‘बाराखडी ते चौदाखडीचा प्रवास’; शर्मीला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘बाराखडी ते चौदाखडीचा प्रवास’; शर्मीला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ काव्यस्पर्धेचे परीक्षण
मराठी बाराखडी म्हणजे देवनागरी लिपीतील स्वरांची चिन्हे आणि व्यंजनांची चिन्हे यांचा संच. मराठी भाषेच्या लेखनात अ ,आ, इ ,ई, उ ,ऊ, ए ,ऐ ,ओ, औ,अं,अ: यांना स्वर म्हणतात .देवनागरीतील स्वरांची चिन्हे (स्वरांश चिन्हे उदाहरणार्थ- काना, मात्रा, उकार, वेलांटी इत्यादी) व्यंजनांच्या चिन्हांना जोडून तयार होणाऱ्या व्यंजनाक्षरांच्या संचाला बाराखडी असे म्हणतात. यात मराठी भाषेत वापरण्यात येणारे स्वर आणि त्यापैकी काही स्वरांची ऱ्हस्व व दीर्घ असे भेद तसेच काही स्वरावलंबी धर्म यांच्या चिन्हांचा समावेश असतो. बरं, या स्वरांच्या संचाला बाराखडी का म्हणावे ?तर प्रत्येक स्वरात बारा वेगवेगळे आवाज असतात म्हणून त्याला बाराखडी असे म्हणतात. आता ही बाराखडी इतकी आमच्यात रुजली होती, की बाराखडी म्हटले की, स्वर व्यंजनाचे नव्हे तर त्यावरील काना मात्र्यांचे शब्द,उजळणी सगळेच आले. बाराखडीचे पुस्तक असेच लहानपणी म्हणत असू
ज्ञानाचा श्री गणेशा
बाराखडी ची झाली चौदाखडी
कानात गुंजते आणखीही
ती पहिलीतील अ आ इ ई
पण आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झाली आहे .मराठी वर्ण लिपीत बारा स्वरात आणखी दोन स्वरांची अधिकृतपणे भर घालण्यात आली आहे. कालानुरूप इंग्रजी भाषेतून अनेक शब्द मराठीत घेण्यात आल्याने नवीन दोन स्वरांना मान्यता देण्यात आली. हे दोन स्वर म्हणजे ॲ आणि ऑ….
अशाप्रकारे बाराखडीचे रूपांतर चौदाखडीत झाले. असे असले तरी ,आजही पटकन तोंडात मात्र बाराखडीच येते .आता म्हणाल बाराखडी -चौदाखडी काय घेऊन बसलाय? अहो मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय नाही का राहुल दादांनी ‘चौदाखडी’ दिला आणि बरं का आज समूहात चौदाखडी मात्र खूप मनमोकळी नाचली. ज्या काही रचना समूहात आल्या त्यांनी चौदाखडीला मात्र यथोचित असा न्याय दिला. तसेच इंग्रजीमुळे आलेल्या स्वरांनाही आपल्या बाराखडीने आनंदाने स्वीकारले. त्यासाठी तिने स्वतःचे नाव सुद्धा बदलणे मान्य केले.
हा मनाचा मोठेपणा ,भाषेचा मोठेपणा फक्त मराठी माणूस आणि मराठी भाषा यामध्येच आढळतो. सर्वांना सामावून घेण्याचा गुण, सर्वसमावेशकता नात्यांबरोबर भाषेनेही जपला आहे. अशाप्रकारे बाराखडीचा प्रवास चौदाखडी पर्यंत झाला .बालकाव्य लिहिणाऱ्या सर्व ताई दादांचे मनःपूर्वक अभिनंदन. राहुल दादांनी मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल शतशः आभार!! तूर्तास धन्यवाद!!!
शर्मिला देशमुख -घुमरे,बीड
परीक्षक/सहप्रशासक/लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह



