
पाठवणी
(मनात घर करून राहिलेल्या
दोन आठवणी पाठवणीच्या..)
होती एक अभागी ती
आली गरिबा घरी जन्माला
खाणारी तोंड फार
होती मारामार खाण्याला..
कितीही उपसले कष्ट तरी
चिंता भुकेची मिटेना
कसं सोडवावे कोडं
आई बापाला कळेना
थोरली लेक लहानच तशी
आलं बिजवराचं स्थळ
खायचे तरी मिटतील वांदे
म्हणून पसंत बापानं केलं
लागली हळद, पडल्या अक्षदा
केली लेकीची पाठवणी..
लेक जाईल निघून म्हणून
आईबापाच्या डोळा पाणी
तरी खाणार तोंड कमी होणार
याचा होता आनंद मनी..!
दुसरी अभागी जन्मा आली
लय लाडाची नी गुणी
पाठोपाठ भावंडे
झाली चारजण मिळूनी
नियतीचा तो घाला झाला
छत्र बापाचे हरवले..
आईचे निशब्द अश्रू
सारे शून्यात विरून गेले..
थोरली ने मग कसली कंबर
झाली भावंडांची आई
जमेल तसं सगळं त्यांचं
एकटीच करत राही…
शिक्षण सोडून धरली चाकरी
झाली सगळ्यांचा आधार
वय उलटले लग्नाचं तरी
केला नाही विचार
एकेक करत झाली
बहिणींचीही लग्नं
बघता बघता भावाचेही
पूर्ण झाले शिक्षण
त्याच्यासाठी ही शोधून
आणली भावजय तिनी
पण तिची मात्र
राहूनच गेली पाठवणी..!!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे



