“फुशारक्यांच्या दुनियेत मुशाफिरी करताना ठेवू या वास्तवाचे भान…!”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
“फुशारक्यांच्या दुनियेत मुशाफिरी करताना ठेवू या वास्तवाचे भान…!”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
बंड्या : माझ्या आजोबांकडे एवढी मोठी काठी आहे, की ते तिच्यानेच आंबे पाडतात.
चंद्या : माझ्या आजोबांकडे एवढी मोठी काठी आहे, की ते घरूनच डोंगरावरच्या शेळ्या हाकलतात.
नंद्या : माझ्या आजोबांकडे एवढढढढी मोठ्ठी काठी आहे, की ते तिच्यानेच आकाशातील तारे मोजतात.
अरे, ए पोरांनो, कशाचा गलका लावला रे ? घरातून बंड्याच्या आजोबांचा आवाज ऐकल्याबरोबर सारे चिडीचूप…सारी फुशारकी राहिली बाजूला आणि पळाली जिकडे तिकडे….!
अशा फुशारक्या मारता मारता कधी बालपण संपलं कळलेच नाही. ती फुशारकी, त्या बढाया, त्या लुटुपुटीच्या लढाया…सारं सारं काही मनाच्या एका कप्प्यात दडून ठेवलेलं असतं आपण. पण तो कप्पा उघडायला आता वेळच नसतो कधी. पण नवीन फुशारक्यांनी मात्र मनाचा ताबा घेतलेला असतो. मी य्याव्व मी त्याव्व… म्हणून जगाच्या पाठीवर मीच कसा शहाणा आणि बाकी सगळे कसे मूर्ख याची जणू चढाओढ लागलेली.
खरेतर चढाओढ, स्पर्धा हवीच. त्याशिवाय कर्तृत्वाचा कस लागणार नाही. पण ती हवी निकोप. इतरांना डिवचून स्वतःचा मोठेपणा मिरवण्यात काय हशील ? पण आजच्या काळात फुशारक्यांना जणू ऊत आलायं. स्पर्धेचे युग ना बाप्पा…! मग जाहिरात हवीच. त्याबिगर काही माल खपाचा नाय. मंग मार फुशारक्या. आता फकस्त माल विकालेच फुशारक्या नाही मारा लागत… मागं पुढं माणसं घुमवाले बी फुशारक्या मारा लागते. याच्यामंदी तं आजकालच्या नेत्यायचा कोणी हात नाय धरू शकत. कोंत्या बी पार्टीचा राहू दे. बंड्या, चंद्या, नंद्या तेथं बी हायेतस…!
तर अशी ही ‘फुशारकी’ काल ‘मराठीचे शिलेदार’ समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांच्या प्रेरणेने विषय रूपात आली. शिलेदारांच्या लेखणीतून अनंत रूपे धारण करून ती आम्हाला रिझवून गेली. परंतु शब्दबांधणी करून सन्मानपत्राकडे पाठ फिरविण्याची फुशारकी मारणा-या सर्वांचे खूप खूप अभिनंदन….!
पण शेवटी आयुष्यभरातल्या अनुभवावरून सांगावेसे वाटते, स्वतःच्या श्रीमंतीचा, वैभवाचा, ज्ञानाचा गर्व बाळगून फक्त फुशारकी मारण्याऐवजी कधीतरी… कधीतरी…. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातील गुरू ठाकूर यांच्या गीतातील ओळीही जगून बघाव्यात….!
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
- वैयक्तिक अडचणीमुळे परीक्षणास विलंब होत आहे. करीता क्षमस्व….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



