Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

जरा विसावू गतकालात

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

0 4 8 2 9 0

जरा विसावू गतकालात

Old is Gold… असे आपण नेहमीच म्हणतो. अगदी जुनी गाणे ऐकताना मन प्रसन्न होते. कर्णमधुर सूर कानाला खूप गोड वाटतो. आणि विशेष म्हणजे ती गाणी अजरामर आहेत. आजही मुमताज, राजेश खन्ना, शम्मी कपूर, ऋषी कपूर, राज कपूर, गीता दत्त, मनोज कुमार, हेमामालिनी, संजय कुमार,अशा अनेक हिरो, हिरॉइनची गाणी आपल्या अजूनही स्मरणात आहेत अजरामर आहेत आणि लयबद्ध आहेत. आपोआप ती गाणे लागली की लगेच ठेका धरला जातो. तुम्ही म्हणाल विषय काय आणि मी लिहितीय काय?? बरोबर आहे हो “जरा विसावू गतकालात” या आठवणींच्या फुलोऱ्यात जुनी गाणी हे काय चाललंय.

‘ओल्ड इज गोल्ड’ मी सुरुवात केलेली आहे. यावेळी मी अगदी पाच सहा वर्षांची होते त्या वेळची दिवाळी खूप वेगळी होती. एक तर आमचे फलटण हे गाव. आम्ही फलटणमधील मलठण या भागामध्ये राहत होतो. मलठण आणि फलटणला जोडणारी नदी. चांगल्या नावाजलेल्या शाळेमध्ये मुधोजी प्राथमिक मंदिर, हायस्कूल,कॉलेज या शाळा कॉलेजमधनं माझ्या शिक्षण पूर्ण झाले. शाळा सकाळी सात वाजता असे. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागे. ही सवय आजही आहे. त्यामुळे शाळेला सुट्टी लागली पहिले सत्र संपले की दिवाळसण.

आम्ही दोघे बहिण भाऊ. पूर्वी काही पगार खूप होते असं नव्हतं. वडिलांना दोनशे रुपये पगार होता असे ते सांगत असायचे. मग या पगारामध्ये नवीन कपडे नवीन वस्तू, फटाके किती आणणार? की दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनणार? अशा कात्रीमध्ये सापडलेले माझे वडील, आहे त्या पगारामध्ये सर्व व्यवस्थित भागवायचे. कपडे आणायचे कमी किमतीचे, पदार्थ कमी करायचं, पण दिवाळी सण साजरा करायचा. फटाके पूर्वीपासून मला वाजवायला आवडत नाहीतच; परंतु फुल बाजे, लवंगी आणि टिकल्या हे मात्र घरामध्ये यायचं. प्रमाण कमी असायचं पण घरामध्ये फटाके मात्र यायचे.

आमच्याकडे किल्ले, रांगोळी स्पर्धा नगर पालिकेमधून असायची. मी रांगोळी स्पर्धेमध्ये नाव द्यायची. हे माझे आई वडील किल्ला बनवायचे. 10×10 ची एकच खोली असायची. त्यातही एक कॉट, पूर्ण संसार. पूर्वी स्टोव्ह वर स्वयंपाक असायचा. त्यात एका खोलीमध्ये आई, दादा मिळून मोठा किल्ला करायचे. किल्ला परीक्षणासाठी लोक येत असत घरी. आणि हमखास पहिल्या तीन मध्ये किल्ल्याचा नंबर असायचा. तसेच नगरपालिकेच्या रांगोळी स्पर्धा मध्ये लहान वयोगटांमध्ये माझा रांगोळी मध्ये कायम नंबर आलेला मला आठवतोय. मला मोर काढायला खूप आवडायचा आणि अजूनही मोराच्या कलाकृती मला खूप आवडतात. माझ्या प्रत्येक रांगोळीमध्ये साधारण मोराच्या आकाराचं काहीतरी असतंच आपण सर्वांनी हे पाहिलेलं आहे.

स्वयंपाक झाला की, आई मस्त दिवाळीचे पदार्थ करायला घ्यायची आणि अक्षरशः दोन दिवसांमध्ये दिवाळीचे पदार्थ करून रिकाम व्हायचे. दिवाळीच्या पदार्थांचा तो खमंग वास आला की वाटायच पटकन उचलून तो पदार्थ खावा पण त्यावेळेला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय आई कुठलाही पदार्थ खायला द्यायची नाही. कडक शिस्त होती. आणि आज मला पाच नातवंड आहेत दोन मुली आहेत. मुलगा सुनबाई आहे. पण मी कुठलीही कडक शिस्त पाळत नाही, “खाऊ दे मुलांना खाल्लं तर”, असं मी म्हणते आणि फक्त अनारसे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य म्हणून ठेवते. बाकी सर्व पदार्थ मुलांना खाण्यास देते. झाला पदार्थ देवासमोर ठेवायचा आणि मुलांना खायला द्यायचा. लहान मुलं हे देवाच रूप असतं असं मानलं जातं.

माझी आई कडक होती, म्हणून आज आम्ही घडलो हे ही तितकच खरं आहे. वडिलांच्या लेखणीचा प्रभाव माझ्यावर आहे. माझे वडील 2017 मध्ये गेले त्यावेळेला जणू त्यांनी लेखणी माझ्या हाती बहाल केली आणि त्या लेखणीचा प्रवास त्यांचा नित्य सुरू झाला असे मला वाटते. कारण 2017 नंतर मी कविता करायला शिकले. दररोजचे लेख प्रसिद्ध होतात पूर्वी वेळ मिळत होता, पण विचार कुठलेही येत नव्हते. लेखन मर्यादित होते शाळेपुरते, मैत्री पुरते. आता मात्र लेखन माझे 2017 पासून पूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे.

आज सांगायला आनंद वाटत आहे की, ‘वसुधा नाईक’ हे नाव ऐकल्यानंतर सगळेजण म्हणतात हे नाव आम्ही ऐकले आहे. या नावाशी आम्ही परिचित आहोत त्यांचे कार्य आमच्यापर्यंत पोहोचले आहे. बस महाराष्ट्रामध्ये इतका मान मिळाला आहे खूप झाले माझ्यासाठी. ” सामाजिकतेचे भान ठेवणे ” पहिल्यापासून ही शिकवण मिळत गेली त्यामुळे समाजाशी निगडीतच माझी कामे आहेत. समाजकार्यामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे. लहान मुलांचे मन घडवताना खूप आनंद होतो. अशा छोट्याशा माझ्या कार्यातून ठसा उमटत आहे. माझी मुलं सुद्धा आता सध्या याचं अनुकरण करतात. याच सामाजिक वळणावर आहेत. माझ्या सामाजिक कार्याचा वसा माझ्या मुलांनी घेतला हे खूप छान आहे. आणि हे पाहताना मन भरून येते. पुढे माझे नातवंडे सुद्धा या क्षेत्रामध्ये असतील असा मला ठाम विश्वास आहे. पतीच्या तब्येतीच्या कुरबुरी जरा चालू असतात म्हणून ते समाजामध्ये माझ्याबरोबर दिसत नाहीत. परंतु त्यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय मी सर्व करू शकत नाही. आजही, पूर्वी आपण दिवाळी कशी साजरी करत होतो हे मनात आल्याशिवाय राहत नाही.

लवकर उठणे, लवकर आवरणे, आंघोळीच्या वेळी उटण्याचा वापर, सुगंधी तेलाचा वापर, मोती साबणाचा वापर हे हमखास असायचे. आईचे आम्हाला ओवाळणे. सर्व सर्व आठवते. नव्या कपड्याची शान होती. दिवाळीचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. दर दिवसाचे महत्व आई आणि वडील समजावून सांगायचे. आज माझ्या घरात मी मुलांना असेच तयार केलेले आहे. आपोआप माझ्याकडून मुलांना गेल्यामुळे त्यांच्या मुलांपर्यंत ते पोहोचते. पण आजकाल मात्र नवे कपडे, दिवाळीचा फराळ याला जास्त महत्त्व दिसून येत नाही. कारण कुठेही फिरायला गेलो तर मुलांना जे आवडतील ते कपडे खरेदी करून दिले जातात. जो पदार्थ आवडतो तो पदार्थ विकत घेतला जातो. त्यामुळे सणाच्या दिवशी बनणारे हे पदार्थ आणि सणाच्या दिवशी नवीन कपड्यांचा आनंद आजच्या मुलांना माहित नाही. जरा माणसाकडे हल्ली पैसा आलेला आहे. आणि त्यामुळे फटाक्यांची आतीशबाजी दिसून येते. नाही पैसा खर्च होतो. थोडाशा आनंदापायी पैसा हवेत विरून जातो.

हेच पैसे आपण सामाजिक कार्यासाठी गुंतवले असता अनाथ आणि गरिबांची दिवाळी पण चांगली होईल. मुलांना याची शिकवण प्रत्येक घरातून द्यायला हवी. तरी हल्ली समाजामध्ये जागृती होत असून बऱ्याच ठिकाणी दिवाळी सण बिना फाटक्याचा साजरा केला जातो.

दीप पेटवू मांगल्याचा
समाज जागृती करूया
प्रथम स्वतः कृतीत आणूया
मग समाजाला सांगूया
आनंदाने आणि सामाजिकतेचे
भान ठेवून दिवाळी सण
आपण सर्वच साजरा करूया….!!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे