Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

आम्हा पर्यटकांच्या पावसाळी सहलीला आनंदाचे उधाण”; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 7 4

आम्हा पर्यटकांच्या पावसाळी सहलीला आनंदाचे उधाण”; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

रोजचीच धावपळ अन् रोजचंच तेचतेचपण.. मग कंटाळून जातं मन. कुठेतरी हवे असतात विरंगुळ्याचे क्षण. मनाला विरंगुळा देणारा अवतीभवतीचा निसर्ग हरवलाय, आता किलबिलाट ऐकू येत नाही, ऐकू येतात वाहनांचे आवाज. दुरवरुन खुणावणारा डोंगरही दिसत नाही, त्याहीपेक्षा उंचच उंच असणाऱ्या दिसतात केवळ इमारती. झाडाच्या फांदीला झुला बांधून त्याच्या सावलीत मनसोक्त खेळता येत नाही, पण, मनास कृत्रिम दिलासा देणारी कुंडीत वाढणारी बोनसाय घराच्या सावलीत आहेत विसावलेली. झऱ्याचा मंजुळ नाद तरी कसा अनुभवणार.. नळाला येणाऱ्या पाण्याचाच केवळ थयथयाट, नदीचा पूर कसा पाहणार, तुंबलेल्या पाण्यानेच जीव हैराण. मग मरगळ आलेल्या मनाला साद घालतो तो निसर्ग. पावलं वळतात, मन धाव घेतं, निसर्गसहवासासाठी शरीरही आसुसतं. आकाशाच्या छताखाली नि धरतीच्या मांडीवर मुक्त विहारणारी पाखरं पहात घेतला जाणारा भाकरीचा आस्वाद अनुभवायला मग निघतो आम्ही पर्यटक. येता निसर्गाची साद.. आम्ही पर्यटक, करून पर्यटन, लुटतो आनंद मनमुराद..!

त्यात पावसाळी सहल असेल तर आनंदाला उधाणच. गार्डनमधील आखीवरेखीव हिरवळ डोळ्यांना मोहवत असेलही, पण निसर्गातील हरिततृणांचा गालिचा नजरेस तृप्त करतो. कुठे उंच, कुठे खुरटे गवत, तर कुठे त्यातूनच डोकावणारी रानफुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे.. हे जिवंत चित्र पाहायला मन ओढ घेणारच ना..! सोबतच निर्झराचे मधुर संगीत, धबधब्याचे धवल तुषार, खळखळणारे ओढे, अवखळ झालेल्या नद्या, मधूनच येणारी पावसाची एखादी सर, ऊनसावलीचा खेळ, उनाड वारा.. डोंगररांगांच्या शिखरांना कवेत घेणारे मेघ पहायला, पावसाळी कुंद हवेचा स्पर्श तनुवर झेलत फुलपाखरासवे भिरभिरायला, कुठेतरी एखाद्या टपरीवर भाजलेल्या मक्याची कणसे, गरमागरम वाफाळता चहा व भजी खायला. वर्षाकाठी एकदा तरी हे क्षण जगावेत म्हणून निसर्गकुशीत जातो आम्ही पर्यटक.. विहंगम दृश्य पाहता लागते तंद्री, पहात रहाते नजर, नजारा एकटक..!

खरेतर हल्ली अनेकजण वर्षासहलीचा आनंद घ्यायला बाहेर पडतात. ‘केल्याने पर्यटन, येतसे शहाणपण’ हे जरी खरे असले तरी सुज्ञपणे, डोळसपणेच पर्यटनाचे नियोजनही तितकेच महत्वपूर्ण. एकटे, मित्रांसमवेत वा कुटुंबासोबत.. कसेही असो, ज्याठिकाणी जायचे तेथील आधी माहिती जमवून त्यानुसार आवश्यक ते साहित्य सोबत ठेवून, तयारी करून निघावे. शेवटी निसर्गात सहलीला जायचे म्हटले तर त्याच्या लहरीपणाचाही फटका बसण्याची शक्यता असते. ओहोळ, नदी, धबधबे दिसले की त्यात भिजण्यासाठी पाय धाव घेतात. त्यातील धोका लक्षात न आल्याने अपघातही होतात.

तेव्हा ‘सुज्ञपणाने वागू आम्ही पर्यटक.. वेळीच ओळखून घेऊ येणारे संकट’ आज गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेनिमित्त आलेले चित्र पाहून पर्यटनातील मनसोक्त आनंद व पर्यटकांच्या चुकांमुळे होणारे अपघात दोन्ही नजरेसमोर तरळले. खरेतर पर्यटनाचा पाण्यात भिजत मनसोक्त आनंद घेणारे चित्र.. पण तरीही त्यातील आनंद व निष्काळजीने येणारी संकटे दोन्ही बाजूंचा विचार मनात आला. या दोन्ही विचारांस अनुसरून आलेल्या रचना आशयघन अशाच. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ. स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

4.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 7 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे