मणिपूरमध्ये शिक्षणाचा अंकूर फुलवणारे ध्येयनिष्ठ शिक्षक – भैय्याजी काणे
लेखिका अमृता खाकुर्डीकर पुणे
मणिपूरमध्ये शिक्षणाचा अंकूर फुलवणारे ध्येयनिष्ठ शिक्षक – भैय्याजी काणे
एका समर्पित व्रतस्थाची जन्मशताब्दी
शिक्षक दिन विशेष
लेखिका अमृता खाकुर्डीकर पुणे
शिक्षक दिनानिमित्त गावोगावी शाळा शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे होत असतात; पण ईशान्य भारताच्या मणिपूर परिसरात 70 वर्षापूर्वी जिथे शाळा म्हणजे काय, हेच माहित नाही अशा प्रदेशात शाळांची स्थापना करणारे ध्येयनिष्ठ शिक्षक *शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे* या महाराष्ट्रीयन माणसाच्या समर्पित जीवनाची फारशी कुणाला माहित नसलेली एक विलक्षण सत्यकथा शिक्षक दिनी एका विशेष समारंभात सर्वांसमोर येत आहे. “पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान” ने आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात भैय्याजींचे कार्य आणि जीवनचरित्र याविषयी एक हिंदी आणि एक मराठी लघुपट प्रदर्शित होत आहे.
स्वयंप्ररणेने हाती घेतलेल्या या स्वयंप्रकाशी कार्याला कुठल्या प्रसिध्दीच्या झगमगाटाची अपेक्षा नाही. परंतु मणिपूरच्या आदिवासी जनजातींमध्ये भाषेचा अडसर दूर सारून आणि प्रतिकूल स्थितीचा सामना करीत शिक्षणाचे बीज जिद्दीने रूजवणारे भैय्याजी काणे यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने एका प्रेरणादायी जीवन प्रवास सर्वांना माहिती व्हावा, हा या लघुपटांचा उद्देश आहे.
भैय्याजींचा जन्म ६ डिसेंबर १९२४ रोजी नाशिक येथे झाला. सांगली, पुणे, नाशिक असे त्यांचे शिक्षण झाले. संस्कृत विषयात पदवीधर असलेल्या भैय्याजींनी काही काळ वायुदलात सेवा बजावली. पण मूळ पिंड शिक्षकाचा असल्याने त्यांनी पुन्हा शिक्षकी पेशा स्वीकारला. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड अशा अतिशय दुर्गम डोंगरी भागात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आणि अखेर
मणिपूर ही त्यांची कर्मभूमी निश्चित ठरली.
मुख्यतः उखरुल, चींगजिरोय, न्यू तूसोम हे भैय्याजींचे कार्यक्षेत्र होते.
दंगली आणि जाळपोळ या संदर्भात मणिपूर
हे नाव आपल्या कानावर सतत पडत असतं. पण अशी स्थिती फक्त काही विशिष्ट भागात वर्चस्वाच्या वादातून उद्भवते. भैय्याजींनी जेव्हा इथे काम सुरू केलं, तेव्हा हा प्रदेश इतका अशांत नव्हता. संपूर्ण भारतापासून काहीसा तुटल्यासारखा हा भाग एका लांबलचक आंतरराष्ट्रीय सीमारेषेने वेढलेला आहे. म्यानमार, चीन, बांगला देशच्या सीमा अगदीच लागून असल्याने तिथली भाषा, धर्म, सांस्कृती याचा फार मोठा पगडा इथल्या लोकांवर पडलेला आहे. अनुपम निसर्ग सौंदर्याची श्रीमंती असूनही गरीबी हेच इथले सामाजिक वास्तव आहे. प्रगत जगापासून खूप दूर असलेल्या या भागात निरक्षरता आणि बेरोजगारी हे पाचविला पुजले आहेत. इथल्या दुर्गम डोंगराळ भागात रस्ते व दळणवळणाची साधने निर्माण करणे, कारखाने ऊभारणे अत्यंत कठीण आहे.
भातपिकाचे शेतीक्षेत्र ठराविक असून अफूची शेती करण्याकडे कल असल्याने काही धनाढ्य लोकांचा शेतीजमिनीवर कब्जा आहे. उदरनिर्वाहासाठी काहीच साधने नसल्याने मजूरी आणि बेकायदा व्यापार हाच इथल्या सामान्यांचा रोजगार आहे. अशा स्थितीत या लोकांची उन्नती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी भैय्याजींची धारणा झाली. आपल्या प्रेमळ वागण्याबोलण्याने भैय्याजींनी इथल्या लोकांच्या मनात आपुलकीचे नाते निर्माण केले. थोड्याच दिवसात ते इथले लोकप्रिय शिक्षक होऊन गेले.
सुरवातीला छोट्या स्वरूपात सुरू असलेल्या शाळांचे आता मोठ्या ईमारतींमध्ये रूपांतर झाले आहे. इम्फाळ पासून काही अंतरावर प्रतिष्ठानची विद्यालये साधारण 75 ते 165 कि.मी.च्या परिसरात असून या शाळांमध्ये शालेय अभ्यासा इतकेच आरोग्य तसेच कला व क्रीडा यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलांची सार्वांगीण प्रगती होत आहे. त्यांना आपण भारतीय असल्याची जाणीव होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीही स्वातंत्र्यदिन साजरा न करणारे इथले स्थानिक लोक आता भैय्याजींच्या शाळांमधून साज-या होणा-या झेंडावंदन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात.
सीमेपलीकडून भारतात अवैध घुसखोरी करून मद्य , ड्रग्ज आणि बेकायदा शस्त्रास्त्रे यांच्या व्यवसायात आडकलेल्या युवकांना भैय्याजींच्या शाळांनी एका प्रामाणिक जीवनाची वाट दाखवली. ईकडच्या भाषेत *पूजनीय* या अर्थाने *ओजा* असा शब्द वापरला जातो. म्हणून मणिपूरच्या एका शाळेला “ओजाशंकर” असे नाव दिलेले आहे.
अशा या “ओजा” शंकराचा शैक्षणिक जागृतीचा विचार इथल्या स्थानिक मागास आदिवासी जनजातींना प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ शकला. भैय्याजींची भविष्यवेधी दृष्टी आणि घेतलेले कष्ट सार्थकी लागले. शैक्षणिक जागृतीच्या या सा-या प्रवासात शिक्षण आणि शाळा यांना विरोध करणा-यांनी त्यांना जिवे मारण्याचे सुध्दा प्रयत्न केले. पण इतके जिवावर बेतून सुध्दा न डगमगता भैय्थाजींनी शिक्षण प्रसाराचे हाती घेतलेले व्रत सोडले नाही. शालेय शिक्षणापलीकडे विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये शिकवणारे विधायक कार्य शिक्षक किती जिद्दीने करू शकतो,याचे भैय्याजी हे प्रत्यक्ष उदाहरण आहेत.
साने गुरूजी म्हणत असत, “शिक्षक हा सहृदयी हवा! ” भैय्याजी काणे हे असेच सहृदयी शिक्षक होते. शिक्षकदिन आणि जन्म शताब्दीवर्ष या निमित्त ध्येयनिष्ठ आदरणीय भैय्याजी काणे यांच्या पुण्य स्मृतींना शतशः विनम्र अभिवादन!
अमृता खाकुर्डीकर
कार्यकारिणी सदस्य
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान,



