
0
5
9
0
3
4
चिरहरण
कौरवांची फोफावे जमात,
नारीचा करण्यासी घात;
आजही द्रौपदीचा टाहो,
ऐकू येतो दिशादिशांत
रूप बदलूनी फिरती जगी
दु:शासनाचे हात अजूनी
लुटती दिवसा ढवळ्या
भोग्य नारीला ते मानूनी
पाहून कुणी छद्मी हसती
किंकाळ्या हवेत विरती
निर्भयांचे बळी हो जाती
षंढ काही नुसते बघती
विटंबना नारीची होताना
रील बनवती दगडी पुतळे
संवेदनाच सारी हरपली
सोयर सुतकची कुठले?
वासनांध ते जगी व्यापले
नीतिमत्ता वेशीवर टांगली
मानवतेच्या मानेवरूनी
खुशालची सुरी फिरवली
तेंव्हा द्रौपदीसी रक्षण्या
श्रीकृष्ण धावूनी आला
आता अंतर्मनात, नारी
जागृत ठेव कृष्णतत्वाला
नारी तू असशी सबला
हेच तू ठेव गं ध्यानी
असुरी वृत्ती ठेचण्यासी
येई तू शस्त्र परजूनी
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
0
5
9
0
3
4



