‘रायबा’…मस्त भट्टी जमली बा….!
अभय लांजेवार उमरेड,जि.नागपूर
‘रायबा’…मस्त भट्टी जमली बा….!
प्रणा, पोट्टी, पटराबाई, पूर्वाश्रमीची भोंड..!! आत्ताची प्रणाली राऊत. अनेक वर्षापासूनची तिची तपस्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘रायबा ईमानदार’ या चित्रपटातून फळाला आली. कधी काळी पथनाट्य, एकांकिका आणि दोन अंकी नाटकांमधून तुम्ही आम्ही अनेकांनी तिचा अभिनय बघितला. तिच्या अभिनयाची ताकद, तिच्यातील अभिनयाच्या विविधरंगी छटा रसिक मनाला दाद मिळविणाऱ्याच ठरल्या.
दरम्यान अनेक मराठी चित्रपटे आली आणि गेली. आम्ही अनेकदा प्रणालीला प्रश्न विचारला, चित्रपटात तू कधी ग बाई..?? दिनांक १२ सप्टेंबरला तिचा ‘लीड रोल’ असलेला
‘रायबा ईमानदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिने आम्हाला चोख उत्तर दिले. ‘बोलक्या डोळ्याची प्रणाली हिरोइन झाली’. आनंदी आनंद झाला. तिच्या अभिनयातील परिपक्वता आणि बारकावे तिने मोठ्या पडद्यावर छान रेखाटले.
पहिल्याच चित्रपटात इतका उत्तम अभिनय…’हम किसीसे कम नही’ हे तिने दाखवून दिले. प्रणाली, तू मोठी आहेसच, यात वाद नाही. आणखी मोठ्ठी व्हावी, यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा. सोबतच ज्यांनी तुला हिंमत दिली, त्या सर्वांचे, परिवाराचे अभिनंदन. डॉ. नरेशभाऊ गडेकर यांनीही दमदार अभिनय करीत आपली भूमिका मस्त रंगविली. आई म्हणून शोभना मोहरील खरोखरचं अगदी टिपिकल शोभल्या. दीपक शिर्के, संजय खापरे, विनोद राऊत, शिल्पा शाहीर, बाळू इंगळे यांचेही रसिक म्हणून तोंड भरून कौतुक केलेच पाहिजे.
सरतेशेवटी निर्माता- लेखक सचिनजी घोडे यांच्या हिंमतीला आमचा सलाम. संत्रानगरी नागपूरच्या मातीमधील कलावंतांचा सुगंध त्यांच्यामुळे सर्वत्र दरवळला. अनेक समस्यांवर मात करीत छातीठोकपणे चित्रपट प्रदर्शित केला. आपलेही मनापासून अभिनंदन ! मी चित्रपट बघितला. आपणही अवश्य बघा… ‘रायबा’…. मस्त भट्टी जमली बा!
अभय लांजेवार
उमरेड,जि.नागपूर



