‘काळजी आणि अस्वस्थतेने भरलेली अवस्था अर्थात चिंतातूर’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न स्पर्धेचे' काव्यपरीक्षण
‘काळजी आणि अस्वस्थतेने भरलेली अवस्था अर्थात चिंतातूर’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न स्पर्धेचे’ काव्यपरीक्षण
मराठी कवींचे महानपण त्यांच्या भाषेवरील प्रभुत्व, सामाजिक जाणीव, तत्त्वज्ञानात्मक खोली आणि नाविन्यपूर्ण शैलीत आहे. नुकतेच मी राम गणेश गडकरी अर्थात ‘गोविंदाग्रज’ यांच्या साहित्याविषयी वाचत होते. त्यांच्या साहित्यात भावसंपदा व कल्पनांचा चमत्कार आणि त्यास काव्य आणि विनोदाची झुल पहावयास मिळते. एकदा असंच त्यांना एक चिंतातूर भेटतो. कवी त्याचे वर्णन चिंतातूर जंतू असे करतात. त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना ते म्हणतात…..
देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी |
ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी !
अर्थात या मागचे कारणही स्पष्ट होते. समाजात अशी कितीतरी लोक आहेत, की ज्यांना नेहमी चिंतारुपी राक्षस सतावत असतो. जसे परीक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थी चिंतातूर अवस्थेत असतात तर, मुलगा उशिरा घरी न आल्यामुळे आई चिंतातूर होते. दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर चेहऱ्याने आकाशाकडे पाहत बसतो; तर रुग्णाची प्रकृती बिघडल्याने संपूर्ण कुटुंब चिंतातूर झालेले दिसते.
युद्धाच्या बातम्यांमुळे नागरिकांचे मन चिंतातूर होते तर आर्थिक अडचणींमुळे पुष्कळ लोक चिंतातूर दिसतात.
“चिंतातूर” म्हणजे चिंता, काळजी किंवा अस्वस्थतेने भरलेली अवस्था. चिंता ही केवळ मनाची अवस्था नसून ती मानवी अस्तित्वाच्या मूलभूत अस्थिरतेची जाणीव आहे. उपनिषद सांगते… “द्वितीयाद्वै भयं भवति” अर्थात दुसरेपणाची जाणीव झाली की भय निर्माण होते. ही द्वैताची भावना म्हणजेच चिंता. जेव्हा माणूस स्वतःला विश्वापासून वेगळे मानतो, तेव्हा असुरक्षिततेची भावना वाढते. आत्मा आणि ब्रह्म यातील ऐक्य न उमजल्यामुळेच मन अस्थिर होते.
तर गौतम बुद्ध दुःखाचे मूळ तृष्णा मानतात…“तृष्णा दुःखसमुदयो” भविष्य सुरक्षित करण्याची, नाती टिकवण्याची, यश कायम ठेवण्याची तृष्णा म्हणजेच चिंता. बुद्धाच्या दृष्टीने चिंतातूर मन हे अनित्यता स्वीकारू शकत नाही. जे क्षणभंगुर आहे त्याला शाश्वत करण्याचा प्रयत्न म्हणजेच दुःख. तर भगवद्गीता कर्मयोगाचा मार्ग दाखवते. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” फळावरची आसक्ती ही चिंतेचे मूळ आहे. अर्जुनाची चिंता युद्धापेक्षा परिणामांची होती. “कृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्यास सांगितले नाही, तर आसक्ती सोडण्यास शिकवले”. हीच चिंतातूरतेवरची तात्त्विक उपाययोजना आहे. चिंतातूर मन काळाच्या तीन स्तरांत अडकलेले असते. भूतकाळाच्या पश्चात्तापात, वर्तमानाच्या असमाधानात आणि भविष्याच्या भीतीत.
मला असे वाटते…चिंतातूर असणे म्हणजे अजून पूर्ण जागृत न होणे. जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखतो, अनिश्चिततेला स्वीकारतो आणि अस्तित्वावर विश्वास ठेवतो, तेव्हा चिंता आपोआप विरघळते. तेव्हा जीवन प्रश्न न राहता अनुभव बनते. चला तर मग संकल्प करूया चिंतातूर न राहता चिंतामुक्त बनण्याचा. मराठी रसिक सृजनहो…आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी हा विषय दिला. नेहमीप्रमाणे समूहाच्या सर्व कवी, कवयित्रींनी विषयाला आपल्या नजरेतून न्याहाळले. दर्जेदार रचनांनी सर्वच समूहाला बहर आला. तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा धन्यवाद.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



