Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखबीडमराठवाडासाहित्यगंध

कृतज्ञतेचा सण ‘नागपंचमी’

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0 5 9 4 1 4

कृतज्ञतेचा सण ‘नागपंचमी’

श्रावण हिरवळीत भुलवी
रिमझिम सरींचा गोड गंध
वेड लावितो नारी मनाला
झिम्मा फुगडी झोका छंद..!

श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा उत्सव. हिरवाईने नटलेली धरती, रिमझिम पाऊस, फुलांचा सुगंध आणि सणांची लगबग मनाला प्रसन्न करून जाते. याच श्रावणातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे नागपंचमी होय. नागपंचमी म्हटले की, आठवते ती अंगणातील सुंदर रांगोळी, पाटावर किंवा भिंतीवर काढलेली नागाची प्रतिमा, फुलांची आरास आणि भक्तिभावाने केलेली वारुळाची पूजा. ग्रामीण भागात तर या सणाला विशेष उत्साह असतो. माहेरवाशिणींची लगबग, झिम्मा-फुगडीचा आनंद, पंचमीचा फेर आणि पारंपरिक गाणी, सणाच्या निमित्ताने होणारी नातेवाईकांची भेट. या सगळ्यामुळे नागपंचमीला एक वेगळेच भावविश्व लाभते.

भारतीय संस्कृतीत नागाला प्राचीन काळापासून आदराचे स्थान आहे. भगवान शंकराच्या गळ्यातील नाग असो किंवा भगवान विष्णूची शेषनागावरील शयनमुद्रा असो, नागाचे अस्तित्व आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

“फुलांनी सजली पूजा
नागदेवतेच्या चरणी
श्रद्धेचा निर्मळ भाव
आनंद ओसंडला मनी..!”

मात्र या सणाचा अर्थ केवळ पूजेपुरता मर्यादित नाही. निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे. “साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र..!” याचे कारण तो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांसारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे सापांविषयीची भीती आणि गैरसमज दूर करून त्यांच्याबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक युगात सण साजरा करताना परंपरेसोबत पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे. जिवंत साप पकडून त्यांची पूजा करण्याऐवजी नागदेवतेची प्रतिमा किंवा मातीची मूर्ती पूजणे योग्य ठरेल. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवून संबंधित “सर्पमित्र ” किंवा वन्यजीव बचाव पथकाची मदत घ्यावी.

नागपंचमी आपल्याला एक सुंदर संदेश देते. माणूस निसर्गाचा मालक नाही, तर त्याचा एक भाग आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. परंपरेची मुळे जपत, अंधश्रद्धेला दूर ठेवत आणि निसर्गसंवर्धनाची जाणीव मनात रुजवत नागपंचमी साजरी केली, तर या सणाला खऱ्या अर्थाने मंगल स्वरूप प्राप्त होईल.

“नागदेवता नि निसर्ग जपूया
जीवसृष्टीचा मान राखूया
श्रद्धेला संवेदनशीलतेची
देऊन जोड आपण सारे
अन्नसाखळी रक्षण करूया…!”

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे