Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांचा उदय

सौ.सविता पाटील ठाकरे सिलवासा, दादरा नगर हवेली

0 5 5 8 5 6

महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांचा उदय

महाराष्ट्राच्या मातीमध्ये शब्दांचे बीज फार पूर्वीच रोवले गेले होते; पण त्यांना अंकुर फुटला तो संतांच्या करुणामय स्पर्शाने. सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या वाऱ्यांनी जेव्हा लोकजीवनाची वेदना ऐकली, तेव्हा त्या वेदनांना शब्दरूप देण्यासाठी मराठीने आपले कोंदण उघडले. त्या काळोखात, जिथे ज्ञान केवळ ग्रंथांच्या कडांमध्ये अडकून पडले होते, तिथे संत ज्ञानेश्वर यांनी प्रकाशाची पहिली ज्योत पेटवली. त्यांच्या ओव्या म्हणजे, जणू चांदण्यांची शिडकावणी. सामान्यांच्या आयुष्यावर अलगद पसरत जाणारी. त्या प्रकाशवाटेने चालत संत नामदेव यांच्या भक्तिरंगांनी आकाश अधिकच रंगले, संत एकनाथ यांच्या विचारगंगेला विस्तार मिळाला आणि संत तुकाराम यांच्या अभंगांनी माणसाच्या अंतःकरणातली अस्वस्थता शब्दांना सापडली.

मराठी भाषा तेव्हा केवळ बोलण्याचे साधन नव्हती. ती झाली होती भावनांची वीणा, जिच्या प्रत्येक तारेतून समाजाचे स्पंदन ऐकू येत होते. शब्द फुलांसारखे उमलत होते, आणि विचार त्यांच्या सुगंधासारखे सर्वदूर दरवळत होते. काळाच्या ओघात हीच भाषा अधिक प्रगल्भ झाली. तिच्या कुशीतून नवे साहित्यिक जन्माला आले, नवे विचार आकाराला आले. पण त्या प्रत्येक शब्दामागे, प्रत्येक वाक्यामागे, संतांच्या त्या पहिल्या स्पर्शाची उब कायम राहिली. म्हणूनच ‘मराठी साहित्याचा उदय’ हा केवळ इतिहासातील एक टप्पा नाही; तो आहे एका संस्कृतीचा आत्मोदय. जिथे शब्दांना आत्मा लाभतो आणि भाषेला हृदय. संत साहित्यामुळे मराठी भाषा केवळ बोलभाषा न राहता एक प्रभावी साहित्यभाषा बनली. पुढे काळानुसार मराठी साहित्याचा विस्तार झाला आणि विविध विषयांवर लेखन होऊ लागले. अशा प्रकारे संतांच्या कार्यातून आणि लोकाभिमुख विचारांमुळे महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांचा उदय झाला, ज्याने पुढील साहित्यिक पिढ्यांसाठी भक्कम पाया घातला..

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली मराठी साहित्याची परंपरा ही केवळ शब्दांची नव्हे, तर संस्कृती, विचार आणि भावनांची अखंड वाहणारी गंगा आहे. संतांच्या अभंगातून, कवींंच्या ओव्यातून आणि लेखकांच्या लेखणीतून उलगडत गेलेली ही परंपरा आजही तितक्याच तेजाने उजळत आहे. मराठी साहित्यिकांचा उदय हा केवळ ऐतिहासिक घटना नसून तो समाजमनाचा आरसा आहे,जो काळानुसार बदलतो, पण त्याची मुळे मात्र कायम खोलवर रुजलेली राहतात. या साहित्यिकांनी आपल्या लेखणीने समाजाला दिशा दिली, विचारांना चालना दिली आणि मानवतेचा दीप सदैव प्रज्वलित ठेवला. म्हणूनच, मराठी साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित न राहता, जीवनाचा अर्थ सांगणारे, मनाला स्पर्श करणारे आणि आत्म्याला समृद्ध करणारे एक अमूल्य दान ठरते. “शब्दांतून फुलली भावना, लेखणीतून उमलला विचार, मराठी मातीचा सुवास घेऊन, साहित्य झाले साकार”, काळाच्या ओघातही न विझणारी ही ज्योत ज्ञानदीपाची; साहित्यिकांच्या कर्तृत्वाने उजळली ओळख अनमोल महाराष्ट्राची…!!

सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
कार्यकारी संपादक ‘सा. साहित्यगंध’
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 8 5 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे