‘रिसॉर्ट विवाह’ एक नवा आजार
कुसुमलता दिलीप वाकडे
‘रिसॉर्ट विवाह’ एक नवा आजार
पूर्वी घराच्या अंगणातच वडाच्या पानाचे मांडव टाकले जायचे नातेवाईक, पाहुणे तीनचार दिवस पूर्वीच यायचे काय तो नात्यातील गोडवा रूसवे,फुगवे, ओरडणे, हसणे गप्पा गोष्टी कसला मोबाईल न कसलं काय माणुसकी जपली जायची हळद घरीच वाटायची स्वयंपाक ज्याला जास्ती लोकांचा करता येत असेल, तोच नातेवाईक स्त्री असो कि, पुरुष मोठ मोठी विटाच्या चुलीवर गंज ठेवून स्वयंपाक करायची.नंतर घरीच वडाच्या पानाच्या ऐवजी कापडी मांडव पडू लागला. कालातरांने घराच्या ऐवजी आता सभागृह, मंगल कार्यालय यांनी लग्नसमारंभा करीता जागा घेतली पाहुणे मंडळी किंवा नातेवाईक आता लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच हळदी ला येऊ लागली लांबची पाहुणी लग्नानंतर एक दिवस थांबली तर थांबली अन्यथा सभागृहातुन तिकडूनच परत जायची.पूर्वी खेडेगावातील लग्न असेल तर काय तो पंगतीत बसून जेवणाचा थाट आणि रेंगीतून वरात निघायची अहाहा तो काय नजारा.
आता मंगल कार्यालयाचा वापर लग्न समारंभासाठी होत नाही, ही सर्व ठिकाणं आता निकामी झाली आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातल्या मंगल कार्यालयात लग्न होणं सामान्य होतं, पण तो काळही आता संपत आला आहे. आता शहरापासून दूर महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ होऊ लागले आहेत. लग्नाच्या दोन महिने आधीपासूनच हे रिसॉर्ट बुक केली जातात आणि संपूर्ण कुटुंब लग्नाच्या दोन दिवस पूर्वीच तिथे स्थलांतर केल जात. पाहुणे थेट तिथेच पोहोचतात आणि तिथूनच निरोप घेतात. इतक्या लांबच्या समारंभाला स्वतःचे चारचाकी वाहन असलेलेच पोहोचू शकतात. आणि खरी गोष्ट म्हणजे आमंत्रण देणाऱ्यालाही हेच हवं असतं की, केवळ कारधारक आणि “स्टेटसवाले” पाहुणेच येवोत. आता २-३ प्रकारची आमंत्रणं दिली जातात. फक्त महिलांसाठी संगीत कार्यक्रमासाठी फक्त रिसेप्शनसाठी फक्त कॉकटेल पार्टीसाठी आणि काही VIP लोकांना सर्व कार्यक्रमांसाठी. या प्रकारच्या निमंत्रणात आपलेपणाची भावना राहिलीच नाही, केवळ उपयोगी लोकांनाच बोलावलं जातं.
महिला संगीतासाठी संपूर्ण कुटुंबाला डान्स शिकवण्यासाठी महागडे कोरिओग्राफर १०-१५ दिवस ट्रेनिंग देतात. मेहंदी लावण्यासाठी कलाकार बोलवले जातात, हळदीसाठी सुद्धा एक्सपर्ट नेमले जातात. मेहंदीच्या कार्यक्रमात सगळ्यांना हिरव्या रंगाचे कपडे घालणे अनिवार्य केले जाते. जो न घालेल त्याला कमी समजले जाते. म्हणजेच कमी दर्जाचा मानला जातो. ब्युटी पार्लर २-३ दिवसांसाठी बुक केले जातात. यानंतर हळदीचा कार्यक्रम होतो. इथे सगळ्या स्त्रीयांनी पिवळी साडी व पुरुष मंडळीनी पिवळा कुर्ता-पायजमा घालणे गरजेचे असते. जो हे न पाळेल त्याला देखील कमी लेखलय जातं.प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या खोलीत राहतं, त्यामुळे भेटणारे नातलग एकमेकांना भेटत नाहीत. सगळे श्रीमंत झाले आहेत, पैसेवाल्या जगात आपुलकी हरवून गेली आहे. आता समारंभातही इकडे लग्नाचा विधी मंगलाष्टके सुरू असतानाच लोकांची मोबाइलवरून चॅटिंग सुरू असते.
परिस्थितीती आता बदलत चालेली आहे.लग्नप्रथा पण बदल्यात…आधी घरातून ,मग मंदिरातून नंतर गावातील समाजभवन,मंगलकार्यालय आणि आता रिसॉर्ट पण या लग्नामुळे काही चांगल्या गोष्टी घडतात आहेत. कमी नातेवाईकांना बोलवितात हे चुकीचे असले तरी दोन्ही वधुवर कडील कुटुंब एकत्र एका ठिकाणी राहून लग्न करतात.खर्च वाटल्या जातो. हळदीला दोन्ही कडील वहिनी, बहिणी सोबतच नाचतात.नवरीची आईसुद्धा मुलीच्या लग्नात डान्स करते. मुलीची एन्ट्री तर विचारू नका काय तो गाॅगल, पालखी किंवा वेगळाच प्रवेश आणि फटाके व नाचतच स्टेज वर चढणे. एकुण काय तर मुलीकडच्या लोकांचे अख्या लग्नात झुकून बर्याच अंशी कमी झाले आहे आताची टेंशन फ्री लग्न झालीत.त्यातल्या त्यात मुलंमुली आपआपली निवड पंसतीस महत्त्व देतात. जातीभेद नष्ट करण्यासाठी हे सुध्दा एक चांगल पाऊल आहे.बर्याच ठिकाणी अहेर पध्दतीस थारा नाही.अशीच साडी घेतली स्वस्तच घेतली त्यातून नातेवाईकांचे रूसवेफुगवे तेही संपत आले आहेत. आता कुणाला यासाठी वेळच मिळत नाही.हळद, संगीत,लग्न आणि त्यासाठी वेगवेगळे कपडे बदलविण्यातच वेळ जातो.
एकूण काही चांगले तर काही वाईट हे चालायचेच.ज्याच्याकडे खर्च करायची ऐपत आहे.त्यांनी नक्की अशी हौसमौज करावी.पण कर्ज काढून नाही….आज नोकऱ्यांची वानवा आहे.पण अशा लग्नामुळे कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.जसे इव्हेंट मॅनेजर, पार्लर, डेकोरेशन, कोरिओग्राफर, महेंदीवाले ही काळानुसार गरज आहेच.बाकी नातेवाईकांसोबत बोलायला आता मोबाईल सहज उपलब्ध आहेत जो पूर्वी नव्हताच. त्याकाळात दूरच्या नातेवाईकांच्या भेटी लग्न आणि मरणातच होत होत्या…..आता परिस्थिती बदलत आहे. आपल्याला बदलायला हवे हि काळाची गरज आहे.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर



