कामठीत संविधान दिन उत्साहात साजरा
सविता धमगाये, प्रतिनिधी
कामठीत संविधान दिन उत्साहात साजरा
सविता धमगाये, प्रतिनिधी
नागपूर/कामठी: तब्बल पंच्याहत्तर वर्षे बघता बघता उलटली. संविधान दिनाच्या निमित्ताने परत एकदा आठवण झाली अरेच्चा आपलं एक संविधान पण आहे. ज्यावर आपल्या देशाचा कारभार चालतो. कित्येकांना संविधान म्हणजे काय हेही माहीत नाही. त्याच्यासाठी थोडा खटाटोप.
आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून स्वातंत्र मिळाल्यानंतर संविधान सभा निर्माण करून कायदा निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, अनेक प्रांत, भाषा, संस्कृती, रूढी परंपरा, पोशाख, चालीरीती यात मोठ्या प्रमाणात तफावत असलेल्या देशाची घटना लिहीणे म्हणजे साधारण काम नव्हे. पुर्ण विचारांती संविधानाच्या मसूदा लेखणाचे अवजड धनुष्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तीवर सोपविली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते धनुष्य लिलया पेललं. अनेक मान्यवरांनी, सामान्य लोकांनी एवढेच नव्हे तर स्वतः बाबासाहेबांनी अभ्यास करून विचारपूर्वक देशाचे संविधान लिहीले.
ज्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता या तीन तत्त्वांचा पुरस्कार केला गेला. समाजातील प्रत्येक घटकाला एवढेच नव्हे तर अगदी खालच्या स्तरातील व्यक्तींना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला. गेली पंच्याहत्तर वर्षे घटनेनुसार राज्यकारभार चालतो आहे. सव्वीस नोव्हेंबर एकोणविसशे एकोणपन्नास ला संविधान पुर्ण लिहून मसूदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना देशाला अर्पण केली. म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याच पाश्र्वभूमीवर खैरी, तहसील कामठी, जिल्हा नागपूर येथे संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते आयु. विश्वनाथजी बांबोळकर यांनी अतिशय सुटसुटीत, मुद्देसूद संविधान प्रास्ताविकात विश्लेषण केले. आयु. दिवाकरजी सोनटक्के, आयु. सुधीर जांभूळकर यांनी आपले विचार मांडले. आयु. धर्मराजजी आदमने ग्राम. पंचायत सदस्य. यांनी आपले प्रखर विच्र मांडले. आयु. सविता धमगाये, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांनी बोद्ध म्हणू आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर दिला. आयु. पांडूरंगजी मानकर सामाजिक कार्यकर्ते यांनी अध्यक्षीय भाषणातून समाजातील विविध समस्यांवर विचार मांडले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनुत्तर धम्म विहार समिती खैरी, तरुण उत्साही मंडळ खैरी आणि पंचशील महीला मंडळ खैरी यांनी विशेष प्रयत्न केले.



