0
4
8
2
9
0
चिऊताईचं घरटं
निसर्ग सहल आहे मुलांनो
धमाल गंमत करूया आज
पाहूया झाडे वेली पशुपक्षी
निसर्गाचा छान छान साज…
हिरवे हिरवे पीक झुलते
झोका देतो त्याला वारा
कुठं बाजरी कुठं कापूस
कुठं पसरलाय ताग सारा…
झाडाच्या सावलीत करूया
वनभोजनाची अंगतपंगत
मुळा काकडी गाजर टोमॅटो
लोणचे ठेचा जेवणाची रंगत…
जेवणानंतर मुलांनी पाहिलं
चिऊताईचं घरटं छान छान
काड्या गवत कापूस धागा
पाहूनी सर्वांचे हरपले भान…
तेवढ्यात आली चिऊताई
पिल्लांसाठी घेऊन दाना
चिवचिवाट सुरु पिल्लांचा
उंचावल्या चोची नि माना…
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
8
2
9
0



