चला पर्यटनाला जाऊ या…! शिखर शिंगणापूर पाहू या..!!
सौ. स्वाती मराडे-आटोळे
चला पर्यटनाला जाऊ या…!
शिखर शिंगणापूर पाहू या..!
शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील गाव. हे गाव शंभू महादेवाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी महादेवाची मोठी यात्रा भरते व यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच दक्षिण भारतातून लोक येतात. सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी गावापासून २० व सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून १५ किमी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक मानतात. या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर व सभामंडपात अगदी नाजूक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या बाजूला पायऱ्या उतरून अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. पाण्यासाठी भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी येथे इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत. त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.
शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुक्ल अष्टमीला शंकर व पार्वती विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वऱ्हाडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस ते श्री अमृतेश्वर बळी मंदिराच्या शिखराला पागोटे (सुताची जाड दोरी) म्हणून बांधला जातो. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात.
या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती तेल्या भुत्याची. जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज यांची कावडीची परंपरा आजही कायम आहे. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी असते. मुंगी घाटात कोणताही दोर न लावता मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर केला जातो या कावडीस पाहण्यासाठी शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून शिव नामाचा जयघोष करतात. शंभु कृपेने घाटातील अवघड टप्पे पार करत मुंगी घाट सर करून कावड वर जाते, शिवभक्तांचा आनंद गगनात मावेनासा होतो .. महादेवाला पवित्र कऱ्हा संगमाच्या पाण्याने अभिषेक केला जातो व यात्रेची सांगता होते.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



