किल्ले कोहोजगड
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
किल्ले कोहोजगड
ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील अस्तित्व टिकवून असलेल्या अनेक किल्ल्यापैकी हा एक किल्ला. वाडा पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज’ हा प्रमुख किल्ला. वाडापासून साधारण १०-११ किमी वर वसलेला हा किल्ला आहे. नाणे गावातून पुढे गेल्यावर समोरच डोंगर चढून वर कोहोज किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बऱ्यापैकी जुना असावा असे वाटते. माचीवरचे विस्तीर्ण पठार पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. माचीवर समोरच शंकराचे मंदिर आहे. त्याच्या समोरच पाण्याची दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.
मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात. काही ठिकाणी पडझड झालेली तटबंदी दिसून येते. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की, उजवीकडे वर जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. इथेच कोपऱ्यात मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यांनी वर गडमाथ्यावर जाता येते.
माथ्यावर वाऱ्याने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो. या ठिकाणी उभे राहून हवेचा पुरेपूर आनंद घेता येतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत थंडगार हवेच्या झोताने अंगावर शहारे उभे राहतात.
इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे, त्यातील राधा कृष्णाची मूर्ती मन भावून घेते. इथेच ऊभे राहून बाजूला पाहिल्यास सभोवतालचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. याच्याच पुढे थोडं खाली उतरले कि समोरच भल्या मोठ्या शिळांचा थर आहे, ते असे वाटते की कोणीतरी आपल्या हातांनी या प्रशस्त शिळा एकमेकांवर ठेवल्या आहेत. किल्ल्यावर नागनाथ लिंगी नावाचा सुळका आहे. असा हा निसर्गनिर्मित वैशिष्ट्य असलेला ‘कोहोजगड’ दुर्ग अवशेषांनी समृद्ध आहे. डोंगरी किल्ल्यात वेगळेपण जपणारा हा किल्ला आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध



