पाऊस माझा’ आजही मनात जपलेला..!!
वृंदा(चित्रा)करमरकर सांगली जिल्हा सांगली
‘पाऊस माझा’ आजही मनात जपलेला..!!
‘पाऊस’ माझा जिवाभावाचा सोबती ,सखा.अगदी लहानपणा पासून मी त्याच्या प्रेमात.पूर्वी खूप उकडायला लागलं की, हमखास संध्याकाळी हजेरी लावणार पाऊस,हे अगदी ठरलेलं. वार्षिक परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात असे. शेवटचा पेपर लिहिताना मला फार आनंद व्हायचा कारण आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार. त्यात त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या आई आणि मावशीचे एकत्रित चैत्रागौरीचं हळदीकुंकू असायचं. पेपर झाला की पळत घरी यायचं. आवरून नवे कपडे घालून तयार व्हायचं. पन्हे ,डाळीची कोशिंबीर, अत्तर, गुलाब पाणी देवीची आरास, अंगणात मस्त रांगोळी. देवीपुढं घरी केलेली शेव,चकली,करंजी फळे,खेळणी,कलिंगडाचं कमळ अशी आरास मांडली जायची.मधोमध झोपाळ्यावर बसलेली चैत्रागौरीची मूर्ती, फार छान आरास असे. यातच पाऊस यायचा. कपडे भिजतील म्हणून पावसात भिजता यायचं नाही पण मन आनंदानं भरून जायचं. मग हा वेडा असाच अचानक बरसा यचा मे महिन्यात सुद्धा. बरोबर. गारांचा खाऊ. पावसात भिजल्यावर आईचा धपाटा खावा लागला तरी काही वाटायचं नाही कारण भिजणं, गारा वेचणं एक अपूर्व सोहळाच असायचा.
मृगाचा पाऊस हमखास 7 जूनला पडायचा. मग पेरणीची गडबड. आमच्या सांगली आणि परिसरात पावसाचे आडाखे अचूक असत. ज्येष्ठात वटपौर्णिमे दिवशी आईबरोबर नदीकाठी असलेल्या मोठ्या वडाच्या पारावर जायचं. पावसात भिजायला तर मिळायचं. पण प्रसाद म्हणून जे गावठी आंबे आम्हाला मिळायचे (त्यांना साखरगोटी असा सुद्धा म्हणत.) त्यांचं फार अप्रूप असायचं. आषाढभेघ दाटून आलेले, भयंकर पाऊस. आषाढी एकादशी नंतर येणारा बेंदूर उत्साहात साजरा व्हायचा. घरी पुरणपोळी, मातीच्या बैलांची पूजा लाह्या, फुले वाहून करायची. दुपारी आईबरोबर शेजारी असलेल्यां शेतकऱ्यांच्या बैलजोडीची पूजा करायला जायचं. त्या बैलांना पुरणपोळी पुरणपोळी भरवत असे आई.
आम्हाला उत्सुकता हळूच बैलांना स्पर्श करायची. दुसऱ्या दिवशी आई, मावशी, खमंग कडबोळी करायची. त्या कडबोळ्या मातीच्या बैलांच्या शिंगांमध्ये अडकवून मग खेळायचं. त्या गरम कडबोळ्यांवर ताव मारायचा. बाहेर धुवाधार पावसाची कोसळ असेच. खरंच सण आणि पाऊस सांगडच असायची. मग नागपंचमीसाठी गरम यलगर जोंधळ्यांच्या लाह्या, लाह्यांचे सुंठ घालून केलेले जात्यावरचं पीठ, तंबिटाचे लाडू आई करायची. या खमंगपणाला पाऊस नादमय सोबत करायचा, तो आमच्या सर्व प्रसंगातील घरचा सभासदच जणू! श्रावणामध्ये घरातल्या आत्या,वहिनी यांची मंगळागौर आली की मजाच मजा. पत्री फुलं गोळा करायची. आसपास कुणाच्याही बागेत आमचा मुक्त संचार असे. दुर्वा आघाडा पत्री प्राजक्त, केवडा, सायली मोगरा जास्वंदी अशी रंग गंधाची उधळण. रात्री खेळ खेळताना पाऊस असायचा.
मग घरातच खुर्ची का मिरची, नाचगं घुमा, पिंगा, फुगड्या, झिम्मा नाना तऱ्हेचे खेळ खेळायचे.शनिवारी सकाळी शाळा असायची. हमखास हा लबाड घरी परतताना गाठायचा. चपलांमुळं कपड्यांवर चिखलाची नक्षी होत असे. त्यावेळी मला याचा राग यायचा. ढगाळ वातावरण. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट हे कुणालाही नीरस वाटणारं वातावरण मला अतिशय आवडतं. सगळी सृष्टी एकरूप होऊन जवळ यावी असं मला वाटतं. पक्षी पण किती शांत राहतात यावेळी. जणू कोणी राजा विराजमान होत आहे असं वातावरण. फक्त या पावसाचीच हुकूमत.
पावसाळ्यातली आणखी एक धमाल आठवण. आमच्या सांगली पासून तीन किलोमीटर अंतरावर हरीपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात संगमेश्वर हे शंकराचे देऊळ आहे कृष्णा वारणा नदीकाठचा हा गाव नद्यांच्या संगमावर. कृष्णा वारणा नदी यांच्या संगमावर हे गाव वसलेलं आहे. इथे श्रावण महिन्यामध्ये. दरवर्षी. सोमवारी जत्रा भरायची. अजूनही ही जत्रा इथं भरते. चालत चालत हरीपूरला जायचं तिथं वेगवेगळी खेळणी असायची. दोन पैसे, पाच पैसे किमतीला पाण्याचा चेंडू, चक्र, कुडमुडं, टिकटिक तसेच हिरव्या चिंचा, आवळे पेरू हा आमचा आवडता मेनू .अर्थात त्यावेळी पाऊस असायचाच. पावसाबरोबरच जत्रेचा आनंद लुटायचा . मी माझ्या मोठ्या बहिणी बरोबर जायची. त्यावेळी ती माझ्याकडे जातीनं लक्ष द्यायची. एरवी भांडणारी ताई त्यावेळी मात्र मोठेपण घेत असे. पावसात भिजत कुडकुड त, चिंचा आवळे खात आणि खूप आनंद बरोबर घेऊन आम्ही परत यायचो.. शिवाय पिशवीत घेतलेली खेळणी असायचीच.
महाविद्यालयीन दोन वर्ष झाल्यानंतर माझं लग्न झालं. सासरी आमचं घर मातीचं होतं आणि वर पत्रे आणि कौलं होती. माझं वय लहान होतं. कधीतरी रात्री आई-वडिलांची खूप आठवण यायची. त्यावेळी जर पाऊस पडायला लागला तर पत्र्यावर येणारा त्याचा आवाज मला फार आश्वासक वाटायचा. जणू तो मला कुशीत च घेत आहे असं वाटायचं. त्यावेळी बालपणीच्या आठव णीत दंग होत नकळत मी झोपेच्या स्वाधीन व्हायची. असा प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी पाऊस माझा साक्षी आहे. गणेशोत्सव, दसरा, नवरात्रातला भोंडला प्रत्येक क्षणाला हा पाऊस हजर आहेच त्यात नवरात्रातील माळेत सापडला तर बोलायची सोयच नाही! हस्तातील पाऊस अगदी हत्तीच्या सोंडेसारखा अक्षरशः झोडडपून काढायचा. आम्हाला लहान मुलांबरोबर तो लहान व्हायचा त्याला परतायचं नसायचं पण निसर्ग नियमापुढे त्याचाही काही चालत नसेल असाच एक दिवस तो निघून जायचा, पण मनात त्याचं हसर रूप वनराई हिरवीगार. करण्याची त्याची जादू. हुकूमत मनात घर करून आहे अजूनही.
“तुझे नी माझे नाते आगळे, शब्दांच्याही पलीकडले,
तुझ्या वाटेकडे लागले, नयन माझे आतुरलेले..!!
“चिंब ओल्या तव स्पर्शात, शत चांदण्यांची बरसात,
जशी ऊब मातेच्या मायेत, तेच प्रेम तव जपले मनात.,!!
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली



