श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान… ‘सद्गुरू उज्वलानंद महाराज’
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर, बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव

श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान… ‘सद्गुरू उज्वलानंद महाराज’
“भगवंताचं नाम हे खरोखरच रामबाण औषध आहे,” असे महात्मे सांगून गेले आहेत. मानवी जीवनात सुख-दुःख, चढ-उतार, थकवा आणि तणाव यांचा मारा सतत होत असतो. अशा वेळी कोणतेही औषध शरीराला बरे करू शकेल; पण मन, बुद्धी आणि आत्मा यांना आरोग्य देणारे अमृत औषध म्हणजे भगवंताचे नाम. या नामस्मरणाची तुलना ऋषीमुन्यांनी औषधाशी केली आहे. कारण औषधाचा थेंब–थेंब शरीरात जसा जाईल तसतसे रोग नष्ट होतात; त्याचप्रमाणे नामाचा एक-एक उच्चार मनातील अज्ञान, चिंता, द्वेष, राग, लोभ यांसारखे विकार दूर करत जातो.
नामस्मरणासाठी काही विशेष वेळ किंवा ठिकाण लागत नाही. घरात, रस्त्यात, प्रवासात, शेतीत, दुकानात, आणि ऑफिसमध्येही नाम हे सतत सोबत ठेवायचे औषध आहे.
विद्वान असो किंवा अडाणी, श्रीमंत असो किंवा गरीब, या नामामृताच्या योगक्षेमात सर्वजण समान आहेत. कोणत्याही जाती-पातीचा भेद नाही. या औषधाला कोणतीही मर्यादा नाही, बंदी नाही; उलट जितके नियमित आणि जितके पथ्य पाळून नाम घेतले, तितका त्याचा गुणधर्म लवकर दिसून येतो.
याच नाममहिम्यावर विश्वास ठेवून, भक्तिभावाचा दीप उजळत ठेवून सद्गुरू उज्वलानंद महाराजांनी श्री क्षेत्र अचलबेट येथे दत्तभक्तीची प्रचीती वाढवली. महाराजांनी दीड-पाव शतकापूर्वी या पवित्र भूमीत नामसंकीर्तनाची, दत्तभक्तीची, सेवा-परंपरेची बीजे पेरली. आणि त्या बीजांचे आज एक महान वटवृक्ष तयार झाला आहे. दत्त जयंती उत्सवाची परंपरा, ५० वर्षांची उज्ज्वल यात्रा सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि कार्यकिर्दीच्या तेजाने अचलबेट देवस्थानात दत्त जयंतीचा उत्सव गेली ५० वर्षे अविरत, थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. दरवर्षी हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भाविकांच्या मनातील श्रद्धेचा नवा संचार असतो.
उत्सवाच्या कालावधीत अचलबेट परिसर दिव्य प्रकाशाने उजळतो. हरिनाम संकीर्तनाचे अखंड स्वर वातावरणात घुमत राहतात. महाप्रसाद, दत्तयात्रा, पूजन-अभिषेक, भजन-कीर्तन, गुरूसेवा यांची मंगलमय मालिका सुरू राहते. पाच लाखाच्या परिसरात राहणाऱ्या भाविकांसाठी अचलबेट हे स्थळ आशेचे, श्रद्धेचे आणि मानसिक शांततेचे केंद्र बनते. विशेष म्हणजे, दरवर्षी तब्बल पन्नास हजारांहून अधिक भाविक भारताच्या विविध राज्यांतून येथे येतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनाची ओढ असते. सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेताच मनात अलौकिक शांतता, समाधान आणि भक्तिभावाची लहर उठते. महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना अनेक भाविक आपल्या मनातील दु:ख, चिंता, समस्या यांना विसरून जातात. अनेकांना जीवनाचा नवा आशावाद तिथून मिळतो. कारण गुरूंच्या आयुष्याचा, त्यांच्या सेवाकार्यातील त्यागाचा आणि नामभक्तीवरील निष्ठेचा प्रभाव आजही समाधीस्थानी जाणवतो. नाम आणि सद्गुरूंचा संदेश दोन्हींची एकच दिशा. महाराजांनी आयुष्यभर एकच संदेश दिला, “नाम घ्या, पवित्रतेने जगा आणि दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा.” त्यांचे हे वचन आजही अचलबेट येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात जीवंत आहे. त्यांच्या कार्यामुळे अचलबेट हे पवित्र स्थान फक्त देवस्थान नाही, तर एक अध्यात्मिक विद्यापीठ बनले आहे. जिथे प्रत्येक भक्ताला सहनशीलता, प्रेम, भक्ती आणि सेवा यांचे धडे मिळतात.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर, बेडगा
ता उमरगा जिल्हा धाराशिव
=====





