
कट्टी फू
कुणी केले भांडण
मी की तू.. मी की तू ?
बोलणारच नाही आता
कट्टी फू.. कट्टी फू..!
खेळत होतो आपण
लपाछपीचा खेळ
सापडतच नव्हते मी
लागला किती वेळ
ढकलून दिले मला
तेव्हा तू.. तेव्हा तू
बोलणारच नाही आता
कट्टी फू.. कट्टी फू..
ढकलले ते ढकलले
वर दिलास रपाटा
मीही मग उलटून
मारला तुला धपाटा..
समजूनच घेत नाहीस
जरी आहेस मोठा तू
बोलणारच नाही आता
कट्टी फू.. कट्टी फू..
धपाटा मी देताच
डोळे कसे वटारले
मीही मग वाकुल्यांनी
तोंड तुला वेडावले..
चुकले कोण सांग आधी
मी की तू.. मी की तू?
बोलणारच नाही आता
कट्टी फू.. कट्टी फू..
खरंच गं चुकलं माझं
केली तुझी खोडी
सहज खेळता खेळता
गंमत केली थोडी..
कान पकडून विनवतो
नको अशी रूसू..
देईन तुला खाऊ
नको ना ती कट्टी फू..!
करीन तुझे लाड खूप
म्हण बरं बट्टी तू..!
तुझ्यावाचून करमत नाही
नको ना ती कट्टी फू..
नको ना ती कट्टी फू..!!
स्वाती मराडे-आटोळे
ता.इंदापूर,जि.पुणे



