“ध्येयाने प्रेरित झालेल्यांची एकी झाली, तरच कर्तृत्वाचा गंध पसरेल”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“ध्येयाने प्रेरित झालेल्यांची एकी झाली, तरच कर्तृत्वाचा गंध पसरेल”; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
अस्ताव्यस्त विखुरलेले मोती एकत्र केले नि एका धाग्यात ओवले. मोती एकत्र गुंफले नि सुंदर मोतीहार तयार झाला. समविचारी धाग्याने सर्वांना एकत्र बांधून ठेवले नि एक होऊन वागले, तर नात्यातील देखणेपणही वाढते हे मनोमन पटले. एकाच कुटुंबात असणारे मतभेदाने दूर असतील तर त्या नात्यांना अर्थ तरी आहे का? नात्यांची मधुरता वाढायला एकी हवी ना?
परडीत असलेली फुले सुस्तावून पडली होती. पण दिमाखात मिरवायचं होतं त्यांना.. मग काय काळजात आरपार ध्येयाची सुई टोचून घेतली आणि सर्वांनी एक व्हायचे ठरवले. फुले एकत्र ओवली नि सुरेख पुष्पमाला तयार झाली. ध्येयाने प्रेरित झालेले लोक असे एकत्र आले तर कर्तृत्वाचा गंध पसरायला वेळ लागणारच नाही. पण दिमाखात मिरवायचं असेलतर एकी हवी ना?
द्राक्षांचा घड आवरून सावरून बसला होता. त्याला पक्कं माहीत होतं सगळे द्राक्षमणी एकत्र असतील तरच आपल्याला किंमत आहे. आपण विखुरलो गेलो तर आपल्याला कोण भाव देईल..! एकाने शून्याला जरी सोबत घेतले तरी त्याची किंमत दहापटीने वाढते.. हेही तितकंच खरंय ना..! एक काठी लगेच मोडली जाते पण पाचं काठ्या एकत्र केल्यातर त्या तुटत नाहीत. एकटं फुलपाखरू लगेच पकडतील पण मधमाशीच्या पोळ्यावर दगड मारण्याचं धाडस कुणाला होत नाही… ही आहे एकीची ताकद, जी समोर असणा-या आव्हानांना सहज पेलते. सर्वांना ती शिकारी व चिमण्यांची गोष्ट तर माहितच आहे. सगळ्यांनी एकजूट होऊन काम केले तर असाध्य तेही साध्य झाल्यावाचून राहत नाही. फक्त एकाजागी अनेकजण असणं म्हणजे निव्वळ गर्दी. पण समविचाराने, एकरूप भावनेनं एकत्र असणं म्हणजे खरी एकीची ताकद.
पावसाचे थेंब-थेंब जमिनीवर पडल्यावर एकत्र वाहू लागले की ओहोळ तयार होतो. अनेक ओहोळ एकत्र आले तर नदी तयार होते. अनेक नद्या एकत्र मिळून सागरास मिळतात व इवल्याशा थेंबानांही अथांगपणाचा भाग होता येतं. अथांग, अफाट व्हायचे असेल तर ‘एकी हवी ना?’ अगदी हेच शीर्षक घेऊन आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी हाताची मूठ वळवलेले चित्र आले. एका बोटाने टाळीही वाजत नाही किंवा मूठसुद्धा वळत नाही. त्यासाठी हाताच्या सर्व बोटांना एक व्हावे लागते. एखादं चांगलं कार्य पार पाडायचे असेल तर एकी हवीच. पण मध्ये अनेक भिंती उभ्या राहतात. मतभेद, ईर्षा, द्वेष, हेवेदावे.. कारणं एक ना अनेक. पण त्यामुळे आजकाल कितीतरी जण एकाकी होत चाललेत.
प्रवास करताना एकट्याने चालणे कंटाळवाणे होते पण सोबतीने चालताना प्रवास कधी संपला हेदेखील कळत नाही. शत्रूला नामोहरम करायचे असेल, ताकद दाखवून द्यायची असेल, ध्येयाचा प्रवास सहजसोपा करायचा असेल तर एकी हवी ना? हा वैचारिक प्रश्न आवर्जून विचारावा वाटतो. याच विचार मंथनातून कौटुंबिक, सामाजिक, राजकीय भान जागवत आज चित्रचारोळी रचना शब्दबद्ध झाल्या. आजचा विषय भावनिक व वैचारिक दोन्ही बाजूंनी लिहायला लावणारा. हेच आजच्या रचनांमधून जाणवले. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/कवयित्री/लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह