Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील काव्यरचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*🥀विषय : श्वसोत्सव🥀*
*🍂बुधवार : ०९ / जुलै /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*श्वासोत्सव*

घेऊनी मोकळा श्वास
करू साजरा श्वासोत्सव..
न जाणे कधी संपेल गं
श्वासांचा हा आनंदोत्सव..

बघ निघाला मावळतीला
विसाव्याला रवीराजही..
थोडा विसावा घेऊया ना
सिमा ओलांडून आपणही..

इंद्रधनुचेही रंग लेवू
स्पर्शाने श्वास रंगवू..
उनाड वा-याला बिलगू
पावसात मदमस्त न्हावू..

झाडंवेली पानांचे स्वर
पुकारती बघ आपणाला..
फुलांच्या दरवळात चल
श्वास सुखाचे घेण्याला..

सल मनातील रिती करू
स्पंदनंही मोकळी करू..
नवक्षणांचे स्वागत करण्या
तळही चल नितळ करू..

पाकळ्यांत नयनांच्या
छबी आपली मिटून घेऊ..
पहाटवाऱ्यात धुंद होऊनी
ओंजळ सुखाची भरून घेऊ..

पिवून चांदणं ग्रीष्मातील
सरगम प्रेमाचे छेडूया..
प्रेमांकुर अंकुरुनी ह्रदयी
श्वास अखेरचाही देऊया..

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

आहे श्वास जोवर
तोवर पावती जिवंतपणाची
जगू देत संवेदना
घालमेल नको मुक्या मनाची..

श्वासातल्या प्रत्येक स्पंदनाने
मनाला जागवावे
मनाला द्यावा अलगद झोका
स्व.. ला द्यावा आनंदी जगण्याचा मोका

श्वास आहे तोवर
जगून घेऊया स्वच्छंदी
त्या वागण्यावर ,जगण्यावर
का? असावी कुणाची बंदी

आनंदे भरारी साठी
कुडीत जीव आहे जोवर
शिस्तही द्यावी लागेल श्वासाला
करून ध्यान ,योग, श्वासांनी जावे समाधीला

होईल कुंडलिनी जागृती
परा अराशक्तीवर विजय
होईल परमोच्य आनंद
श्वासांचा उत्सव… जणू श्वासोत्सव

जगणे आहे तोवर
श्वास आहे.. करू देत आनंदे
श्वासोत्सव …उद्या कोण पाहे

*सौ सुरेखा कोरे,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

अजून होत नाही, गावात वनोत्सव।
कसा करु साजरा,ईथला श्वासोत्सव।।

झाडे लावा जगवा,धोरण शासणाचे।
स्वार्थासाठी आसक्त,दुष्मन जीवनाचे।।

भुलले मायबाप,पर्वा नाही कुणाची।
व्रुक्षवल्ली तरी घेते काळजी आमची।।

जीवन मरणाचे,अंतर श्वास झाले।
ओळखीचे स्पंदने,पळून दूर गेले।।

मनातल्या भावना,प्रतीत ह्रुदयात।
घुसमटती आता, सिमेंट जंगलात।।

कत्तल करतात,त्या झाडी झुडपांची।
किलबिलाट शांत,निशब्द प्रक्रुतीची।।

झुळूक ही वार्राची, जणू काही बोलती।
नदीनाले अजूनी, खळखळा सांगती।।

पर्यावरण शुद्ध , करुया जीवनाचे।
अन्न पाणी हवामान,होईल अम्रुताचे।।

हातात हात घेऊ,श्वासास श्वास देऊ।
प्राणवायू करीता, व्रुक्षारोपन करु।।

जाणून घे माणसा, निसर्ग संतुलन।
मग उन पावसाची नाही अडचण।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

गुगल बाबाला विचारले
काय आहे हा श्वासोत्सव
उमगत नाही मजला
कळेल का काही माहितीस्तव..

श्वास.. जो प्राणच की रे
त्याचं करायचं नियमन
दररोज नित्यनेमे त्यास्तव
द्यायचे ठरव काही क्षण
श्वास रोखून धरायचा
श्वास गतीने सोडायचा
चित्त स्थिर करून
मनापासून अनुभवायचा..

पण मी तर श्वास रोखून
किती धावपळ करतोय
दमछाक इतकी होते की
श्वासही गतीने सोडतोय..
सुरूच आहे वणवण
जराही नाही आराम
होतच आहे ना माझाही
द्राविडी प्राणायाम..

मिश्किलपणे उत्तर मिळाले,
ही तर तुझ्या मनाची हाव
शरीरसंपदेसाठी वेगळं ते
काय केलंस राव?
राखली नाहीस तनू तर
श्वासही करतील पोबारा
कुडीत आहे श्वास तोवर
कर ना श्वासोत्सव साजरा..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

योग, ध्यानसाधना,
प्राणायाम जिथे असे,
साधला जातो सुंदर मेळ
श्वासोत्सव त्यातच ठसे.

श्वासोत्सव साजरा कर
तुझ्या दीर्घायुष्यासाठी,
निरोगी, सुदृढ शरीर मिळे
सुंदर सुखी जीवनासाठी.

मन जोडणे शरीराशी,
हीच मोठी देण देवाची,
श्वास देतो आपणास
साक्ष जिवंत असण्याची.

येणारा श्वास भरतो
ऊर्जा आपल्या देही,
जाणारा श्वास देतो
विश्रांती जीवनीही.

श्वासोत्सव हा सुंदर
मूलमंत्र जीवनाचा,
मिळालेली अमूल्य भेट
प्रत्येक प्राणीमात्राचा.

*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव…*

प्रत्येक श्वासात जीवनाचा सार
चालते श्वासांच्या लयीवर वाट
क्षणोक्षणी गाती सूर नवे खास
उठे हृदयात नवचैतन्याचा थाट..

जणू शांत सागराचा खोल श्वास
प्रभातीच्या रश्मीत तो चकाकतो
होऊन कधी भावनांचा भास
श्वासात सुगंधी फुलासम बहरतो…

उमजून स्वतःला जन्म नव्याने घ्यावा
मंद वाऱ्याशी हितगुज होता
क्षणभर विसवून खोलवर श्वास घेता
श्वासांच्या लयीवर सुरेल गीत गाता..

असा हा श्वासोत्सव जीवन आपुले
प्रत्येक श्वासात दडलेले ते अंतर
जीवनमरणाची हि जणू साखळी
न कळल्यास पस्तावाल नंतर..

जरी ही क्षणभंगूर दुनिया अशी
जपूया आपला प्रत्येक श्वास
जगण्याची शिकून भली कला
श्वासोत्सव जीवनबागेचा ध्यास..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव -रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*श्वासोत्सव*

अंडज असो की सस्तन
अगणित जीवांच्या जाती
अतिसूक्ष्म ते विशालकाय
श्वासोत्सवाच्या नाना रिती.. //

क्षणभंगूरतेच्या नियमाला
इथे कुणीच अपवाद नसे
कुणी अल्प कुणी दिर्घायू
हा श्वासोत्सव निरंतर असे.. //

वैविध्यपूर्ण जीव ब्रम्हांड
पिंडातूनच घेतेय आकार
गर्भात असो की अंड्यात
जन्माआधी जीवाचा हूंकार.. //

देहात स्थित श्वसन यंत्रणा
देहरथास करी गती प्रदान
अतर्क्य अद्भूत रचनाकार
श्वासावर तोलून धरी जान.. //

जीव जागा अथवा निद्रेत
अविरतपणे चाले स्पंदन
हरेक श्वासाधीन नवा क्षण
ज्याने जीवाचे चलनवलन.. //

आयुर्मान मर्यादा निश्चितच
तरीही क्षणाचा नसे भरोसा
कधी थांबेल हा श्वासोत्सव
अंदाज कुणा येईना जरासा.. //

कुणा क्षण,तास,दिस,मास
मिळती कुणास कैक साल
येणे जाणे वा जगणे मरणे
प्रत्येकाचे तोच ठरवी काल… //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव…*

आपल्या जिवंत असण्याची एक पावती म्हणजे असतो श्वास
तो थांबतो तेव्हा आपण जाऊन पोहोचतो मृत्यूच्या दारात

जगणं आणि मरणं या दोन टोकातला प्रत्येक क्षण श्वासोत्सव असतो
त्याचा सन्मान करण्याचं सोडून आपण त्यालाच विसरतो

जीवनात येता आनंदाची लहर बहर येतो श्वासाला
दुःखाच्या प्रसंगातही तो शांत ठेवतो स्वतःला

थांबणं त्याला माहीत नसतं, थांबण्यावर ही त्याचचं नियंत्रण असतं
म्हणूनच त्याला घेताना विसरू नका तेच जीवनाचं गाणं होतं

जीवनात आनंदाचा साक्षात्कार घडविणाऱ्या या श्वासाचा श्वासोत्सव साजरा करू चला
तेव्हाच वाढेल आयुष्य आणि सु-आरोग्य लाभेल आपल्याला…

*सौ.अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

रंगुनी मी सप्तरंगी रंगात..
वाहलो अनिलासंगे झोतात
हिंडलो सृष्टीच्या नवचैतन्यात
निजलो रम्य टिपूर चांदण्यात
जाहलो धुंद निसर्ग संगितात
न्हाहलो आयुष्याच्या निर्झरात
तृप्तलो प्रेमप्रीतीच्या स्पर्शात
सुखावलो मायेच्या आभाळात
ओलावलो ममतेच्या सागरात
ना अडकलो ‘अहं’ गर्वबंधनात
मजसाठी माझा जगण्याचा सोहळा
केला मी हर श्वासांचा श्वासोत्सव
ना खंत आता राही उरी…जरी
ना करोत माझ्या अंताचा महोत्सव

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

प्रदूषणाची काळी सावली
वसुंधरेवर ही पसरली
प्राणवायूची कमतरता
तीव्रतेने जाणवू लागली

श्वासांची जीवाशी जोडणी
श्वास देतसे नित्य चेतना
श्वासोच्छवास घेण्यासाठी
शुध्द हवाच हवी ना?

मानवाने स्वार्थासाठी
बेसुमार जंगले तोडली
आपल्याच हाताने त्याने
पायांवर कुऱ्हाड मारली

वृक्षवल्ली आम्हा सोयरे
संत तुकोबा सांगून गेले
माणसाने दुर्लक्ष करूनी
प्रदूषणा आमंत्रणची दिले

करण्या साजरा श्वासोत्सव
रोखले पाहिजे प्रदूषणाला
जीवनात आनंद फुलेल नी
सूर नवे जीवन गाण्याला

व्हावी जपणूक मानवतेची
मनांमध्ये प्रेम ज्योत तेवावी
मनमोकळा श्वास घेऊनी
श्वासोत्सवा आरास सजावी

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

रोजच साजरा करावा
श्वासोत्सव जगण्याचा
कुणास ठाऊक ठरेल कोणता
क्षण शेवट आयुष्याचा

तुझं माझं करण्यात
संपून जात आयुष्य
लेखाजोखा काढता
सत्कृत्य पुण्यच उरे शेष

फुकट असणाऱ्या श्वासांचे
जाणून घे रे मोल
जग स्वतःसाठी थोडा
जीवन आहे रे अनमोल

जगा आणि जगू दया
एवढेच तंत्र ठेव ध्यानी
श्वासोत्सव साजरा करण्याचा
संकल्प करूया मनी

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

निसर्ग विनामूल्य गोष्ट देतो
बदल्यात फक्त आनंद घेतो
सर्वांना सगळं काही देतो
माणूस मात्र स्वार्थ साधतो

औषधी वनस्पती चढल्या दारी
किती होत्या आरोग्याच्या तक्रारी
निसर्गाची किमया न्यारी
वनस्पती वैद्य घरच्या घरी

क्षणभर थांबा झाडाखाली बसावं
विसावा पक्षी प्राणी मनुष्यासाठी
थकलेल्या जीवांना विश्रांती
झाडांचा परोपकार सर्वांसाठी

अंधाराचा ठाव घेणारा भास्कर
रात्रंदिवस सेवेसाठी हवा
अन्य निर्मिती रोपांसाठी…
तोही म्हणतो झाडे लावा

झाडे आहेत म्हणून सृष्टी
प्राणवायू हवा जगण्यासाठी
प्रदूषणाने गुदमरत आहे सृष्टी
माणूस ही होतोय कष्टी…

तरु वेली झाडांमुळे श्वासोत्सव
निसर्गाचे करावे अनुकरण
प्राणवायूचा ताजा ठेवा…
करावे निसर्गदेवाकडे नमन

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या .मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

श्वासोत्सव साजरा करूया
लहान थोर सारेच घरोघरी
नको प्राणवायुचा तुटवडा
वृक्षसंवर्धन उपक्रम भारी…

शुद्ध ताजी हवा करतील
परिसरातीलच झाडे सारी
अन्नसाखळी पूर्ण होऊनी
टळेल जीवघेणी महामारी…

वृक्ष देतात फुले नि फळे
बघा किती ते परोपकारी
पशू पक्षांना छान निवारा
संपेल त्यांची उपासमारी…

श्वासोत्सव साजरा करताच
हरित रांगोळी छान सृष्टीवरी
मोत्यावानी पीक पाहताक्षणी
डोलेल कास्तकार तालावरी…

गरज ठरेल शोधाची जननी
श्वासोत्सव श्वासरक्षक दोरी
प्राणवायू तुटवड्याचे संकट
नकोच आता भावीपिढीवरी…

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

श्वास जोवर जगून घ्यावे,
आनंदाचे गावेत पोवाडे…
एकदुजाच्या सुखदुःखात,
खुले असावे नित्य कवाडे…१

कधी कुणास दुखवू नका,
प्रेमे जोडा नाते निरंतर…
कोण वाईट कोण बरवा,
मनी न यावे हेचि अंतर…२

निसर्गासम जागवा वृत्ती,
परोपकारी भावना नित्य…
समर्पण भावना मनाची,
जीवन साफल्याचे औचित्य…३

वृक्ष लता वेली शिकविती,
त्याग, प्रेम अंतरीची भाषा…
आपण का? द्वेष अहंकार,
यांचिच शिकलो परिभाषा…४

चला जोडूया मना मनाला,
स्वर्गासम करूया धरती…
आपुल्या हस्ते होता सत्कर्म,
तेच ठरे पुण्याची भरती…५

श्वासाला श्वासाची किंमत ही,
कळता होतसे महोत्सव…
*सुधाकरा* श्वास जोपर्यंत,
करूया निर्मळ *श्वासोत्सव*…६

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️
*श्वासोत्सव*

जन्म घेता उदरातून
श्वासोत्सव होतो सुरू
प्रारंभ तो रडण्यातून
आईच खरी प्रथम गुरु

सोसून जीवघेण्या कळा
रुजवीते ती जीवनदृष्टी
फुलविण्या रे जीवनमळा
करी हृदयातून प्रेमवृष्टी

अमृतकुंभ ती देते मुखी
करण्या लेकराचे पोषण
भरारी पाहून होते सुखी
भाळी का तिच्या शोषण

श्वासोत्सवाची रे उद्घाटक
आई खरंच असे पूजनीय
नवरात्रोत्सवाचे ते नाटक
चाळे नकोत ती निंदनीय

थांबेल जेव्हा श्वासोत्सव
उचलतील समजून मुडदा
सत्कारणी हा जन्मोत्सव
प्रयत्नांतीच होतो रे बहुदा

प्रयत्नांतीच होतो रे बहुदा

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩶↔️🩶♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे