0
4
8
2
9
3
ये रे श्रावणा
नभ येतं झाकोळून, होतो श्रावण सोहळा
अनुभवावा रम्य देखावा. याची देही याची डोळा
वसुंधरेला बहाल करतो, अनुपम सौंदर्याचं दानं
पारणे फिटते डोळ्याचे, हरपून जाते देहभान
ये रे ये श्रावणा, थोडा सांडू दे गारवा
अनुभवू दे मलाही, तुझ्या प्रीतीचा गोडवा
कधी पांघरून उन्ह, कधी अंथरून छाया
रिमझिम सरीत भिजू दे माझी चिंब काया
खळखळू दे नद्या नाले , कुठे दुधाळ प्रपात
वायुसंगे वाहे नाद, गोड मंद मधुर स्वरात
तुझा मोरपीशी स्पर्श, जागवेल सृष्टीत तारुण्य
जिथे तिथे ओसंडून वाहेल, हिरवेकंच लावण्य
झेलू आम्ही तनुवर, थेंब रिमझिम सरीचे
जाईल सुखावून जीव, येईल सुखाला भरते,
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जि. चंद्रपूर
0
4
8
2
9
3



