Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“गुप्त चांदण्या, लुप्त चंद्रमा, अस्वस्थ करणारी गूढ गर्भित शांतता…”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 3

“गुप्त चांदण्या, लुप्त चंद्रमा, अस्वस्थ करणारी गूढ गर्भित शांतता…”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी,
एकांती मजसमीप तीच तू ही कामिनी’

आठवते का तुला? ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे स्पष्ट उभे राहते. अजूनही तेच भास, तूच माझ्या आसपास, तुझे हात माझ्या हातात गुंफलेले, तुझी लांबसडक नाजूक बोटे माझ्या बोटात गुंतलेली, तुझी मान किंचित माझ्या खांद्यावर झुकलेली, आणि ती शुभ्र धवल पुनाव रात, तो हवाहवासा एकांत, ती हवीहवीशी वेळ निवांत, बनून आपण मन मित, गात रहायचो चांदणगीत, हिरव्या कंच पानाफुलांची सळसळ, द्यायची एक नादमधूर संगित, तो दुतर्फा दिव्यांचा मंद मंद प्रकाश, जागवायचा मनात अनोखा हर्ष उल्हास, आज ते सारे सारे काही जसेच्या तसे आहे…. मात्र! फक्त तू नाहीस.

ती फुलांची धुंद दरवळ, दूर करत नाही मनातली मरगळ, ती उजळलेली प्रकाशवाट, दूर घेऊन जातेय गर्द काळोखात, त्या दुतर्फा बहरलेल्या लतावेली, स्तब्ध आणि निःशब्द, झुळझुळ वाहणारा मंद वारा, शांत आणि निवांत, एक असह्य पोकळी रूंदावतेय खोल काळजात,गडद होत जातेय या एकांतातली अस्वस्थता, आतल्या आत विरतोय आकांत, दाटून येतात काळे ढग माझ्या मनांगणात, लपवतोय तेजाळ मुख, तो दुधाळ चंद्रमा, चमचमणार्‍या चांदण्या वाटतात मलूल झाल्यासारख्या, का दाटलाय हा रूसवा, की तुझा राग फसवा?

कदाचित येईल वार्‍याचा वेगवान झोत आणि दूर होईल या ढगांचा पडदा, मोकळा होईलही चंद्रमा, आणि हसेल धवल पौर्णिमा, तेजाळतील चांदण्या, आणि फुलतीलही कळ्या…. मात्र तू नसशील माझ्या सोबतीला.. फिरत राहील ऋतुचक्र, होत राहील उदयास्त,मात्र तुझ्यावाचून मी परास्त….!! काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरिता आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र पाहता, वरील भावना मनात दाटल्या. आणि सिद्धहस्त ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अजरामर गीताचे शब्द हलकेच ओठावर आले.. ‘तोच चंद्रमा नभात…’.

दुतर्फा पथदिव्यांनी उजळलेला एक हमरस्ता पुढे गर्द काळोखात जातो. आणि आकाशातील लख्ख चंद्रम्याला काळ्या ढगांचा गराडा कवेत घेतो. मनप्रसन्न वातावरण विषण्ण बनून जाते. मात्र हा नैसर्गिक खेळ आहे.. वार्‍याच्या झोताने ढग पांगतील आणि आकाश उजळेल. पहाट होईल कळ्या उमलतील. मात्र मानवी आयुष्यात जर कधी अकालीच पानगळ झाली. प्रेमाच्या वसंताला काळाची दृष्ट लागली की तो पुन्हा बहरत नाही. मग एकांतात मागे राहिलेल्याचे आयुष्य विरहाग्नीत जळत राहते…!

अतिशय भाऊक चित्रावर अनेकांनी नेहमीप्रमाणेच सुंदर हायकू बेतले….अर्थात प्रत्येकाने प्रस्तुत चित्राचा आपापल्या परीने अर्थ लावून शब्दरंग भरले.. कुणाला विषाद वाटला तर कुणाला विकास वाटला. कुणाला प्रसन्नता दिसली तर कुणाला उदासी. मात्र आपण जे शोधलात ते समर्पकपणे सतरा अक्षरात उतरणे अभिप्रेत असते. अनेकांच्या शब्दांची पुनरावृत्ती होते जे हायकूत अपेक्षित नाही. असो… सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार…!!

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©मुख्य परीक्षक,सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे