अनुभवा… सुख, दु:खाची अनुभूती… भेटल्यानंतरच”; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“अनुभवा… सुख, दु:खाची अनुभूती… भेटल्यानंतरच”; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाळी…..”
ज्येष्ठ कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’ यांचे हे गीत आहे. आज भेट या विषयामुळं मला एक प्रसंग आठवला. आमच्या घराशेजारी वझे काका, काकू राहात होते. त्यांचा मुलगा तेजस परदेशात होता. काकाकाकूंशी आमचा छान घरोबा होता. एकदा काकू उत्साहाने म्हणाल्या “अगं आमचा तेजस आम्हाला भेटायला येत आहे. बरोबर सूनबाई आणि नातू पण येणार आहेत”. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. खरंच चार दिवसांनी तेजस आला. पण दोनच दिवसात काका, काकू आमचा निरोप घ्यायला आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, मी विचारलं तेंव्हा ते म्हणाले, ”अगं तेजस आम्हाला वृध्दाश्रमात ठेवणार आहे. अगदी हायफाय वृध्दाश्रम आहे म्हणे” असं म्हणून काकू मला मिठी मारून रडू लागल्या. खरंच मुलाच्या भेटीनंतर त्यांच्या वाट्याला हे एकटेपणाचं दारुण दु:ख आले.
मानवी जीवन म्हणजे सतत चालणारी एक प्रवास यात्रा. या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. काही भेटी क्षणिक असतात, काही आयुष्यभर टिकतात; काही आनंद देतात तर काहींमुळं वेदना मिळतात. पण एक गोष्ट मात्र खरी, प्रत्येक भेटीनंतर आपण पूर्वीचे राहत नाही. ‘भेटल्यानंतर’ हा क्षण माणसाच्या अंतरंगाला नवा आकार देतो. कारण भेट ही केवळ दोन शरीरांची नाही तर, दोन मनांची, दोन विचारसरणींची, दोन जीवन प्रवाहांची असते. भेट ही केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसते. निसर्गाशी झालेली भेट, स्वतःच्या अंतर्मनाशी झालेली भेट, एखाद्या ग्रंथाशी झालेली भेट या सर्व भेटी माणसाच्या जीवनदृष्टीला नवे आयाम देतात.
मानवी जीवनातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक म्हणजे कोणालातरी भेटणं. नाती, मैत्री, आपुलकी या सगळ्याचा गाभा भेटींतच दडलेला असतो. आजच्या वेगवान आणि आभासी जगात भेटी दुर्मिळ झाल्या असल्या; तरी भेट झाल्यावर येणारा अनुभव मात्र अविस्मरणीय असतो. आधुनिक जीवन शैलीत मात्र वेळेचा अभाव, कामाचा ताण आणि अंतरामुळे प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल यामुळे संवाद टिकतो; पण त्यातून खरे समाधान मिळत नाही. उदाहरणार्थ, सैन्यातील मुलगा सुट्टीवर घरी आल्यावर घरात वेगळीच गडबड उडते. आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात, वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकतो, भावंडं त्याला मिठी मारतात. प्रत्यक्ष भेटल्यावर होणारा तो आनंद अनमोल असतो.
‘भेटल्यानंतर’ शब्द अपुरे पडतात. डोळ्यांत उमटलेली भावना मनाला भिडते. लहानशा भेटीतही मोठा आनंद दडलेला असतो. भेटल्यानंतर माणूस एकटा राहत नाही. त्याला आधार, सोबत आणि नवा विश्वास मिळतो. कधी भेटी आयुष्यभराचा ठेवा बनतात. तर कधी त्या फक्त गोड आठवण ठरतात. भेटल्यानंतर जीवनाचे रंग अधिक खुलतात. आणि माणसाला जगण्याची उमेद पुन्हा मिळते. कधी आनंद, तर कधी दु:ख देतात भेटी. कधी भेटल्यानंतर भावनांचा आवेग मनात निर्माण होतो. ‘सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धे’साठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘भेटल्यानंतर’ हा विषय वैचारिक आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



