आठवणींच्या सावलीत उभे आयुष्य…!!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता. उमरगा, जि. धाराशिव

आठवणींच्या सावलीत उभे आयुष्य…!!
माझी आजी आम्हाला सोडून गेली, त्या गोष्टीला आज दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आहेत. समोर आजीचा फोटो ठेवला आहे. फुलांचा हार, समईचा प्रकाश आणि डोळ्यांसमोर तिचा प्रेमळ चेहरा!! हे सगळं पाहताना मन पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन पोहोचतं. माझी आजी फार काही मागणारी नव्हती. कधी नवी साडी, कधी नवीन बांगड्या, तर कधी चांगले खायला, तिच्या इच्छा इतक्याच साध्या होत्या. पण परिस्थिती अशी होती की तिच्या या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करतानाही मनाला अनेकदा वेदना व्हायच्या. आज विचार केला तर जाणवतं, तिच्या मागण्या मोठ्या नव्हत्या; मोठं होतं ते तिचं मन आणि तिचं आमच्यावरचं निस्वार्थ प्रेम.
माझी आई २००० मध्ये आम्हाला सोडून गेली. त्यानंतर २००२ मध्ये माझे वडीलही वारले. आयुष्याच्या त्या काळात डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र हरपलं. मी मोठा असल्यामुळे माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. माझ्या बहिणीची, लहान भावाची आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी सांभाळत पुढे जाण्याचा संघर्ष सुरू झाला. मी जन्मगावी १९९५ पासून विनाअनुदानित शाळेत केवळ ३०० रुपये वेतनावर कामाला सुरुवात केली. परिस्थिती कठीण होती, पण मनात एकच जिद्द होती, शिक्षणाची सेवा सोडायची नाही आणि आयुष्याला योग्य दिशा द्यायची.
दीर्घ संघर्षानंतर १ ऑक्टोबर २००३ रोजी अनुदानित शाळेवर बदली झाली. तो माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. पुढे माझे, माझ्या बहिणीचे आणि माझ्या लहान भावाचे लग्न झाले. संसार उभे राहिले. जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्याचबरोबर आयुष्याला स्थैर्यही मिळाले. आज मागे वळून पाहताना मनात एक समाधान आहे. ज्या परिस्थितीतून आलो, त्यावर मात करून आज मी समाधानी आयुष्य जगत आहे. माझ्या वाट्याला आलेल्या संघर्षाने मला खचवले नाही; उलट त्याने मला अधिक मजबूत केले. पण या समाधानाच्या क्षणी मनात एक मोठी खंत कायम आहे…
आई असती तर?
वडील असते तर?
आजी असती तर?
माझे आजचे आयुष्य, माझी सेवा, माझे काम, माझे समाधान आणि माझ्या आयुष्यात आलेले यश त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहायला हवे होते. त्यांच्या आशीर्वादाने माझा प्रवास त्यांनी अनुभवायला हवा होता. ही इच्छा मनात कायम राहील. असा एकही क्षण गेला नाही की मला माझी आई, वडील आणि आजी आठवत नाहीत. त्यांच्या आठवणी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. ते आज माझ्यासोबत प्रत्यक्ष नसले; तरी त्यांच्या संस्कारांचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर सदैव आहे, अशीच माझी श्रद्धा आहे.
आज आजीच्या फोटोसमोर नतमस्तक होताना मनापासून एकच म्हणावेसे वाटते, “आजी, आई आणि बाबा… तुम्ही आज माझ्यासोबत नाहीत, पण माझ्या प्रत्येक श्वासात तुमच्या आठवणी आहेत. तुम्ही दिलेले संस्कार माझी खरी संपत्ती आहे. माझ्या आयुष्याचा हा प्रवास तुम्ही पाहिला असता, तर कदाचित माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हालाच झाला असता.” आज मी समाधानी आहे; पण या समाधानात तुमची उणीव कायम आहे. तुमची आठवण ही दुःख नाही, तर माझ्या जगण्याची प्रेरणा आहे. माझ्या आईला, वडिलांना आणि आजीला भावपूर्ण श्रद्धांजली. “माणसं दूर जातात, पण त्यांच्या आठवणी कधीच दूर जात नाहीत…”
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा, जि. धाराशिव
==========



