चला जाऊ या… पर्यटनास, आणि पाहू या…’लोणावळा’
सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
चला जाऊ या… पर्यटनास, आणि पाहू या…’लोणावळा’
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत. येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला ‘सह्याद्रीचे रत्न’ असेही म्हटले जाते. लोणावळ्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे ड्यूक्स नोज. ड्यूक्स नोजला स्थानिक भाषेत नागफणी म्हणजे नागाचा फणा असे म्हणतात. ड्यूक्स नोज हे नयनरम्य ठिकाण, शांत वातावरण, सुंदर दऱ्या आणि हिरव्यागार वनराईसाठी प्रसिद्ध आहे.
पवना सरोवर हा कृत्रिम जलाशय असून लोणावळ्यात पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे पर्यटक निसर्ग आणि आल्हाददायक हवामान इत्यादीची मजा लुटू शकतात. पवना सरोवरानजीक अनेक किल्ले असून त्यात लोहगड किल्ला, तिकोना किल्ला आणि विसापूर किल्याचा समावेश होतो. लोणावळ्यात मध्यवर्ती ठिकाणी वसलेले नारायणी धाम मंदिर हे सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. हे मनोहारी शुभ्र मार्बल मंदिर २००२ मध्ये उभारण्यात आले आहे. मा नारायणी हे या देवालयाचे मुख्य दैवत असून गणपती, हनुमान आणि अन्य हिंदू देवांचे स्थान मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार चार मजली असून मुख्य प्रवेशापासून देवळापर्यंतच्या मार्गावर कारंजे लावले आहेत. हे चित्तवेधक देवालय साडेचार एकरपेक्षा जास्त परिसरात उभे आहे. सोबतच सुंदर बाग आहे.
लोणावळा येथील ‘सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम’ हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरते. या संग्रहालयात जिवंत वाटतील असे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींचे पुतळे आहेत. तुंगार्ली तलाव हे पर्यटकांनी आराम करण्याचे आणि निसर्गाचा आनंद घेण्याचे ठिकाण आहे. या तलावातील पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे १९३० साली बांधण्यात आलेले तुंगार्ली धरण आहे. हा आसपासच्या डोंगराळ परिसराच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत मानला जातो. एक विकएंड स्पॉट म्हणून तुंगार्ली धरण प्रसिद्ध आहे. या तलाव परिसरातून राजमाची आणि लोहगड किल्ल्याचे विहंगम दृश्य नजरेत साठवता येते. याशिवाय लोणावळ्यात भेट देण्यासाठी वळवण धरण, रायवूड पार्क, कॅनियन व्हॅली, इमॅजिका हे विस्तृत थीम पार्क, मॅप्रो गार्डन हेदेखील उत्तम स्पाॅट आहेत.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



