ऋणनिर्देश आजपावेतो; बी डावकरे
ऋणनिर्देश आजपावेतो; बी डावकरे
संस्काराच्या शिदोरीवर
सन्मार्गाने मी चालत गेलो
ऋणानुबंध जुळले असे की
प्रत्येकाशी मी जोडत गेलो
२४ डिसेंबर हा माझा जन्मदिन.माझा पहिला वाढदिवस २४ डिसेंबर १९९९ ला मी डीएड कॉलेजला असताना माझ्या तत्कालीन ABSRT2 या सवंगड्यानी साजरा केला तो माझ्या आयुष्यातल्या पहिला वाढदिवस होय. तदनंतर मी २८ नोव्हेंबर २००३ ला जिल्हा परिषद शिक्षक म्हणून प्रा.शा.भेंडेगाव खुर्द शाळेत सेवेत रुजू झालो. सुरुवातीच्या काळात गावकऱ्यांशी ओळख होण्यामध्ये चार-पाच महिन्याचा कालावधी गेल्यानंतर खरंच भेंडेगाव येथील प्रत्येक घराघराची व घरातल्या सदस्यांची ओळख झाली आणि तिथून आमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले जे आजतागायत कायम आहेत.
२४ डिसेंबर २००८ हा माझा बऱ्याच वर्षाच्या अंतरानंतर माझे सहकारी श्री सुनील बनकर व सौ. वनिता राठोड यांनी केलेला दुसरा वाढदिवस.तिथून पुढे दरवर्षी आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवस विविध शालेय उपक्रमाने शाळेत साजरे करत असू. २००८ ते २०१३ या सहा वर्षांमध्ये न चुकता माझा वाढदिवस माझ्या विद्यार्थी, गावकरी व सहकाऱ्यांनी साजरा केला हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही.
दि ८ ऑगस्ट २०१३ रोजी माझी तेथून ब्रॅंच शाळा मुखेड या ठिकाणी नवनियुक्त पदावर बदली झाली. नवीन शाळा व जवळपास १००० विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. सेमीची शाळा म्हणून तिचा नावलौकिक होता. त्या ठिकाणी प्रथमतः थोडासा मी बावरलो पण लगेच स्वतःला सावरून विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन प्रामाणिकपणे अध्यापनासह शालेय कार्य पार पाडत गेलो. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले जे आजतागायत चालू आहे आजही भेंडेगाव खुर्द असो किंवा ब्रॅंच शाळा असो या शाळेतील शिक्षक व जवळपास बहुसंख्य विद्यार्थी आजही न चुकता वाढदिवसाच्या व गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला विसरत नाहीत. हा ऋणानुबंध सदैव अखंड चालू राहील यात तीळमात्र शंका नाही. भेंडेगाव शाळेतील परंपरा यापुढेही माझ्या ब्रॅंच शाळेतील विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी चालू ठेवून दरवर्षी माझा जन्मदिवस साजरा करत होते.
२९ में २०१८ रोजी तेथून माझी बदली प्रा शा चौकी महाकाया तालुका कंधार शाळेत झाली. चौकी गाव पुनर्वसीत आहे.गावची लोकसंख्या जवळपास ७०० च्या आसपास आहे. गावात विविध जाती धर्मांची लोक राहतात आणि एकमेकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात जातीभेदाच्या भिंती तोडून उपस्थित राहतात याचं अप्रूप मला त्या ठिकाणी अनुभवायास मिळालं. गावातील बहुसंख्य माणसे ही शेतमजूर आहेत, ऊसतोड कामगार आहेत, मिस्त्री काम करणारे लोक आहेत.पण शाळेच्या दृष्टीने प्रत्येकाची दृष्टी अतिशय सकारात्मक होती. शाळेला जी काही मदत लागेल ती आम्ही सांगितल्याबरोबर लगेच प्रत्येकाचा होकार असायचा. तिथेही माझा वाढदिवस माझे सहकारी मुख्याध्यापक पाटील सर यांनी मोठ्या भावासारखे प्रेम मला त्या ठिकाणी दिलं आणि २०१८ ते आज २४ डिसेंबर २०२४ इथपर्यंत दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करतात.शाळा ही चौथीपर्यंतचीच आहे, पण त्या ठिकाणचे विद्यार्थी आमच्या दोघांशी आणि आम्ही विद्यार्थ्यांशी एवढे एकरूप झालेलो आहोत की, चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आम्ही जणूकाही त्यांचे मित्रच आहोत असं अनुभवायला मिळतं.
भीतीचा कुठलाही लवलेश त्यांच्या मनामध्ये दिसत नाही,त्याचं कारण आम्ही मुलात मूल होऊन त्यांच्याशी वागतो आणि ती सुद्धा आम्हाला लळा लावतात.त्यातूनच काल माझा जो वाढदिवस या चिमुकल्यांनी साजरा केला तो कायमस्वरूपी माझ्या निश्चितच स्मरणात राहील. असा सुखद अनुभव मला माझ्या विद्यार्थ्यांनी दिला.
लोक वेडावतील असे
कार्य घडावे मज हातून
कीर्तीचा दरवळावा सुगंध
यावेत पुन्हा हे क्षण परतून
माझ्या गावातील माझा मित्रपरिवार, नातेवाईक व माझं कुटुंब यांच्याकडून नेहमीच शुभेच्छांचा वर्षाव होतो.
एवढं प्रेम, माया, आपुलकी,
जिव्हाळा, ममता, वासल्य आजपर्यंतही माझ्या विद्यार्थी,गावकरी व सहकाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल जागृत आहे याचंच कारण म्हणजे, निश्चितच माझ्या हातून शंभर टक्के नाही पण काही अंशी तरी सत्कार्य व सत्कर्म घडलेलेच असेल असा मला ठाम विश्वास आहे.यापुढेही असेच आपले ऋणानुबंध अखंडपणे वृद्धींगत होत जावेत अशी आपल्याकडून अपेक्षा करून आपले आभार न मानता कायम आपल्या ऋणात राहील.
नको मजला देवा सोनं नाणं
हिरे आणिक माणिक मोती
अखंड असू दे तव कृपादृष्टी
राहू दे संगतीला सखेसोबती
श्री बळवंत शेषेराव डावकरे
सहशिक्षक
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



