‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता’; सुनील आंबेकर
देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान सोहळा
‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता’; सुनील आंबेकर
देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान सोहळा
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे – 20ऑ(प्रतिनिधी) सभ्यता व संस्कृती यांच्यात सतत घडणारे नवे बदल स्वीकारून आपण आज आधुनिक तंत्रज्ञान स्विकारले. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या आत्याधुनिक काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता जास्त वाढली आहे” असे मत ज्येष्ठ विचारवंत सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित “देवर्षी नारद माध्यम पुरस्कार” प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर आंबेकर यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात पुढे बोलताना ते म्हणाले, लोककल्याणाच्या सकारात्मक दृष्टीतून भारत ‘राष्ट्र’ म्हणून आज उभे राहिलेले दिसते. परंतु आपला धर्म, संस्कृती, परंपरा यांची व्याख्या इथल्या समाजात पाश्चिमात्यांच्या दृष्टीकोनातून इतकी वर्ष रूजली आहे, मात्र नव्या पिढीने या सर्व गोष्टींकडे आता नव्या दृष्टीतून डोळसपणे पहायला हवे.” असे प्रतिपादन करून त्यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुण्याच्या विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष- अभय कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार हा पुरस्कार ‘सकाळ माध्यम समुहा’चे संपादक श्री. सम्राट फडणीस आणि आश्वासक पत्रकारितेसाठी पुणे ‘महाराष्ट्र टाईम्स’चे पत्रकार श्री. प्रसाद पानसे यांना प्रदान करण्यात आला. तसेच, कोल्हापूरच्या ‘टोमॅटो एफएम’च्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी, आणि सोशल मिडिया चॅनलचे सूरज खटावकर व प्रशांत दांडेकर या पत्रकार द्वयीला “देवर्षी नारद माध्यम पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. सम्राट फडणीस यांनी “पत्रकारिता सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना घेऊन पत्रकारितेला प्रयत्नपूर्वक दिशा द्यायला हवी.” असे मत व्यक्त केले, तर
प्रसाद पानसे यांनी,”पत्रकारितेचे मूल्यमापन माध्यम समुहाबरोबरच समाजही करत असतो. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून आपल्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद आहे.” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. रसिका कुलकर्णी यांनी नभोवाणीच्या आवाज माध्यमातूनही समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य करता येते. या क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकाने आपल्या मनात राष्ट्राच्या हिताचा विचार प्रामुख्याने ठेवला पाहिजे, असे सांगून या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असल्याचे नमूद केले. समाज माध्यमावर प्रभाव गाजवताना आपल्या भारतीय मूल्यांशी नाळ घट्ट हवी, अशा शब्दात खटावकर यांनी आपले विचार मांडले.
विश्वसंवाद केंद्राच्या वतीने बोलताना अभय कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विचारांचा जागर करण्याचे काम विश्व संवाद केंद्र करीत असून जागतिकी
करणाच्या रेट्यात राष्ट्रीय विचार रूजविणे काम पत्रकारांनी आपपापल्या माध्यमातून करणे गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे, पत्रकार संघाच्या सरचिटणीस मीनाक्षी गुरव, यांचा सत्कार करण्यात आला. दीपा भांडारे यांनी नारद स्तवन सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवर्षी नारद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन शिल्पा निंबाळकर यांनी केले. कार्यवाह आनंद काटीकर यांनी आभार मानले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्व पत्रकार, विश्वसंवाद केंद्राचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमास फर्ग्युसन काॅलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.



