तापोळा ‘मिनी काश्मीर’
स्वाती मराडे-आटोळे
तापोळा ‘मिनी काश्मीर’
निसर्ग प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो आणि हाच निसर्ग अनुभवायचा असेल तर ‘तापोळा’ सारख्या रम्य ठिकाणी आवर्जून जावे. हे ठिकाण इतकं सुंदर आहे की अनेकजण त्याला महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून संबोधतात. सर्वच ऋतूत येथील जीवसृष्टी, झाडे, जलाशय पाहून प्रत्येकाचं भान हरपतं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील महाबळेश्वरनजीक असणारं तापोळा. पर्यटनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या महाबळेश्वरपासून काही अंतरावर असणारं हे गाव पाहताना, बोटींग करताना आपण खरंच काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असल्याची जाणीव होते. काश्मीरच्या दल सरोवर आणि झाबरवान पर्वतांप्रमाणेच शिवसागर सरोवराकडे दिसणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांच्या निसर्गरम्य दृश्यांमुळे तापोळाचे ‘मिनी काश्मीर’ हे टोपणनाव आहे.
येथील तलावात तुम्हाला नौकाविहाराचा आनंद घेता येतो. हा तलाव शिवसागर तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या 90 किमी बॅकवॉटर विस्ताराचा भाग आहे. येथे शिवसागर जलाशय पाहण्यासाठी बोटींगची व्यवस्था आहे. वेळेनुसार व बोटींग प्रकारानुसार वेगवेगळी फी असते. येथे तीन तासाची एक बोट राईड पण आहे ज्यात तीन नद्यांचा संगम, दत्त मंदिर आणि बामणोली बेट असं दाखवतात. यासाठी साधारण तीन तास. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांना इथं जयगड, वासोटा किल्ल्यास भेट देता येते. निसर्गाच्या सान्निध्यात तंबूमध्ये राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तरीही तापोळ्याला येऊन तुमची ही हौसही भागवता येते.
बोटिंग, ट्रेकिंग, कयाकिंग आणि बरेच काही ऑफर करणारे तापोळा हे निसर्गप्रेमींसाठी आश्रयस्थान आहे. महाबळेश्वरपासून सुमारे २५ किमी अंतरावर, आणि पुण्यापासून १५० किमी अंतरावर, सातारा जिल्ह्यातील तापोळ्यापर्यंतच्या प्रवासात प्रवाशांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विहंगम दृश्य पाहता येते. तापोळाजवळ अनेक लहान बेटे वसलेली आहेत जिथे तुम्ही संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारू शकता आणि सूर्यास्ताच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. ज्यांना कृषी पर्यटनाची आवड आहे त्यांच्यासाठी येथे स्ट्रॉबेरीची शेते आहेत. इथे जाऊन तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकता. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरातून तापोळ्याला अगदी सहजपणे पोहोचता येतं. स्वतःच्या किंवा खाजगी वाहनानं वाई, तायघाटमार्गे पाचगणी ओलांडून तापोळा गाठू शकता. एसटी किंवा खाजगी बसनंही महाबळेश्वरपर्यंत येत पुढं लहान वाहनांनी तापोळा गाठता येतो.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
===========



