Breaking
नागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

कमजोर विचार नको रे बाबा

वसुधा वैभव नाईक

0 5 6 4 4 2

कमजोर विचार नको रे बाबा

कमजोर विचार म्हणजे नेमके काय? तर कमकुवत विचार आणि अशक्त विचार असतात. मनाची दुर्बलता असते. मन सशक्त नसते. नकारात्मक विचार आणि निराशावादी विचार यांनी मन पोखरलेले असते. कमजोर विचार माणसाला आतून खचवतात. मग त्या ठिकाणी सूड भावना जागृत होते. जीवनात अडचणी येतात, पण त्यांच्यासमोर हार मानायची नसते. जेव्हा आपल्याला हार मानवी लागते, तेंव्हा मन शांत ठेवावे. काही दिवस थांबावे आणि पुन्हा नव्याने उभारी घेऊन कामाला लागावे. आपण हरलो म्हणजे जीवन संपले असे नाही. संधी हुकल्या असे नाही. जीवनात अनेक संधी येत असतात. त्या संधी आपण ओळखायच्या असतात आणि त्यानुसार आपले काम करायचे असते. एका संधीने जर आपल्याला दार बंद केले तर, दुसरी संधी आपली वाट पाहत असते हे जीवनात विसरायचे नसते. म्हणून आपल्या मनातले कमजोर विचार पूर्ण बाजूला करायचे. आपण काय जिंकलो नाही त्याचा विचार करायचा आणि जिंकलेल्या माणसाने काय वेगळे केले होते, याचा विचार करून आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा शंभर टक्के प्रयत्न करायचा.

नकारात्मक विचार मनात आले की, आत्मविश्वास कमी होतो. त्यासाठी आपला आत्मविश्वास हरू देऊ नये. डॉ. बाबासाहेब म्हणतात “आत्मविश्वास ही मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे.” अशी गुरुकिल्ली सर्वाजवळ असते. पण त्याचा वापर सर्वजण करतील असे नाही. आपल्याला कोणी मन दुखावले की आत्मविश्वास आपला हरवतो. दिलेल्या संधीचा योग्य वापर करता आला नाही, यश प्राप्त झाले नाही की, आपला आत्मविश्वास आपण हरवून बसतो. कोणत्याही स्पर्धेमध्ये यश मिळालं नाही की आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो. पण हे योग्य नाही संधी अनेक असतात त्या संधींचा उपयोग करून घेणं महत्त्वाचं आहे. आत्मविश्वासावर ठाम राहायचं मी हे करणारच,मी करू शकेन आणि मी भावी आयुष्यात खूप छान बनू शकेन. माझ्या कार्यात यश संपादन करेनच अशी मानवी मनाची भावना मात्र हवी. या आत्मविश्वासाच्या बळावर निश्चित तुम्ही उत्तम बनू शकता. म्हणून आपण नेहमी सकारात्मक आणि धैर्याने विचार करायला हवेत.

प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते. उदा:- माझे पती दीनानाथला ऍडमिट होते. मला हॉस्पिटल मधील काहीच माहित नव्हते. पण माझे हे संकट मला खूप शिकवून गेले… आज कोणत्याही मोठया हॉस्पिटल मधे मी न घाबरता, आत्मविश्वासाने चौकशी करून इतर कामे मार्गी लावू शकते. म्हणजेच काय तर आत्मविश्वास माझा बळावला.
अपयश आले तरी प्रयत्न सोडू नयेत. संकटांच्या मालिकेमध्ये अपयश हे निश्चितच असते. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल असे नाही ना! म्हणून आपण कार्य करायचं सोडायचं नाही. पुन्हा, पुन्हा त्यात गुरफटून घ्यायचं आणि एक क्षण असा येतो की यश संपादन होतेच.

म्हण आहे ‘ध्येयाचा ध्यास लागला की कार्याची पूर्तता निश्चितच होते ‘ याचा अनुभव निश्चितच येतो. “मी करू शकतो/ शकते ” हा विचार माणसाला पुढे नेतो.ही भावना माणसाकडून निश्चितच कार्य करून घेते. त्याचा मोबदला म्हणून यश पदरात टाकते. कमजोर विचारांमुळे भीती वाढते आणि स्वप्ने दूर जातात. चांगले विचार मनाला ऊर्जा देत नाहीत. माणूस फक्त विचारांच्या गर्दीत राहतो. यशस्वी लोक नेहमी आशावादी असतात. परत परत कार्य करत राहतात. स्वतःवर ठाम आत्मविश्वास ठेवतात. त्यांचे स्वतःचे मन ते मजबूत करतात. स्वतःच्या मनाला उभारी देतात. मनाला समजवतात. किती संकट आली तरी मी त्याच्याशी ठामपणे लढीन.पुढे जाईन. त्याच वाटेवर थांबणार नाही. असे विचार करावेत.मन मजबूत असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. अडचणींवर मात करता येते.

आपल्या शब्दांत आणि कृतीत आत्मविश्वास असावा. इतरांचे नकारात्मक बोलणे मनावर घेऊ नये. लोक काय बोलण्यासाठीच असतात. प्रत्येकाचे बोलणे तर मनाला लावून घेतले तर जीवन जगणे कठीण होणार आहे. त्यासाठी who care म्हणा आणि पुढे चला. एक गंमत सांगते माझं वय 55 होते. मी अमेरिकेला गेले होते.माझ्या काही स्वभावात बदल झालेला माझ्या पुतण्यांना दिसला नाही. मी अशीच कोणाला फटकन न बोलणारी, कोणावर न रागावणारी, शांत स्वभाव. माझ्या सासरच्याच काही गोष्टी अशा होत्या की त्यांनी त्या ऐकल्या तेव्हा मला म्हणाल्या “काकी आता तरी आमचे ऐक, शांत राहू नकोस. विचार बदल,ठाम पणे निर्णय घे आणि त्यांना सडेतोड उत्तर दे.किती वर्ष त्यांचे तू ऐकणार…” Who care… हा शब्द त्यांचाच.

एक सांगते… स्त्री शक्तीमध्ये प्रचंड ताकद असते. ती शांत, सहनशील, संयमी असतेच पण तिची ताकद जी आहे ती सकारात्मक विचारांची असते जसे विचार असतात तसे ती शंभर टक्के वागते. शांत राहिले म्हणजे कमजोर आहे असे नव्हे. आपण एखाद्या कमजोर व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. त्यांच्यातला आत्मविश्वास बाहेर काढावा. जर एखाद्या कृतीची,कार्याची निंदा नालस्ती केली जात असेल तर त्याला कोणीही घाबरू नये. आपण आत्मविश्वास त्यांना द्यावा. त्यांना सांगावे येथे सर्व संपले नाही तर पुन्हा संधी प्राप्त होणार आहे.परत ठामपणे पाय रोवावेत आणि आत्मविश्वासाच्या बळावर गगनी झेप घ्यावी.

यासाठी आपण ध्येय निश्चित करून मेहनत घेत राहावी. ध्येयाचा ध्यास धरावा. कार्य सिद्धीस न्यावे. संकटांना न घाबरता पुढे जावे. आलेल्या संधीचा योग्य तो वापर करून घ्यावा. कमजोर विचार नको रे बाबा, कारण मजबूत विचारच सुंदर भविष्य घडवतात. एक प्रार्थना आठवते इथे..

“तू बुद्धी दे,तेज दे,नवचेतना विश्वास दे..
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..
हरवले आभाळ ज्याचे हो तयांचा सोबती..
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी…””

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 4 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे