“विरोधकांचे, नाचता येईना अंगण वाकडे” : ‘डॅा अनिल पावशेकर’
स्तंभलेखक: डॉ अनिल पावशेकर, नागपूर
“विरोधकांचे, नाचता येईना अंगण वाकडे” : ‘डॅा अनिल पावशेकर’
अगं बाई अरेच्चा….!!
स्तंभलेखक: डॉ अनिल पावशेकर, नागपूर
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निकालांनी विरोधी पक्षांत चांगलीच खळबळ माजली आहे. महायुतीच्या त्सुनामीत इंडी आघाडीचा पालापाचोळा झाल्याने विरोधक चांगलेच खवळले असून आपल्या अपयशाचे खापर त्यांनी ईव्हीएम वर फोडले आहेत. या देशावर सदासर्वदा एकाच घराण्याची तर महाराष्ट्रात आजन्म भावींची सत्ता राहिल या गोड गैरसमजुतीत राहणाऱ्यांना जनता जनार्दनाने हिसका दाखवला आहे. सत्तासुंदरी जणुकाही आपली बटीक आहे अथवा बद्री की दुल्हनीया सारखी जनता नेहमी आपल्यालाच वरमाला घालेल या भ्रमातून विरोधक काही केल्या बाहेर पडायला तयार नाहीत. मात्र सत्य हे कटू असते, मग ते तुम्हाला मान्य असो की नसो, जनादेशाचा सन्मान करायलाच हवा.
झाले काय तर, २०१४ सालापर्यंत या देशात जणुकाही सर्व आलबेल होतं. सगळीकडे सुजलाम सुफलाम होतं, बेरोजगारी नापिकी आणीबाणी कोणाच्या गावी ही नव्हते. मात्र २०१४ ला सत्तेचा अक्षांश कॅांग्रेसकडून भाजपाकडे जाताच प्रत्येक घटना आणि बाबींकडे संशयाने पाहिलं जाऊ लागले. खरेतर या देशात तंत्रज्ञान आम्हीच आणले म्हणून गळा काढणार्या कॅांग्रेसने मतदान प्रक्रियेत तंत्रज्ञान म्हणजेच ईव्हीएम मशीन वरच संशय घेणे सुरू केले. मात्र याच ईव्हीएम ने कॅांग्रेस आणि त्यांचे इंडी आघाडीतील सहकारी जिंकताच त्यांना स्वकर्त्रुत्वाचे भरते येते, दंडाच्या बेडक्या फुगवून लोकशाही जीवंत असल्याच्या जागर केल्या जातो. पण निकाल विरोधात लागला की हीच टोळधाड ईव्हीएम च्या नावाने बोटं मोडू लागतात. एवढेच नव्हे तर सरकारी दडपशाही, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलीस न्यायालयावर दबाव, सीबीआय ईडीचा गैरवापर, हिटलरशाही, लोकशाहीची हत्या, विरोधकांचा आवाज दाबणे यासारख्या बहाण्यांना ऊत येतो.
ईव्हीएम नावाच्या निर्जीव वस्तूने सजीव विरोधकांचे जरी धाबे दणाणले असले तरी ईव्हीएम मशीन कॅांग्रेस काळातच प्रसवल्या आहेत. ईव्हीएम चा उपयोग सर्वप्रथम १९८२ ला केरळच्या परावूर विधानसभा उपनिवडणुकीत झाला होता. त्यानंतर बरीच खलबते होऊन १९९८/१९९९/२००० सालापर्यंत विधानसभा, लोकसभा निवडणुकीत तुरळक वापर सुरू होता. तर २००४ पासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम चा वापर केला गेला. अर्थातच या प्रक्रियेत काळवेळेनुसार बदल, सुधारणा होत गेल्या. २०११ पासून व्हीव्हीपॅटचा वापर तर २०१९ पासून २% व्हीव्हीपॅट सत्यापीत होऊ लागल्याने शंकेला वाव नव्हता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलोर आणि इलेक्ट्रॉनिक्स कॅार्पोरेशन अॅाफ इंडिया लिमिटेड हैदराबाद द्वारे ईव्हीएम मशीन तयार केल्या जाते.
बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीएम ला बॅलेटींग युनिट (जे मतदार वापरतात) आणि कंट्रोल युनिट (ज्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते ) असे दोन युनिट असतात. हे दोन्ही युनिट वायरने आपसात जोडले असतात. ३८४० मतांची क्षमता असलेल्या या मशीन मध्ये ६४ उमेदवारांचा पर्याय राहू शकतो. २०१७ ला पहिल्या पिढीच्या ईव्हीएम मशीन बदलवण्यात आल्या असून २०२४ ला तिसऱ्या पिढीच्या ईव्हीएम मशीन वापरात येत आहेत. मतदानापुर्वी विविध पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या मशीन्सचे परिक्षण केले जाते. या मशीनमुळे एका राष्ट्रीय निवडणुकीत अंदाजे दहा हजार टन बॅलेट पेपर्सची बचत होते. वजनाला हलक्या, पोर्टेबल असल्याने सहजपणे ने आण करता येते. मतगणना झपाट्याने होते, सर्वसामान्य जनतेला सहज मतदान करता येते. याउलट बॅलेट पेपरचे मतदान, मतगणना प्रक्रिया संथ, खर्चिक, पर्यावरण प्रतिकूल असते. शिवाय बोगस मतदान किंवा मतपत्रिका पळविणे, बुथ कॅप्चरिंग सारखे प्रकार होत असतात.
राहिली बाब निवडणूक निकाल असो अथवा ईव्हीएम वर आक्षेप घेणाऱ्यांची तर पुर्वी इंदीराजींच्या काळात कॅांग्रेसचा विजय होताच विरोधक हा विजय गाईचा (कॅांग्रेस निवडणूक चिन्ह गाय वासरू), बाईचा (इंदीराजींचा) नव्हे तर शाईचा ( मतपत्रिका, बॅलेट पेपर) विजय आहे असे उपरोधिकपणे म्हणत असत. सध्याचे विरोधकही ईव्हीएम च्या नावाने थयथयाट करून आपले, आपल्या नेत्रुत्वाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी निवडणूक आयोगाने सर्वांसमक्ष ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे तमाम विरोधकांना आवाहन केले होते. मात्र तिथे सर्व विरोधकांनी दांडी मारली. कारण सर्वांसमोर त्यांचे पितळ उघडे पडले असते आणि गाढव ही गेले ब्रह्मचर्यही गेले अशी त्यांची गत झाली असती. याशिवाय वारंवार याप्रकरणी न्यायालयात जाणाऱ्या विरोधकांना खुद्द न्यायालयाने वेळोवेळी कानपिचक्या दिल्या आहेत. पण वठणीवर येतील तर ते विरोधक कसले? पेपरलेस च्या जमान्यात बॅलेट पेपरची मागणी करून विरोधक काळाचे चक्र उलटे फिरवण्याचे काम करत आहेत.
याच ईव्हीएम मशीन मुळे कॅांग्रेस, सपा, बसपा, आप आणि इतर भाजपा विरोधी पक्षांनी सत्तेची फळे चाखली आहेत. सध्या देशात काश्मिर, पंजाब, हिमाचल, तेलंगाना, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये भाजपा विरोधी पक्षांची सरकारे आहेत. उद्या चुकूनही बॅलेट पेपरवर मतदान झाले आणि भाजपा जिंकला तरी ही ईव्हीएम विरोधी टोळी तो निकाल स्वीकारणार नाही आणि परत एकदा हात वर करून अथवा आवाजी मतदानाची मागणी करतील. तिथेही भाजपा जिंकली तर आदा मादा कौन पादा करत पुन्हा एकदा खेळखंडोबा करतील. एकदा नकारात्मक राजकारण करतो म्हटले की मग तो अंतहीन मागण्याचा खेळ सुरू होतो.
आम्ही ईव्हीएम चा निकाल मानणार नाही आणि निवडणूक आयोगाने चॅलेंज केल्यावर ईव्हीएम हॅक करून दाखवणार नाही. जिंकलो की जल्लोष, हरलो की रडारड करणार. म्हणजे चीत भी मेरी पट भी मेरी. विरोधकांच्या याच दुटप्पी भूमिकेमुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. सोबतच निवडणूक प्रक्रिया राबवणार्या निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणेवर अविश्वास दाखवला जातो. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात, अवाढव्य लोकसंख्येला सामावून घेत , विविध भौगोलिक वातावरणाचे आव्हान स्वीकारून, शांततेने आणि सुरळीतपणे निवडणूक आयोग ही तारेवरची कसरत पार पाडत आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानने तर दूरच. उलट ही मंडळी ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत अराजकता, भ्रम पसरवत आहे. तरीही निवडणूक आयोग सुरक्षेसाठी प्रचंड फौजफाटा, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यांच्यासह लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी, मतदान सुरळीत शांततेत होण्यासाठी झटत आहे याचे कौतुक करायला हवे.
लोकसभेला भाजपची पिछेहाट झाली, काश्मिर, झारखंडमध्ये विरोधक जिंकले तर हरियाणा महाराष्ट्रात कमळ फुलले. यामुळेच विरोधकांच्या कोल्हेकुईत तथ्य नाही. नाचता (जिंकता) येईना अंगण (ईव्हीएम) वाकडे सारखा हा प्रकार आहे. जनतेने संधी देताच लुटमार करून संधीचे मातेरे करायचे, भ्रष्टाचार, जातीपातीचे गलिच्छ राजकारण करायचे, आरक्षण संविधाना वरून जनतेत फेक नॅरेटीव्ह पसरवायचे, विकासकामात तंगडे अटकवायचे यामुळे जनतेने यांच्या कडे पाठ फिरवली आहे. एवढे होऊनही आत्मचिंतन, पराभवाचे विश्लेषण, विवेचन न करता हा कंपू ईव्हीएम ला दोष देण्यात धन्यता मानत आहे. एकवेळ झोपी गेलेल्यांना उठवणे सोपे असते परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्यांना, ईव्हीएम विरोधकांना उठवणे केवळ आणि केवळ अशक्य असते. फारतर ईव्हीएम विरोधकांना आपण एवढेच म्हणू शकतो,,,
“उम्रभर गालीब यहीं गलती करता रहा”
“धूंल चेहरे पर थी और वो आईंना साफ करता रहा”
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com



