‘आभारीय मनोगत’; डॉ. संजय पाचभाई
संजयवाणीकार
‘आभारीय मनोगत’; डॉ. संजय पाचभाई
आज माझ्या ‘सोनप्रहर’ या रचनेला सर्वोत्कृष्ट स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे खूप खूप आभार.
आजचाच दिवस होता मी रोज प्रमाणे सायंकाळी सात वाजता आपले स्टेटस बदलले, दहा मिनिटांनी माझ्या वहिनींचा मेसेज आला भाऊजी तुम्ही कुठे आहेत? मी उत्तर दिले नागपूर. मग पेशन्ट पाहण्यात व्यस्त झालो. थोड्याच वेळात चिमूरवरुन दादाचा फोन आला आणि… ती बातमी ऐकून सुन्न झालो.
सकाळीच मित्राच्या गावाला निघालो, पेपर मधील बातमी वाचून इतरांचे फोन यायला लागले. सकाळी 10 वाजता पोहोचलो आणि ती भयाण परिस्थिती पाहून हादरून गेलो. पाच मीटर अंतरावर पाच घरी पाल टाकून होती जवळपास पाच हजार लोक. शव अजून यायचे होते. मी मित्राला भेटलो त्याने कडकडून मिठी मारून हंबरडा फोडला. ‘संज्या सगळं खल्लास झाले रे’. माझ्या डोळ्यातूनही अश्रुधारा येत होत्या, पण स्वतःला सांभाळले. लगेच आत वाहिनीला भेटलो बापरे खूप कठीण सर्व. मित्राचे सर्व नातेवाईक माझ्या अगदी जवळचे ते मला बिलगून मामा हे कसे झाले रे….?
टाळूवरचे लोणी
नागभीडच्या शवगृहात शव पडून फक्त दोनच शव पेट्या मग ब्रम्हपूरी वरुन बर्फाच्या लाद्या बोलवून शव ठेवले. ते शव तलावातून बाहेर काढण्यासाठी 25 हजाराची डिमांड कसेतरी दहा हजारावर तयार झाले. मेल्यानंतर ही या यातना खूप काही सांगून गेल्या. सकाळी 12 वाजता एकाच चितेवर दोन्ही भाऊ आणि दुसरीकडे तीन शव..!
श्रद्धांजलीपर भाषण आणि त्यातही राजकारण सुरू झाले. दोन पक्षाचे आमदार आणि त्यांची चिलेपाले आले. पण एक पक्ष व्यासपीठावर तर दुसरा दूरच राहिला. आम्ही मदत मिळवून देवू याचे श्रेय घेण्यासाठी सारेच कामाला लागले. रात्री 9 वाजता खासदारही येवून गेले मी त्यांना एकच प्रश्न विचारला “आमचीच मुले का”? यापूर्वी ही तिथेच सहा मित्र डुबलीत तरी सरकार, प्रशासन जागे झाले नाही. ते एक पर्यटन स्थळ आहे. पण कुठेच सुविधा नाही, पुढे धोका आहे असे साधे फलक सुद्धा नाही. आणि मुख्य प्रश्न म्हणजे त्या तलावात थोड्या थोड्या अंतरावर वीस वीस फुटाचे खड्डे खोदून आहेत ते दिसतच नाहीत. ती पाचही मुले ‘गुरुदेव संस्कार’ शिबिराचे आयोजक आणि स्वयंसेवक होते अगदी निर्व्यसनी. दुसर्या दिवशीही घटना विधानसभेत मांडली पण…?
परतून यारे पिलांनो
परतून यारे पिलांनो
रिकामी वाटते घरटी
ती आठवांची काडी बघ
उगाच हलतात वरती
बघ भरून आणला चारा
तुमच्या त्या चिऊ ताईने
कुकर लावला बघ
तुम्ही येणार या घाईने
आताच वाजली शिट्टी
वाटते कुकरही शिजला
तुमची वाट पाहून
अश्रू डोळ्यातच थिजला
आमचीच पिले का रे देवा
उडाली या वादळात
का रे मी लावावी रोज
सांग तुझ्यापुढे दिवा वात
मृद्गंध
डॉ. संजय भानुदास पाचभाई
सदस्य,मराठीचे शिलेदार समूह



