Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

अर्थार्थ

डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, जि.नागपूर

0 6 0 5 0 3

अर्थार्थ

‘अर्थ’ या दोन अक्षरी शब्दाबद्दल बरेच वाद, विसंवाद, प्रतिवाद आपण नेहमीच ऐकतो. पण एक जनसामान्य मराठी माणूस याबद्दल किती टक्के जागृत आहे? याचे उत्तर टक्केवारीत पाहता , ते काही दोन अंकी आकड्यात येतांना दिसत नाही. कारण यातील फक्त स्वत:बद्दल असल्याशिवाय कोणत्याही अर्थाशी सामान्य मराठी माणसाचा साधा परिचय देखील असेल असे व्यवहारात दिसून येत नाही. सर्व सामाजिक समज ही अर्थ म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा विधानाचा साधा, भाव, तात्पर्य , मतलब असा घेत असतो. पण याचेच विविध प्रकार असतात किंवा असू शकतात हेच जनसामान्यांना कधीही संगितले जात नाही. आमच्या आजकालच्या तथा कथित हाय एज्युकेशन समजल्या जाणार्‍या इंग्लिश माध्यमातील सीबीएसई वगैरे शाळांत हे काहीही शिकवले जात नाही. मग आमच्या भावी पिढीला हे कसे आणि कधी समजेल? याच विचाराने हा लेखप्रपंच करीत आहे.

सगळ्यात आधी आपण बघूयात की जवळ जवळ समस्त माध्यमे ही, अर्थसंकल्प, ‘अर्थपूर्ण ‘ वाटाघाटी किंवा संबंध असले मथळे देऊन बरेच लेखन करतात. यामुळे लोकांना समजलेला ‘अर्थ’ याचा अर्थ पैसा हे जगजाहीर आहे. यातून अतिसामान्य अशिक्षित किंवा अर्धशिक्षित समाजाला हे सारे पैश्याच्या संबंधी आहे हे नक्की समजते. पण जेव्हा कोणीही राजकारणी नेता काहीही वक्तव्य करतो आणि नंतर पलटी मारून शाब्दिक च्छल करून माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता वगैरे म्हणून स्वत:ची सुटका करून घेतो, तेव्हा त्या सन्माननीय न्यायालयात इंग्लिश भाषेत त्या नेत्याच्या विरुद्ध केस चालविणारे तज्ञ मंडळी हे “ माझ्या मराठीचा बोल कावतुके, अमृताते पैजा जिंके!” असे पटवून देऊ शकणे अवघड असते, कारण आंग्ल भाषा आमच्या मराठीच्या पत्रासही लागू शकत नाही. म्हणूनच आज माझा उद्देश आमच्या मराठी बांधवांना या अर्थाचे प्रकार व त्यांचे सर्वार्थ सांगणे हा प्रयत्न आहे.

आपण आता क्रमवारी लाऊन एकेका अर्थाच्या स्वरूपाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करुयात.

मतीतार्थ : म्हणजे आपल्या मती उर्फ बुद्धीस जो अर्थ समजणे अपेक्षित आहे तो अर्थ. आपण लहानपणी ससा व कासव यांच्या शर्यतीची गोष्ट ऐकलेली असते. या गोष्टीच्या पासून आपण जो बोध घेणे अपेक्षित आहे तो असा की मनुष्याने आपल्या अंगतील असलेल्या क्षमतेचा गर्व बाळगून दुसर्‍यास तकलादू समजून बेफिकीर राहिल्यास, जसा ससा मध्येच झोपून राहिला तसे, तर आपणास पराभवास सामोरे जावे लागते. हा बोध म्हणजेच या गोष्टीचा ‘मतीतार्थ ’ होय.

भावार्थ : ह्याचा उपयोग आपणास बहुतांशी पौराणिक व लोककथेमध्ये केलेला आढळतो. यात उल्लेखलेले चमत्कार हे खरे खरे तसेच घडलेलेच असले पाहिजे असे नाही. तर जनमानसावर एखाद्या भावनेचा ठसा उमटावा असे वाटत असल्यास असल्या कथांचा उपयोग करण्यात येतो. जसे की महान संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या गाथा तीन दिवसांनी गंगेने न बुडविता परत केल्या. यात गंगा याचा अर्थ नदी नसून जनगंगा म्हणजेच जनतेने हृदयात जपलेल्या गाथांचे पाठ असलेले अभंग पुनः विदित करून पुनर्गठीत केले. पण गंगेने न बुडविता परत केल्या या वाक्याचा आपण भावार्थ जाणून घेतला पाहिजे, शब्दार्थ नाही.

शब्दार्थ: शब्दार्थ हा केवळ अक्षर समूहात दडलेला भाषारचनेचा अर्थ असतो ज्याचे एकापेक्षा जास्त अर्थही निघू शकतात. उदाहरण बघूयात, जसे की ‘पाणी’ याचा सामान्यपणे घेतला जाणारा अर्थ म्हणजे जल. दुसरा अर्थ म्हणजे हात. जसे पाणीग्रहण, म्हणजे वराने वधूचा हात ग्रहण केला उर्फ स्वीकारला. त्या वरूनच तुमच्या कन्येचा हात मागायला आलो असा वाक्प्रयोग तयार झाला. तिसरा अर्थ म्हणजे क्षमता, दम ! या माणसात काही पाणी दिसत नाही हा वाक्प्रचार.

व्यंग्यार्थ : एखाद्याला टोमणा मारण्यासाठी मुद्दाम उलटे बोलणे, लिहिणे केले असल्यास त्यातून अपेक्षित काढावा असा अर्थ. आपण टोमणा मारण्यासाठी एखाद्याला हो हो तूच मोठा हुशार आहेस असे बोललो किंवा एखाद्या लुकड्या माणसाबद्दल हं… माहिती आहे तो पैलवान असे संबोधतो, तेव्हा ऐकणार्‍या माणसाने नेमका उलट अर्थ घ्यावा अशी आपली अपेक्षा असते त्या वेळेस हुशार किंवा पैलवान शब्दांनी मिळणारा बोध म्हणजेच व्यंग्यार्थ होय.

ध्वन्यर्थ: वाक्याचा अर्थ बोलतांना केलेल्या शब्दांवर घेतला जात नसून बोलतांना केलेक्या ध्वनीमधून निघतो. जसे एखाद्याचे स्वागत करतांना या म्हणतो तेव्हा आवाजात असलेली सात्विकता स्वागत दर्शविते. पण एखाद्याला कोणी रागाने या आता ! असे म्हटले तर त्याचा अर्थ आता चालते व्हा असा होतो. हो हो तुमचेच बरोबर आहे असे वादात वेगळ्या स्वरात बोलले म्हणजे तुमचे चूक आहे असा होतो हे त्या वेळेच्या ध्वनीवर अवलंबून असते.

काव्यर्थ: काव्यात जर एखाद्या तरुणीच्या सौंदर्याचे वर्णन हरिणी सारखे डोळे, चाफ्याच्या फुलासारखे नाक, नागिणी सारखी वेणी असे असले म्हणजे ते शब्दश: घ्यायचे नसते. काव्यातील शब्दांचा खरा अर्थ टपोरे काळे डोळे, रेखीव सरळ नाक. लांबसडक वेणी असे घ्यायचे असते.

वाच्यार्थ: वाचे द्वारा म्हणजे बोलण्यातील शब्दांना अभिप्रेत असलेला अर्थ. त्या शब्दांना तसे च्या तसे समजायचे नसते. जसे ह्यांचे हृदय समुद्रा एवढे मोठे आहे. अमूक अमूक यांचेकडे कुबेराचा खजिना आहे. पण ते शब्दश:घ्यायचे नसून त्याचा अर्थ हे खूपच दयाळू आहेत व ते खूप श्रीमंत आहेत एवढाच असतो.

गर्भितार्थ : या प्रकारचा अर्थ त्या वाक्याच्या गर्भात दडलेले अर्थ असा असून आपण बोलतो. एक पण ज्याला समजणे अपेक्षित आहे फक्त त्यालाच तो समजतो इतरांना सर्व साधारण अर्थ कळतो. सामान्यत: असले संवाद आपले गुप्त कार्य करणारे विभाग असले संवाद कौशल्या दाखवतात. उदाहरणार्थ, भारताने जेव्हा पहिलं अणुपरीक्षण यशवी केले तेव्हा परकीय लोकांच्या समोर आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगण्यात आले की “मॅडम, बुद्ध हसला !” त्यांना त्याचा गर्भित अर्थ समजला. असल्याला इंग्रजीत कोड वर्ड म्हणतात.

लक्ष्यार्थ : यालाच हिंदीत ‘कहींपे निगाहे काहींपे निशाणा’ म्हणतात. ज्याचा अर्थ आपले जे लक्ष आहे त्यालाच समजते. असली भाषा प्रेमीजनांना चांगलीच जमते. मुलगा / मुलगी आपल्या अंगणातून ओरडून मी निघालो कॉलेजला असे आपल्या आईला सांगतो तेव्हा शेजारील प्रियेला तू लवकर ये मी पोहोचतोच आहे असला संदेश देतो.

अनेकार्थ : एकाच शब्दाचे जेव्हा अनेक अर्थ निघू शकतात, तेव्हा त्या शब्दाचा अर्थ संदर्भावर अवलंबून राहतो. उदाहरण. झाडाचे पान हिरवे असते, पुस्तकाचे पान नंबर 11 वर असे लिहिले आहे. जेवायचे पान वाढून तयार आहे. मला बनारसी पान आवडते. वगैरे वगैरे.

प्रतिकार्थ : एखादे म्हणणे ठासून सांगतांना वापरलेले प्रतीक सांगते. जास्त शब्द वापर करण्याची गरज नसते. जसे पहाडी छाती, लोखंडी हृदय , दगडी मन, सशाची हिम्मत असे.

समानार्थ : दोन शब्दांचा एकाच अर्थ असल्यास त्याला समानार्थ म्हणतात, जसे गोड आणि मधुर.

विरुद्धार्थ : दोन शब्दांचे अर्थ एकमेकांच्या एकदम विपरीत असतात त्याल विरुद्धार्थ म्हंटले जाते. जसे जाड आणि बारीक.

परमार्थ : ज्या लिखाणाने, काव्याने, वक्तव्याने, शाब्दिक अर्थाला अजिबात महत्व न देता सगळ्याचा अर्थ ईश्वराच्या स्तुती, आत्मा परमात्मा वगैरे दिशेकडे असून त्याचा अन्य अर्थ काढणे गैर असते त्यास परमार्थ म्हणतात.

स्वार्थ : ज्या लिखाणाने, काव्याने, वक्तव्याने, शाब्दिक अर्थाने जर केवळ ते लिखाण, काव्य, वक्तव्य करणार्‍याचे वैयक्तिक लाभ मिळाळणे हा उद्देश लक्षात येत असेल त्यास स्वार्थ म्हणतात.

अनर्थ : ज्या लिखाणाने, काव्याने, वक्तव्याने, शाब्दिक अर्थाने जर केवळ ते लिखाण, त्या कर्त्याच्या इच्छित अर्थाच्या विरुद्ध शाब्दिक कीस पाडून बवाल निर्माण करण्यात येत असेल, तर त्याला अनर्थ म्हणतात. आता सामान्य माणसाने कोणत्याही नेत्याने, लेखकाने, कवीने केलेल्या लिखाणाने, काव्याने, वक्तव्याने, शाब्दिक अर्थाने लगेच व्यथित, उत्तेजित न होता सर्वार्थाने त्याचे विश्लेषण करून मगच प्रतिक्रिया देण्याचे ठरवावे हीच प्रार्थना !

डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, जि.नागपूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे