‘आक्रमकता’ दुधारी तलवार : वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

‘आक्रमकता’ दुधारी तलवार : वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
आक्रमकता ही मानवी स्वभावातील एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. प्रत्येक जीवामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी,
सुरक्षितता राखण्यासाठी आणि संकटांवर मात करण्या साठी एक प्रकारचीआक्रमकता असते. मानवाच्याही वर्तनामध्ये ती दिसून येते. मात्र ही प्रवृत्ती योग्य दिशेने वापरली गेल्यास ती प्रगतीस कारणीभूत ठरते, आणि चुकीच्या मार्गाने वळल्यास विनाशाला आमंत्रण देते. म्हणूनच आक्रमकतेकडे तटस्थ दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
सकारात्मक आक्रमकता ही व्यक्तीच्या जीवनाला बळकटी देणारी असते.अन्याया विरुद्ध आवाज उठवणे,अपमान सहन न करणे, स्वतःच्या कष्टाने यश मिळवण्या साठी झगडणे, स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे. या सर्व गोष्टींसाठी आक्रमकता आवश्यक ठरते. क्रीडांगणावर, राजकारणात, समाजकारणात आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आक्रमकतेमुळे व्यक्तींनी मोठमोठी यशे मिळवली आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या खेळाडूने शेवटच्या क्षणी जिद्दीने लढून विजय मिळवला, तर त्यामागे सकारात्मक आक्रमकतेचीच प्रेरणा असते.
मात्र आक्रमकतेचा नकारात्मक पैलूही तितकाच स्पष्ट आहे. राग, मत्सर, ईर्ष्या, स्वार्थ या भावनांमुळे जेव्हा आक्रमकता व्यक्त होते, तेव्हा ती समाजासाठी धोकादायक ठरते. आक्रमकता ही मुळात वाईट नाही; तिचा वापर कसा केला जातो, यावर तिचे महत्त्व अवलंबून असते. विवेक, संयम आणि आत्म नियंत्रण या चौकटीत राहून आक्रमकता व्यक्त झाली तर ती शक्ती ठरते. व्यक्तीचे ध्येय स्पष्ट असले, त्यामागे समाज हिताची भावना असेल, तर आक्रमकतेतूनही यश आणि समाधान मिळते. पण जर ती स्वार्थी, हिंस्र आणि अविवेकी झाली, तर तिचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, आक्रमकता ही दुधारी तलवार आहे. एक धार प्रगतीची, तर दुसरी विनाशाची. आजच्या पिढीने आणि नेत्यांनी या दोन्ही पैलूंचा विचार करून आपली आक्रमकता योग्य दिशेला वळवली, तर ती व्यक्ती देश व समाज या दोन्हींच्या उन्नतीस कारणीभूत ठरू शकेल. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आपल्या आदरणीय राहुल सरांनी ‘आक्रमकता’ हा नाविन्यपूर्ण व वैचारिक विषय दिला आहे.शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.पणअजू नही सांगावेसे वाटते दिलेले नियम मनापासून वाचावे. मार्गदर्शनपर त्रिवेणीचे वाचन करावे. तसेच स्पर्धेचा निकाल वाचून सन्मानपत्रासाठी फोटो दिलेल्या वेळेपूर्वी प्रशासनाकडे पाठवावा.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





