‘जिथे होकाराची आस तिथेच मनधरणी ठरते खास…!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
‘जिथे होकाराची आस तिथेच मनधरणी ठरते खास…!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
हा रुसवा सोड सखे…..
पुरे हा बहाणा, सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविणा, घडला काय गुन्हा
बनलो निशाणा, सोड ना अबोला….
खरं सांगू का…? वरील ओळींमधील तरल प्रीत उरलीय का जगात…? अवखळ, अल्लड प्रेयसीचे रूसणे आणि त्या रूसण्याला तेवढ्याच तलम रेशीमबंधी शब्दांनी मनधरणी करणे… किती लोभस, किती विलोभनीय…. मोहम्मद रफींचा तो मधाळ आवाज, कवयित्री वंदना विटणकरांचे शब्द आणि श्रीकांतजी ठाकरे यांचे ठसकेबाज संगीत….खरंच मनधरणी म्हटले की, नकळत हेच गीत ओठ गुणगुणू लागतात….’सोड ना अबोला…’!
‘मराठीचे शिलेदार’ समूहात ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘मनधरणी’, विषय दिला आणि मन या गाण्याभोवती पिंगा घालू लागले. कोण ? कशी? कुणाची ? मनधरणी करेल हे सांगता यायचे नाही. मात्र ज्याची मनधरणी करायची आहे, ती व्यक्ती नक्कीच मनाच्या कोपऱ्यात घर करून असते. ‘नाते जुळले मनाशी मनाचे…’, म्हणत जेव्हा प्रीतीचा राग आळवला जातो तिथेच मनधरणी शक्य असते. आता हे नाते फक्त प्रियकर-प्रेयसीचे असावे असेही काही बंधन नाही. आईने एक घास चिऊचा एक घास काऊचा म्हणत बाळाला जेवण भरवण्याची मनधरणी असो वा बळीराजाची पावसाला आळवणी असो…जिथे होकाराची आस तिथेच मनधरणी खास…!
‘मराठीचे शिलेदार’ समूहात फेरफटका मारताना ‘नका करू मनधरणी, शिडकावा देऊन पहा.. अंतरी तिच्या करूणेची, धार बरसून पहा’, किती आर्तता या विनवणीत…सौ. सविता पाटील ठाकरे, सिलवासा यांनी आपल्या नाविण्यपूर्ण लेखणीचा बाज या ओळींतून अधोरेखित केला…तर मृदुला कांबळे, गोरेगाव-रायगड, यांनी ऐतिहासिक हिरकणीची बाळाच्या ओढीपोटी पहारेकऱ्यांची केलेली मनधरणी ह्रदयाला स्पर्शून गेली. नीलाताई पाटणकर, शिकागोहून रूसलेल्या शब्दांची मनधरणी करतात आणि फुरंगटलेली कविता नव्याने जन्म घेते…भगवान गायकवाड दादा तर सत्तेच्या बाजारात संख्याबळ वाढावे म्हणून नेतेमंडळींनी केलेली मनधरणी हूबेहूब वर्णन करतात. तर शर्मिला देशमुख-घुमरे या तर स्वतःच्याच मनाची मनधरणी करण्यात गुंग होतात…! अशा आपणा सर्वांच्या मनधरणीचे खूप खूप अभिनंदन… आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





