“गाव गरीब नव्हतं कधीच…आपणच त्याची श्रीमंती मोजायला विसरलो”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“गाव गरीब नव्हतं कधीच…आपणच त्याची श्रीमंती मोजायला विसरलो”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
मे महिन्यातली पुण्यातली गोष्ट. सहज हापूस आंब्याचा भाव विचारला. १२०० रुपये डझन ऐकून खूप आश्चर्य वाटले जरा भूतकाळात शिरले. माझ्या आजोळी मे महिन्यामध्ये आंबे पिकवण्यासाठी भाड्याचं घर घेतलेलं असायचं. मनसोक्त आंबे खायचे कुठल्याही प्रकारचं बंधन नसायचं. काळ बदलला. आज त्या केवळ आठवणी राहिल्यात. खरे आहे हे, काही आठवणींना किंमत नसते. कारण त्या आठवणीच आपली खरी संपत्ती असतात! आज शहरात सगळं आहे, मोठमोठ्या इमारती आहेत, चकचकीत रस्ते आहेत, गाड्या आहेत, एसीची थंड हवा आहे, हातात जग सामावलेला मोबाईल आहे. पण तरीही कधी कधी मन अचानक गावाकडे धाव घेतं… का बरं?
कारण गावाकडे काहीतरी असं होतं, जे आजच्या या सगळ्या सुखसोयींत कुठेतरी हरवून गेलंय. ती श्रीमंती पैशांची नव्हती… ती होती माणसांची. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग यायची. अंगणात आईने टाकलेला सडा, तुळशीपाशी लावलेला दिवा आणि चुलीवरून उठणारा धूर. त्या धुराचा वास आजही नाकात शिरला की मन नकळत बालपणात जातं. आईच्या हातची गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, मिरचीचा ठेचा आणि ताकाचा ग्लास. आज पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही पदार्थ खाल्ले, तरी त्या जेवणाची चव काही परत मिळत नाही. कारण त्या भाकरीत आईचं प्रेम मिसळलेलं असायचं.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे तर गावातला एक वेगळाच उत्सव! दुपारच्या रणरणत्या उन्हात आंब्याच्या झाडाखाली पडलेली सावली… हातात कैरी… खिशात चिंचा… आणि मित्रांची अख्खी टोळी! कोणी विहिरीवर पोहायला जायचं, कोणी शेताच्या बांधावर धावायचं, कोणी झाडावर चढून आंबे तोडायचे… आई ओरडायची “अरे, खाली उतर!पडशील!” पण त्या ओरडण्यातही किती माया होती! संध्याकाळ झाली की गावच्या पारावर गर्दी व्हायची. आजोबा जुन्या गोष्टी सांगायचे. आजीच्या कथांमध्ये राजा असायचा, राणी असायची, राक्षस असायचा… आणि शेवटी नेहमी चांगल्याचा विजय व्हायचा. आज कळते त्या गोष्टी फक्त झोपवण्यासाठी नव्हत्या. तर त्या नकळत आयुष्य शिकवून जायच्या. तेव्हा कुणाच्या घराला कुलूप नसायचं, पण मनाला मात्र विश्वासाचं कुलूप असायचं. शेजाऱ्याच्या घरात चूल पेटली नाही तर आपल्या घरची भाकरी अर्धी व्हायची. कुणाच्या घरात लग्न असलं की संपूर्ण गावाचं लग्न असायचं आनंदाने सारं गाव जणू स्वतःच्या घरचेच आहे असं समजून रात्रंदिवस जागायचं.
कुणाच्या घरात दुःख आलं की संपूर्ण गावाची पावलं त्या दाराकडे वळायची. “तुझं-माझं” असं काही नव्हतंच. सगळं “आपलं” होतं! आज मोबाईलमध्ये शेकडो नंबर सेव्ह आहेत, पण मनापासून हाक मारावी अशी माणसं किती उरली आहेत? तेव्हा मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता. पण माणसं जोडलेली होती. आज ‘ऑनलाइन’ राहूनही माणूस एकटा आहे;तेव्हा ‘ऑफलाइन’ असूनही संपूर्ण गाव आपलं होतं.
पहिल्या पावसाच्या मातीचा तो सुगंध आज कोणत्याही महागड्या परफ्यूमपेक्षा अधिक श्रीमंत वाटतो. बैलपोळा आला की बैलांची सजावट व्हायची. त्यांच्या शिंगांना रंग, गळ्यात घुंगरं, अंगावर झूल… संपूर्ण गाव सणात न्हाऊन निघायचं. दिवाळीत पहाटेचा अभ्यंगस्नानाचा सुगंध, मकरसंक्रांतीला तिळगुळाची गोडी, नागपंचमीची लगबग, गणपतीच्या आरतीचा नाद…किती..किती सांगू.. पण…. आज सगळं आधुनिक झालं. या जुन्या दिवसांची साधेपणातली श्रीमंती मात्र कुठेतरी मागे राहिली. कधी कधी वाटतं. पुन्हा एकदा तेच बालपण मिळावं. आज माणसं मोठी झाली, घरं मोठी झाली, गरजा मोठ्या झाल्या. पण बालपण मात्र त्या गावाच्या एखाद्या जुन्या वळणावरच थांबून राहिलं.
आज गावात गेलं की काही घरं बंद दिसतात. काही अंगणं ओस पडलेली दिसतात. ज्या पारावर कधी गप्पांचा फड रंगायचा, तिथे आता शांतता असते. ज्या विहिरीवर दिवसभर हास्याचे आवाज घुमायचे, तिथे आता पाणी असतं… पण आवाज नसतात. काही चेहरे काळाच्या पडद्याआड गेले काही शहराच्या गर्दीत हरवले आणि काही आठवणी मात्र अजूनही तशाच जिवंत आहेत. म्हणूनच आज मनापासून वाटतं… ‘गाव गरीब नव्हतं कधीच…आपणच त्याची श्रीमंती मोजायला विसरलो’.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने गावाकडची ही श्रीमंती मोजण्याचे सद्भाग्य मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. आठवणींचा इतिहास पुन्हा एकदा जागा झाला आणि सर्वांनी आपापल्या परीने आपल्या आठवणींना काव्यबद्ध केले तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा. पुन्हा एकदा तेच सांगेल… चांगलं लिहायचं असेल तर वाचन वाढवा आणि आपल्या भाव विश्वासाला शब्द संपदेची जोड द्या.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



