ट मिळू शकत नाही ही भावना जर बालकांच्या मनात रुजवली गेली तर त्यांना अपयश, नकार, तिरस्कार या गोष्टी पचवायला अवघड जात नाहीत. पालकांना मूल मोठे झाले तरी लहानच असते पण आपल्या मुलाचे वय, समज, मागण्या, आवश्यकता त्यानुसार त्यांच्यात समायोजन घडवून आणले तर नक्कीच पश्चातापाची वेळ पालकांवर येणार नाही. शेवटी संस्कार महत्त्वाचे! असो, गोंडस प्रेमळ ,निरागस बालहट्टाचे नेहमीच स्वागत! आणि हे बालहट्ट पुरवण्यासाठी घरात आजी आजोबा हवेत बरं!
आज ‘आम्ही बालकवी’ समूहामध्ये स्पर्धेसाठी ‘बालहट्ट’ हा विषय राहुल दादांनी दिला आणि समूहामध्ये ‘बालहट्ट’वर मोजक्याच का होत नाहीत पण काही कविता पाहायला मिळाल्या. बालकाव्य कसे असावे याविषयी वारंवार समूहामध्ये टिप्पणी केली जाते. शिलेदारांनी नक्कीच त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यानुसार कविता लिहिण्याचा प्रयत्न करावा. काही कविता या कविताच आहेत का? किंवा बालकाव्यामध्ये येतात का? हा प्रश्न मनाला भेडसावून जातो. तर असो अभ्यासपूर्ण बालकाव्य लेखनासाठी बालकवी शिलेदारांना भरभरून शुभेच्छा! स्पर्धेचा वार सोडून इतरही दिवसांत लेखन होणे आवश्यक वाटते.असो,चला तर मग जावूया आईकडे एखादा बालहट्ट करायला….!! मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः ऋण!!! धन्यवाद!!!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
सहप्रशासक /मुख्यपरीक्षक/
संकलक मराठीचे शिलेदार समूह



