फिरस्ती
संगिता रामटेके भोवते ता.साकोली, जि.भंडारा

फिरस्ती
“वृक्षांच्या राईत, कडया कपारीत ,फिरतो फिरस्ती अवखळ वारा,
फिरस्ती आहेत पक्षी मनमौजी ,फिरस्ती मानव फिरे जग सारा”
डोंगर उतारावर पसरलेली वनराई, छोटी छोटी एकटी दुकटी घरे उतारावर बांधलेली. उंचच उंच डोंगररांगा दूरवर पसरलेल्या. गुलाबी फुलांनी लगडलेले सुंदर पाईन, नयनरम्य देवदार! किती सुंदर ! नयन फिरून फिरून पुन्हा त्याच वृक्षांना बघत होते. मन भरतच नव्हते. पाईन वृक्षांची चकाकी ल्यालेली पाने भरगच्च गुच्छेच वाटावी अशी. उतारावरील देवदार किती उंच होते. जणू काही आकाशाला हात लावून यायची होडच लावली होती त्यांनी. सर्वच झाडे उंच आणि टणक मोठ्या बुंध्यांची होती.
चारही बाजूला पर्वत रांगा मधोमध निळंशार पाण्याचा काठोकाठ भरलेला स्वच्छ तलाव.पहाडीच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर नाजूक बारीक पानांच्या रंगीबेरंगी फुलांच्या वेली. पायथ्याने जाणारा गोलाकार रस्ता.तलावाची शोभा जवळून बघता यावी म्हणून खास बनवलेला. ‘मन शांत आणि आनंदी करणारे निसर्गातील दृश्य म्हणजे, आपल्यावर निसर्गाने केलेली अमाप कृपा होय’. ही कृपा काय घरबसल्या होत नसते त्यासाठी स्थळ बघण्यासाठी फिरावं लागतंय. बाहेरचे जग बघावे लागते. कधी अरण्य सफारी, तर कधी धार्मिक स्थळे, कधी प्रेक्षणीय स्थळे, तर कधी मंदिरे, तलाव, नद्या, धरणं अशा कितीतरी गोष्टी असतात ना फिरण्यासाठी. आणि फिरस्ती लोक फिरत असतात या ठिकाणावरून त्या ठिकाणांवर.
माणूस अशी फिरस्ती पायी तर करत नाही, करतही असला तर जवळपास असणाऱ्या स्थळांचीच भ्रमंती पैदल करू शकतो. अथवा लांबच्या स्थळांना भेट द्यायची असल्यास गाड्या- घोड्यांशिवाय पर्याय नसतो. फिरस्ती म्हणजे पावलोपावली पैशांचा व्यवहार. दोन चार किलोमीटर असेल तर चालत जाऊ शकतो. फिरस्ती माणसाला फिरण्यासाठी पदोपदी पैसा हवा असतो.ते म्हणतात ना पैसा फेको, तमाशा देखो अगदी तसंच.
माझ्या बहिणीची मुलगी काही महिन्यापूर्वी ती उत्तर भारतात फिरायला गेली. मी विचारले किती खर्च आला?ती म्हणाली, पंचवीस हजार.मी अचंबित झाले.ती एकटीच गेली होती. आणि तिला एकटीला पंचवीस हजार. काही दिवसांनंतर आम्ही चौकडी गेलो फिरायला, वाटलं होतं मित्र मंडळ परिवारासह जात आहेत तर आपणही जाऊया. फिरतांना खूप मजा आली.उत्साह एवढा होता की फिरताना थकवा मुळीच जाणवत नव्हता. पुरेशी झोप नव्हती, तरी मन नवं काहीतरी बघण्यासाठी ताजंतवानंच होतं. खरंच आहे की,आवडीचं काहीही असो आपण मनापासून करतो आणि जे काही मनापासून करतो ते अंतत: सुखद आणि सुंदर होते.
आल्यानंतर खर्चाचा हिशोब केला तर खर्च लाखावर गेलेला.
मनात आलं एखाद्या गरीबाच्या घरच्या मुलीचं लग्न होऊ शकले असते एवढ्या रकमेत, किंवा एखाद्याला राहण्यासाठी चार भिंतींचे छोटेसे झोपडीवजा घर उभे झाले असते.आम्ही कशात खर्च केले तर नुसतं भ्रमंतीसाठी.कुठे तरी फिरस्ती महागात पडली हे जाणवलं. पण अर्थाला आपल्या आयुष्यात भारी ‘अर्थ’ आहे. त्यासाठी तो जपून वापरायला हवा. हवं तर टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सची मदत घेणंही सोपं जातं. किंवा यात्रेसाठी असणारी सेवा अतिशय कमी शुल्कात फिरवून आणून सोडतात.ते सुध्दा परवडणारे असते. शेवटी हेच सांगणं की,भ्रमंती करायला हवीच. तेव्हा मन ताजेतवाने होतंच, पण जगण्याची नवी उर्मी नवा उत्साह फिरस्तीमुळेच येतो. शेवटी….एवढंच….
“ओढ जिथे मनाची, तिथे जावं एकदा,
पाखरांसारखं मनसोक्त, भटकून यावं एकदा”
संगिता रामटेके भोवते
ता.साकोली, जि.भंडारा
=======



