षड्रिपूवरील खात्रीशीर विजयासाठी आवश्यक हल्ला चढवण्याचा मार्ग
डॉ. अविनाश परशुराम परांजपे ए 2/ जी 7, रचना आनंदवन सोसायटी वानाडोंगरी ता. हिंगणा जि. नागपूर

षड्रिपूवरील खात्रीशीर विजयासाठी आवश्यक हल्ला चढवण्याचा मार्ग
समस्त अध्यात्मिक, संत महंतांनी सांगितले आहे, की मनुष्याच्या अधोगतीला कारणीभूत हे षड्रिपू आहेत. त्याची नावे काम, क्रोध, लोभ (मोह), मद /अहंकार, मत्सर व दंभ ही आहेत. त्यांच्यावर विजय मिळवणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. कोरोना, लॉकडाउनच्या काळात मी बरेच अध्यात्मिक साहित्य वाचन केले. अर्थात त्यात माझ्या आईच्या लेखांची संख्याही बरीच आहे. प्रत्येक भानगडीला, संकटांना, परस्पर संबंध बिघडविण्यास हेच षड्रिपू कारणीभूत असतात हे पटले.आता समस्या ही आहे की या षड्रिपूंवर विजय कसा मिळेल?
मी त्या समस्येकडे अध्यात्मिक ‘सोल्युशन’ काही मिळेल का? असा विचार न करता, एक ‘आर्मी ऑफिसर’ म्हणून बघायचे ठरवले. त्यासाठी रिपू म्हणजे शत्रूची आतील माहिती काढली जाते. शत्रूला एकट्याने हल्ला करायची शक्यता किती आहे? त्याच्या ताकदीमागे कोणती शक्ती आहे? कशामुळे तो बलवान होतो? तो कोणावर अवलंबून आहे. या राक्षसाचा प्राण कोणत्या पोपटात आहे? कशावर प्रहार केले म्हणजे तो नेस्तनाबूत होईल? वगैरे वगैरे. या प्रकारच्या वैचारिक अभ्यासात मला असे आढळून आले की, काम, लोभ (मोह), मद /अहंकार, मत्सर व दंभ हे पाच शत्रू एकेकटे हल्ला करू शकतात. पण सहाव्या क्रोधाला एकट्याने हल्ला करणे शक्य नाही. आता हे कसे ते बघूया. प्रत्येक ‘रिपू’चा वेगवेगळा विचार करून पाहिले.
१) काम : म्हणजे वैषयिक वासना. जी भिन्न लिंगी व्यक्तीच्या शारीरिक सौंदर्यावर आधिष्ठीत असते. जेव्हा जेव्हा आपल्याला जाणीव होईल ,की आपल्यावर ‘काम’ रिपुचे आक्रमण होत आहे, तेव्हा लगेच त्या संबंधित व्यक्तीच्या बाबतीत, की ज्या व्यक्तीमुळे आपल्यावर ‘काम’ शत्रूची पकड वाढत आहे, त्या व्यक्तीबद्दल चांगल्यातून वाईट शोधणे. जसे, काय मस्त मादक डोळे आहेत? च्या ऐवजी – हॅ काय दिसतील हे डोळे त्यात चिप्पडे आल्यावर, वरून जरी छान नाक वाटत असलं तरी, आत तर त्याच्या शेंबूड व मेकडं भरली असतील, कसले ते ओठ, उघडले की आत नुसती लाळ आणि थुकी भरलेली. आता सांगा, असला विचार करत असताना ‘काम’ त्या मनात टिकेल तरी का ?
२) लोभ (मोह): हा ज्या गोष्टीचा लोभ वाटू लागला आहे असे जाणवले, की त्यात वाईट शोधायला लागायचे. उदाहरणार्थ, एखाद्या छोट्या बाळाबद्दल लोभ वाटू लागला आहे असे जाणवले, की विचार सुरू करावा की, जर मी या बच्चूला कडेवर घेतले की तो माझ्या अंगावर ‘शी व शू’ करेल लोभ गायब. दुसरं उदाहरण, समजा आपण मद्य / दारूच्या मोहात सापडतोय असे जाणवले की, लगेच विचार सुरू करावा की दारू पिऊन ओकण्याचा, त्या ओकारीच्या वासाचा. पिऊन गटारात/ नालीत पडल्यावर नालीतील घाण, मल मुत्र, डुकरे ओकायला येईल अशा वासाचा. काय बिशाद आहे मोह मनात थांबेल? समजा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा मोह होतोयसे वाटले की लगेच विचार सुरू करावा, इनकम टॅक्सच्या धाडीचा, गुंडांच्या/ दरोडेखोरांच्या टोळीचा, वाढत्या ब्लडप्रेशरचा, बोलून टोपी घालू शकणा-या व तेवढ्यासाठी जवळीक साधू शकणा-यांचा. जर माणसाला एखाद्या विशिष्ट चवीचा मोह पडतासा जाणवले की ताबडतोब मनात विचार चक्र सुरू करावे, अपचन, गॅसेस, जुलाब, उलट्या. कसला टिकतोय मोह? अशा ब-याच उदाहरणांची रांग लावता येईल.
३) या वेळी आपण रिपुवर श्रीमान मद (माज) / अहंकार यांच्या विषयी बघूया: हे प्रकरण स्वत: त्या त्या मनुष्याच्या मानसिकतेतील असते. ज्या क्षणी आपल्याला असे जाणवले की “मी किती ग्रेट आहे! ” मग ते (पैसा, शारीरिक ताकद किंवा कौशल्य, बुद्धीमत्ता, कर्तृत्व, पदव्या घेतलेले शिक्षण, अधिकारी पद, लोकप्रियता) काहीही असो. त्याच क्षणी मनात तुलनात्मक विचार सुरू करावा. उदाहरणार्थ : जर पैशाचा माज येतोय असे वाटले की तुलना करणे सुरू! कोणाशी? तर ‘बील गेट्स’ बरोबर तुलना. लगेच कळेल की जेवढ्या लक्ष/ कोटी रुपयांचा मला माज वाटतोय तेवढ्या रूपयांची दारू पिऊन ‘बील गेट्स’चे कुटुंब आठवड्यात मुतून टाकते. मग कसला माज करतोय आपण ? जर माजाची संवेदना शारीरिक ताकदीबद्दल होत असेल, तर ऑलिंपिकमधील वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियन (आजतागायत सर्वात जास्त रेकॉर्ड असलेले) बरोबर तुलना करून बघता असे लक्षात येईल की, त्यांच्यासमोर आपण तर ‘किस झाड की पत्ती’. बुद्धीमत्तेचा माज येतोय असे जाणवले की, (आपण डॉक्टर असल्यास इंजिनियरिंग किंवा वकीली क्षेत्रात किंवा इतर आपले सोडून कोणत्याही क्षेत्रात) इतर अशाच उच्च क्षेत्रातील आपल्याला काय ढेकळं समजतय? या गोष्टींचा आढावा घ्यावा. त्या त्या ( इतर) क्षेत्रातील फाटक्या गाडी रिपेअरवाल्याने किंवा हातगाडी वरील रद्दीवाल्याने कसे गंडवले होते ते आठवावे.म्हणजे थोडक्यात आपण आपल्या ग्रेट पणातील वाईट शोधले की स्वतः च्या नजरेत आपण ‘हे…’ आहोत असे लक्षात आले की या शत्रू असलेल्या मद /अहंकारावर मात झालीच.
४) मत्सर: दुसऱ्या व्यक्तीला प्राप्त झालेल्या किंवा प्राप्त होऊ शकणा-या सुखामुळे माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या पोटशूळाचे नाव म्हणजे मत्सर.या मत्सरी दैत्याचे पारिपत्य करायचे तर, ज्या दुसऱ्या जवळील चांगल्या गोष्टीबद्दल मनात मत्सरासूर प्रवेश करू लागला आहे असे वाटले की, युद्ध पातळीवर आपण असा विचार करू लागावा की, ती चांगली गोष्ट आपल्याला किती निरूपयोगी आहे, आणि त्या गोष्टीपेक्षा आपल्या जवळच्या गोष्टीत किती फायदा आहे. उदाहरणार्थ : समजा दुसऱ्याकडे कार आली याचे वैशम्य वाटणे सुरू होत आहे तोच विचार चालू,……. माझ्याजवळ कार नाही हे किती चांगले आहे, ना घरी, ना मार्केटमध्ये पार्किंग चा प्रॉब्लेम, ना रस्त्यावर ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडायची शक्यता. पुन्हा जवळील दुकान, पानटपरी, सारख्या ठिकाणी कार नेणे त्रासदायक. आपण कसले अर्ध्या किकमध्ये गाडी चालू करून पसार. ट्रॅफिकमध्ये पण इकडून तिकडून बाईक घुसवून निघता येते. कुटुंबासह कोठेही जायचे, तर आपण टॅक्सी करून जाऊ शकतो. पार्किंगची भानगड नाही. पेट्रोलचा खर्च कमी, लोकही शिष्ट म्हणून उगाचच आपल्याला नावे ठेवत नाहीत. बराय कार नाही ते. समजा दुसऱ्या व्यक्तीला प्रमोशन मिळाले/ मिळणार असेल, तर मत्सराने ग्रासण्यापूर्वीच विचार सुरू करण्यात यावेत की बरं झालं वाचलो. प्रमोशन नाही मिळाले ते. कोठे २४ तासाची बांधिलकी घ्या? पुन्हा महिन्यातील १०-१५ दिवस बाहेर टूर करा, जेवणाची अबाळ. कौटुंबिक स्वास्थ्य कमी होते, घरी नीट लक्ष देता येत नाही. जबाबदारी जास्त, त्यामुळे प्रत्येक सुट्टी उपभोगता येते नाही. आपलं कसं छान आहे. १० ते ५ ड्युटी, की संपले.५.०० वाजता घरी कुटुंबासोबत. २४ तासाची बांधिलकी नाही, जबाबदारी नाही, सकाळ- संध्याकाळ घरचं जेवण. प्रत्येक सुट्टी उपभोगता येते.आता थोडे पैसे कमी मिळतात पण ऐषोराम जास्त. अशा विचारांचा मनात उगम झाला की मत्सर गायब. उलट आपण दुसऱ्या व्यक्तीचे अभिनंदन करून येऊ शकतो.
५) दंभासूर : म्हणजे ‘ढोंग’ या रिपुरायाचे जन्मस्थान हे मानसिक अवस्थेत आहे. आपण आपल्याला जे किंवा जसे असावे असे वाटते तसे इतरांना आपण आहोतच असे वाटावे म्हणून त्या इच्छेनुसार घेतलेले सोंग. याचे नाव दंभ नावाचा खोटेपणा. आता हे बघूया की ढोंगाचे होणारे फायदे किती चांगले आहेत. लोक मोठेपणा देतात, मान देतात, आपल्याला दबून, घाबरून राहतात, कधीकधी लाचलुचपत न देता कामे होतात. समारंभ असल्यास मंचावर बसायला मिळते. या फायद्यासाठी जर मनात दंभासूरास शरण जावे असे वाटू लागले की लगेच मनात विचार चक्र सुरू करावे ते, ढोंग उघडकीस आले असता होणाऱ्या फजिती, अपमान, हेटाळणी, तिरस्कार या सर्व प्रकारच्या मानहानीचे कधीकधी तर उगाचच मोठेपणा दाखवण्याच्या नादात औकातीपेक्षा जास्त पैसे खर्च होतात आणि ते दडवितांना होणारी पंचाईत सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. ‘अैसी स्थिती’ या प्रकारच्या मनात निर्माण झालेल्या वैचारिक प्रवाहांनी दंभासूरास नेस्तनाबूत करता येते.
६) क्रोध: हे रिपूवर्य आत्मघातकी आतंकवादी आहेत. एक तर क्रोध शत्रू एकट्याने न येता दुसऱ्या पांच रिपूंपैकी एक किंवा अधिकांचे बरोबर जॉइंटली (एकत्रपणे) आक्रमण करतो. जसे माणसाच्या काम वासनेला अडथळा निर्माण झाला की क्रोध आलाच, लोभ (मोह) पूर्ती होत नाहीय, आला क्रोध, मद/ अहंकार दुखावला, आला क्रोध, मत्सर वाटतोय, आला क्रोध, दंभ/ ढोंग उघडकीस आले, आला क्रोध. किंवा या पंचकडीपैकी एकापेक्षा जास्त रिपू त्रस्त झाले, आला क्रोध. या क्रोधाचा एक असाही गैरसमजाचा गुण आहे, की क्रोधामुळे व्यक्तीला आपल्या अंगात खूप शक्ती आल्याचा भास होत असतो. त्यामुळे मूळ रिपूला त्रस्त करणा-या कारणाला आपण तोडून फोडून नष्ट करण्यासाठी मनुष्य उतावीळ होत जातो.
आपण त्या अडथळ्यास कच्चा खाऊन टाकू, मारून टाकू वगैरे अनेक अतिरेकी भावना निर्माण होतात. तर जसे आपल्याला संवेदना होऊ लागली की, आपल्यावर क्रोधाचे संक्रमण होऊ घालत आहे. तत्क्षणी आपण त्या मूळ रिपूचे बाबतीत आधीच आपण चर्चीलेले विचार चालू करावे आणि त्याबरोबरच या असल्या फालतू गोष्टीसाठी आपण कशाला त्या घाणेरड्यास मारण्यासाठी का होईना पण स्पर्श करून आपले हात खराब करावे? त्याला आपण कच्चाच काय? पण भाजून तरी का खायचे? किती घाण वास येईल त्याचा. अशा वेळी एरवी टाळलेल्या अहंकारासुराची हलकीशी मदत घ्यावी, की मी इतका ग्रेट आणि या मामुली अडथळ्यांसाठी रागवायचं? मला शोभणारे नाही. या क्रोध सम्राटांचे काही धाकले बंधू आहेत. आधी ते आपल्या लहान भावंडांना पुढे पाठवतात, प्रारंभी नाराजीचा सूर, त्याने जमले नाही तर मग गुस्सा, त्याचा परिणाम दिसला नाही तर राग. रागाने पण अडथळा दूर झाला नाही तर संताप, तोही व्यर्थ गेला की दस्तुरखुद्द स्वत: क्रोध सम्राट हजर होतात. आपण याच त्यांच्या क्रमाचा फायदा घ्यायचा. आपण ही क्रमाक्रमाने मनात क्रोधास पिंजराबद्ध करण्याचे व क्रोध किती अयोग्य आहे हे मनाला पटवून देण्यासाठीचे उपरीनिर्दिष्ट विचार श्रृंखलेची आवर्तने सुरू ठेवलीत की विजय झालाच म्हणून समजा.
मित्रांनो, मी माझ्या अल्पबुद्धीने माझ्यासारख्या अतिशय सामान्य माणसाच्या आवाक्यात असतील अशी शस्त्र-अस्त्रे, वापरून या अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या माणसाच्या जन्मजात ‘दुश्मन’ असलेल्या अंगभूत षड्रिपूंवर कसा विजय मिळवावा याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास मी सुचित केलेली शस्त्र-अस्त्रे व त्यांच्या वापर करण्यासाठीच्या पद्धती पटाव्यात, आवडाव्यात व सामान्य माणसाला उपयुक्त पडाव्यात हीच इच्छा, अपेक्षा व लेखनाची सुफलता.
डॉ. अविनाश परशुराम परांजपे
ए 2/ जी 7, रचना आनंदवन सोसायटी वानाडोंगरी
ता. हिंगणा जि. नागपूर
=========



