‘ह्याच’ गडासाठी संकटात छातीची ढाल करणारा लढवय्या नरवीर ‘सिंह’: स्वाती मराडे
गुरुवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘ह्याच’ गडासाठी संकटात छातीची ढाल करणारा लढवय्या नरवीर ‘सिंह’: स्वाती मराडे
गुरुवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
माझ्या मुलांना मी कधी कधी विचारते तुम्हाला कोणता इतिहास आवडतो? त्यांचं नेहमी एकच उत्तर असतं. इयत्ता चौथीमधील ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा.’ आम्ही त्यानंतर बराच इतिहास शिकलो, अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहिले, नवनवीन इतिहास माहित झाला, ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या पण मनावर गारूड केलंय ते शिवरायांच्या इतिहासानेच. इतकी स्वामिनिष्ठ असणारी माणसं, राजासाठी प्राण पणाला लावणारी माणसं.. दुसऱ्या कुठल्याच इतिहासात आढळणार नाहीत.. आणि ही माणसंही राजासाठी का बरं जिवाची बाजी लावणार नाहीत? हा राजा त्यांना कधी सैन्यातील एखादा मोहरा समजतच नसे ज्यांचा कधीही केव्हाही वाटेल तसा वापर करावा व नंतर नजरेआड करावा.. या राजाने नेहमीच या सगळ्यांना आपल्या साथीदारांचा दर्जा दिला.. साथीदार, दोस्त, सवंगडी, मित्र. कसा असतो मित्र ? सुखात मागे आणि संकटात छातीची ढाल करून पुढे. शिवरायांचे चातुर्य, शिवरायांची दूरदृष्टी याला साथ लाभली ती निधड्या छातीच्या अनेक स्वामिनिष्ठ मावळ्यांची.. नव्हे खऱ्याखुऱ्या साथीदारांची. याच पायावर उभे राहिले स्वराज्य.
शिवरायांच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. हे आठवताना स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून स्वतः युद्धमोहिमेवर सरसावणारा तानाजी आठवतोच आठवतो. ‘आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं!’ असं म्हणत युद्धावर निघतो. मी असताना माझा राजा युद्धावर जाणार? हा प्रश्नच बेचैन करून गेला असेल. खरोखरच हीच निष्ठा, हेच धाडस, राजावरून जीव ओवाळून टाकण्यासही तयार असणे.. यासाठीही पराक्रमी सिंहाचंच काळीज लागतं. “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत रहायला पाहिजे”, हेच मनात कोरून जिद्दीने लढाई लढली अन् फत्ते शिकस्त केली… स्वराज्यासाठी प्राणार्पण करून.
‘सुभेदार तानाजींनी मोठ्ठा पराक्रम केला जी.. राजं कोंढाणा किल्ला घेतला.. पण..!’ ‘पण.. पण काय? माझे सगळे साथीदार सुखरूप तर आहेत ना ?’ ‘राजं सुभेदार तानाजींनी किल्ला घेता घेता प्राणांची बाजी लावली. गड आला पण…! ‘ निःश्वास सोडत शिवराय उद्गारले.. ‘गड आला पण सिंह गेला.. माझा तान्हा गेला.. माझा सिंह गेला..!’
कौंडिण्य ऋषींचे पूर्वी वास्तव्य असलेला किल्ला म्हणून ‘कोंढाणा.’ सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या सिंहासारख्या पराक्रमाची साक्ष देण्यासाठी ‘सिंहगड’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पुण्याच्या नैऋत्येस असणारा हा किल्ला या पराक्रमाची साक्ष देत अनेक दुर्गप्रेमींना साद घालतो. केवळ किल्ल्यावर गेले तरी मन अभिमानाने भरून येते. ज्या मातीत वीरांचे रक्त सांडले त्या मातीस स्पर्श करून अंगावर रोमांच उभा राहतो, नि तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासमोर मन नतमस्तक होते.
आज ‘गुरुवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी सिंहगड किल्ल्यावरील माचीचे चित्र आले नि तानाजी मालुसरेंचा पराक्रम मन: पटलावर उमटला. गड आला पण.. हे शब्द वाचताच किंवा ऐकताच पुढे ‘सिंह गेला’ हे आपसूकच ओठांवर उमटतं. या ऐतिहासिक पराक्रमाने चित्रपट क्षेत्रालाही आकर्षित केले. मग आमचे ‘मराठीचे शिलेदार’ तरी यात मागे कसे राहतील. इतिहास नजरेसमोर घेत अनेक भावस्पर्शी व स्फूर्तिदायक रचना आल्या. आजचे चित्र पाहून आपोआपच ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या पराक्रमास नमन करण्यासाठी लेखण्या सरसावल्या. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे आटोळे
मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



