“साकंव…. कोकणी मानवी वस्त्यांना जोडणारा मोलाचा दुवा”; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे परीक्षण

“साकंव…. कोकणी मानवी वस्त्यांना जोडणारा मोलाचा दुवा”; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण
“तू येणार म्हणून, किती सोसला उन्हाळा,
ये रे ये रे पावसा.. जीव होऊ दे पावसाळा..”
आभाळात ढगांनी गर्दी करावी. आनंदात धुंद होऊन वाऱ्याने धावत सुटावं. त्याच्या गारव्यात अंग शहारून जावं. झाडांनी पाने हलवून नृत्य करावं. तेवढ्यात टपोऱ्या थेंबांनी आवेगात येऊन धरणीस बिलगावं. एकरूप होत धरणीने विरघळावं अन् तोच तो वर्षभर मनात जपलेला गंध श्वासात अलगद भरून जावा.. होय तोच मृद्गंध जपलेल्या आठवणीतला..!
‘ते थेंबसुद्धा किती लयीत कोसळतात, तर कधी अगदीच धिंगाणा घालतात’. काही थेंब आधी पर्णावर झुला घेतात नि मग धरणीवर झेपावतात. काही क्षणभर फांदीवर विसावा घेतात व अलवार ओघळतात. काही अगदी अनावर होऊन पत्र्यावर तडतडत राहतात. तर काही उनाड होऊन खुशाल चिखलात उडी घेतात. कुणाच्या डोक्यावर मिरवतात, तर कुठे पाखरांच्या पंखात विसावतात. अनुभवली असेलच त्यांची ती तऱ्हा. टपटपणारा तो थेंब.. आठवणीतला..!
‘ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात,
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात..’
हा ऋतू तसा मोहिनी घालणाराच. डोंगर साजिरे होतात. खडकांनाही पाझर फुटून धबधबे उड्या घेत धावतात. नद्या नाले खळाळतात. धरणी हिरवा शेला पांघरते. नवबीज अंकुरत मातीतून डोकावते. रानफुलेही वाऱ्यावर डोलतात. हवासुद्धा स्वच्छ, नितळ होऊन जाते. ऊनसावलीच्या खेळात आकाशाच्या पाटीवर इंद्रधनू चितारले जाते. कधी आभाळात सूर्य लपाछपी खेळतो, तर कधी ढगांच्या दुलईत निवांत विसावतो. मनभावन असा हा पाऊस.. आठवणीतला..!
‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनी रुजवा,
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा..’
पण पाऊस केवळ भारीच असतो का? अवेळी आलेला, अति झालेला, बेभान होत कोसळलेला, पुराच्या वेढ्यात गावे बुडवणारा, पूल सुद्धा सोबत वाहून नेणारा, विजांचा लखलखाट व गडगडाट करत रौद्र दर्शन घडवणारा.. अशा भितीदायक स्वरूपातीलही.. डोळ्यात पूर आणणारा असतो तो पाऊस.. आठवणीतला..! आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र म्हणजे, ‘नुकत्याच पडून गेलेल्या पावसाचे वाहणारे पाणी व त्यावर असलेला सांकव’. कोकणात आढळणारा हा लाकडी पूल म्हणजे कोकणातील मानवी वस्त्यांना जोडून ठेवणारा मोलाचा दुवाच.
पावसाळ्यात कोकणात आठ आठ दिवस विश्रांती न घेणारा पाऊस.. एकदा पडायला सुरुवात झाला, की ठिकठिकाणचे ओढे, ओहोळ भरभरून वाहतात. छोट्या छोट्या असणाऱ्या येथील वस्त्यांवरील लोकांना दळणवळणासाठी आधार असतो तो सांकवाचाच. त्यामुळे हा ‘लाकडी पूल’ पाहून देखील अनेक आठवणी जाग्या झाल्या. शाळेत जाताना हातात हात घालून साखळी तयार करून एकमेकांना सांभाळत तो ओलांडणाऱ्या मुलांचे चित्र तर समोर उभे राहिलेच. फक्त बालपणच नव्हे तर तरूणपण, फजिती झालेले व मन विदीर्ण करणारेही काही क्षण शब्दबद्ध करत विविध रचना समूहात आल्या. पाऊस, सांकव व आठवणी यांची शब्दगुंफणही मनास पावसाचा हलकासा शिडकावा करणारी व काही शब्दांमधून मनास चटका लावणारीही. आठवणींशी पावसाचे नाते जोडणारा हा सांकव मनस्पर्शीच. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे
इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक, लेखिका, कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह