चला पर्यटनाला….!! श्रीक्षेत्र हरिहरेश्वर
सौ. स्वाती मराडे-आटोळे
चला पर्यटनाला….!! श्रीक्षेत्र हरिहरेश्वर
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य व पवित्र तीर्थस्थान म्हणजे हरिहरेश्वर. हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेले डोंगर, नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र, रुपेरी वाळूने आकर्षित करणारा समुद्रकिनारा. नारळी पोफळीच्या बागा व डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे. सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर बाणकोट हे गाव आहे. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यात येते.
हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. म्हणूनच याला भारताची दक्षिण काशी असेही म्हणतात. हे गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे.
गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच यास देवघर किंवा देवाचे निवासस्थान असेही म्हणतात. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. हे देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार १७२३ मध्ये केल्याचे आढळते. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे.
याची एक आख्यायिका अशी आहे, की बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते.
या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. हरिहरेश्वरला जायचा मुख्य रस्ता मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे सुरू होतो. श्रीवर्धनवरूनही होडीने हरिहरेश्वरला जाता येते.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
=====



