
0
6
5
6
0
4
दुष्काळात थंडी
“आभाळ कोरडे, जमीन भेगाळली,
विहिरीनेही मान टाकली, “
“थंडी आली दारापाशी,
भाकरी मात्र घर विसरली!”
“शेकोटी पेटवावी कशी?
चूलच पडली थंडगार,”
“पोटात भुकेचा वणवा,
अंगावर बोचरा गारठा फार!”
“शेतकऱ्याच्या फाटक्या शालीला,
थंडी कुठे अडवता येते?”
“कर्जाच्या ओझ्याखाली,
रात्र डोळ्यांतच सरते!”
“गुरांच्या रिकाम्या गोठ्यात,
हंबरडा घुमतो रात्री, “
“चारा नाही, पाणी नाही
कशी काढावी पहाट तरी?”
“थंडीचा दोष कुणाला द्यावा,
दुष्काळाने आधीच छळले,”
“घाम गाळणाऱ्या हातांना,
नशिबाने उपाशी ठेवले!”
हणमंत गोरे
ता :सांगोला, जि सोलापूर
0
6
5
6
0
4



