Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

लाईफ लाईन सपोर्ट

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे

0 6 2 9 9 2

लाईफ लाईन सपोर्ट

‘लाईफ लाईन सपोर्ट ‘याचा अर्थ असा की, ‘जीवनात आलेल्या व्यक्तीने आपल्याला मनापासून ‘सपोर्ट’ केलेला आहे’. आपल्या कार्यात कधीच बाधा आणलेली नाही. आणि पुढे जाण्यासाठी त्यांनी खरंच आपल्याला मदत केलेली आहे. आधार दिलेला आहे. शाब्दिक मदत असेल, विचारांची असेल, भावनांची गुंतवणूक असेल. कोणत्याही प्रकारची मदत असेल पण तो सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. आयुष्याच्या प्रवासात आधार देणारी ही माणसंच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतात आणि जीवनामध्ये आपल्याला मदतीचा हात पुढे करतात. आपल्याला आधार देतात.

बघा साधे उदा…फुले ठेवण्यासाठी आपल्याला फुलदाणीची गरज असते म्हणजे फुलांना कशाचा सपोर्ट पाहिजे फुलदाणीचा सपोर्ट हवा आहे. वेल वाढण्यासाठी सुद्धा वेलीला आधाराची गरज असते. म्हणजे पानफूल सुद्धा सपोर्ट शिवाय उभे राहू शकत नाहीत. अगदी साधी उदा. आहेत ही. जीवन म्हणजे सुख-दुःख, यश-अपयश, आशा-निराशा आणि असंख्य अनुभवांनी भरलेला एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात कधी आनंदाचे क्षण आपल्या पदरी येतात, तर कधी दुःखाचे ढग मनाला यातना देतात. कधी परिस्थितीशी लढण्याची ताकद कमी पडते, तर कधी पुढे जाण्याचा मार्गच दिसेनासा होतो. अशा वेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं एखादं माणूस म्हणजेच आपलं ‘लाईफ लाईन सपोर्ट!’असतो.

‘बुडत्याला काडीचा आधार ‘ ही म्हण आहे बघा. माणूस बुडत असेल, तर त्याला एका साध्या ओंडक्याचा आधारही खूप पुरेसा होतो, त्याचं जीवन वाचवायला मदत होते म्हणजेच काय तर आपलं जीवन हे एकमेकांच्या आधाराने चालू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात, जी आपल्याला पडताना सावरतात, रडताना हसवतात आणि हरताना पुन्हा जिंकण्याची उमेद देतात.
‘तू लढ मी आहे.’ हे शब्द खूप सपोर्ट करतात. ‘कशाला काळजी करते मी आहे ना!’ या छोट्याशा वाक्यांची आधार वेल जीवनाला बरच पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होते.

आपल्या दुःखाची कारणं प्रत्येक वेळी सांगावी लागत नाहीत. आपल्या आवाजातील बदल, चेहऱ्यावरची उदासी आणि डोळ्यांतील अश्रू न बोलताच ओळखणारी ही माणसं आपल्या आयुष्याची खरी श्रीमंती असतात. कायम बडबड करणारी व्यक्ती शांत बसली असेल तर आपण लगेच विचारतो “काय झालं तुला??” चेहरा उदासीन झाला जरा डोळे रडके वाटले तर ताबडतोब विचारणा होते “काय झालं आज तुम्हाला?” फोनवर जरी संपर्क झाला, तरी नेहमीच हे शब्द आले नाहीत तर समोरचा तुम्हाला लगेच विचारतो “काय झाले आज काय होतंय? का आजारी आहात का??” अशा आपुलकीच्या शब्दांचा आधार जीवनात सर्वांनाच हवा असतो.

जीवन फुलवताना या शाब्दिक आधारांची गरज असते भावनामय शब्दांची, आधाराची गरज असते… आणि जर ती आपल्या घरातून खूप छान मिळाली तर घरातली प्रत्येक स्त्री किंवा पुरुष छान तयार होतो. उत्तम व्यक्तिमत्व घडते. ‘लाईफ लाईन सपोर्ट’ म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर मानसिक आधार, भावनिक जवळीक, विश्वासाची साथ आणि गरजेच्या वेळी दिलेला धीर होय. कधी आईच्या मायेचा हात, कधी वडिलांचा विश्वास,भावंडाचे प्रेम,कधी जोडीदाराची साथ, कधी मित्राची समजूत, तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीने दिलेले मदतीचे दोन हात… प्रत्येक आधाराचं रूप वेगळं असतं; पण त्यामागची भावना मात्र एकच असते ‘तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे!’ “I am always with you…”

एक सिनेमा होता बघा “मै हू ना!” तो आठवला मला..!! आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू असताना आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. मात्र, संकटाच्या काळात कोण आपलं आहे, कोण केवळ नावापुरतं जवळ आहे आणि कोण निःस्वार्थपणे आपल्या पाठीशी उभं आहे, याची खरी जाणीव होते. सुखाच्या क्षणांत टाळ्या वाजवणारे अनेक असतात; पण दुःखाच्या क्षणी अश्रू पुसणारी माणसं फार मोलाची असतात. इतर माणसांना आपल्या दुःखाचे काहीही पडलेले नसते. प्रत्येकाला आपले जीवन आहे त्याने तरी आपल्या दुःखात का सहभागी व्हावे?

हल्ली जीवनमान खूप बदललेले आहे. मला कोणीतरी सपोर्ट करेल आणि मला कोणीतरी मदत करेल आधार देईल…हे शब्द फक्त कागदावर चांगले वाटायला लागलेत कारण सपोर्ट हा महत्त्वाचा आहे परंतु मिळत नाही हल्ली … एकमेकांचे पाय खेचणे चालू आहे. मीच कसा श्रेष्ठ हेच दाखवण्याकडे कल आहे…त्यामुळे आपले जीवन आपण कसे जगावे याकडे आपणच स्वतः प्रामाणिकपणे पहावे आणि सपोर्ट आपणच शोधायचा… आणि आपणच छान उत्तम कार्य करायचं. ज्या वेळेला तुम्ही उत्तम कार्यकर्ता होता. प्रत्येकाची मन संभाळता, त्यांना शाब्दिक आधार देता,एक मायेचा हात डोक्यावरून फिरवता…त्याच वेळेला तुम्हाला समोरून ‘लाईफ लाईन सपोर्ट’ मिळणार असे माझे वैयक्तिक मत आहे.

कधी कधी आपण इतरांना आधार देण्यात इतके गुंतून जातो की स्वतःच्या मनाचा थकवा विसरून जातो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणताना आपल्या मनात किती वेदना दडल्या आहेत, हे कुणाला सांगत नाही. अशा वेळी आपल्यालाही एखाद्या आधाराची गरज असते. कारण इतरांना सावरणाऱ्या माणसालाही कधी तरी कुणीतरी सावरावं लागतं. नेहमी खंबीर दिसणाऱ्या व्यक्तीलाही मन मोकळं करण्यासाठी विश्वासाचे खांदे हवं असतात. त्या व्यक्तीलाही मन आहे,आशा आहेत,भावना आहेत, सुख आहे,दुःख आहे ते त्यांनी कोणाला सांगायचं?
तर मित्रांनो एवढेच सांगणे आहे की आपणच एकमेकांचे “लाईफ लाइन सपोर्ट” व्हावे.

एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यावेत. आपले मन मोकळे करावे. हलके करावे. यातून कुठेतरी एक उत्तम मार्ग सापडण्याची मदत होते. नात्यांमध्ये केवळ अपेक्षा नकोत, तर समजूतदारपणाही हवा. केवळ सल्ले नकोत, तर ऐकून घेण्याची क्षमता हवी. प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याकडे असेलच असं नाही; पण संकटात असलेल्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, तिच्या भावना समजून घेणं आणि तिला योग्य मदतीपर्यंत पोहोचवणं हे देखील मोठं योगदान असतं. यातून त्या माणसाचं जीवनमान उंचवायला मदत होते. तिच्या वाईट विचारांना काढून टाकून चांगला विचारांना पोसले जाऊ शकते.

आपणही कुणाच्यातरी आयुष्यातील ‘लाईफ लाईन सपोर्ट ‘होऊ शकतो. एखाद्याला प्रोत्साहन देऊन, निराश मनाला आशेचा किरण दाखवून, गरजू व्यक्तीला मदत करून किंवा दुःखाच्या क्षणी त्याच्या बाजूला शांतपणे बसून आपण त्याच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. पती-पत्नीचे नाजूक नाते ही असेच आहे एकमेकांना सुखदुःखात मदत केली एकमेकांचा आधार बनले तर हे नाते कायम छान उत्तम टिकते. शेवटी, जीवन सुंदर बनवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींचीच गरज असते असे मुळीच नाही . कधी प्रेमाने केलेली विचारपूस, कधी विश्वासाने दिलेला शब्द, कधी योग्य वेळी केलेली मदत आणि कधी न बोलताही समजून घेणारी साथ पुरेशी असते. समोरच्या व्यक्तीचे मन ओळखता आलं पाहिजे. आणि नक्कीच ही आपल्याला दैवी देणगी आहे. माणसाचा चेहरा आणि माणसाच्या दैनंदिन हालचाली पाहून माणूस त्याच्या मनातले विचार ओळखू शकतो ही दैवी देणगी नाही तर काय आहे?

जीवनाची खरी ताकद आपण किती उंच भरारी घेतो यात नसते, तर पडल्यावर आपल्याला सावरणारे हात किती प्रेमळ आणि मदतीचे आहेत, यात असते.यात तुमचा चांगुलपणा लपलेला आहे. आयुष्याच्या वाटेवर, आधाराचा हात हवा, अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला समजुतीचा स्पर्श हवा…. संकटांच्या वादळातही, विश्वासाचा दीप उजळावा लाईफ लाईन सपोर्ट बनून प्रत्येक जीवाला आधार मिळावा…

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 9 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे