मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभारीय शब्दसुमनांजली; अनिता व्यवहारे
सौ. अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर सदस्या मराठीचे शिलेदार समूह

‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभारीय शब्दसुमनांजली; अनिता व्यवहारे
आज मन अक्षरशः आनंदाच्या दरवळाने भरून आले आहे. एक कविता स्पर्धेत पहिल्या दहात, तर दुसरी सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवली गेली. ही माझ्यासाठी केवळ यशाची नव्हे; तर विश्वासाची पावती आहे. कारण गेल्या सहा महिन्यापासून माझ्या कल्पना कुठेतरी थांबल्या होत्या. आणि काव्यासाठीचे शब्द हरविले होते. पण या यशामुळे आज पुन्हा प्रोत्साहन मिळालं.
‘दिल्या घरी सुखी रहा’ या कवितेतून आईच्या हृदयातील कोमल आशीर्वाद शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला, तर ‘ नीतिमत्ता’ मधून समाजातील बदलत्या मूल्यांवर अंतर्मुख होऊन विचार मांडले. एकीकडे मायेची शिदोरी, तर दुसरीकडे तत्त्वांची जाणीव. या दोन भिन्न भावविश्वांना आपण सर्वांनी उचलून धरले. याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
“मराठीचे शिलेदार” समूहात दररोज रात्री विषय जाहीर होतो आणि आम्ही सर्व साहित्यिक जणू मधमाश्यांसारखे कल्पनांचे परागकण गोळा करून शब्दांचा मध तयार करतो. त्या मधाला जेव्हा सर्वोत्कृष्टतेची गोडी लाभते, तेव्हा ती केवळ माझी नव्हे तर संपूर्ण समूहाची कमाई असते. या यशाचे खरे मानकरी आपले समूहाचे मुकुटमणी मा. राहुल दादा, कोहिनूर हिरा सविताताई, तेजस्वी तारा तारका ताई, ओजस्वी मोती स्वाती ताई, विचारसूर्य विष्णू दादा, लखलखत्या तारांगणातील हिरा प्रशांत सर, सळसळत्या विचार धारा असलेले संग्राम दादा आणि माझ्यावर सदैव प्रेम, आदर व कौतुकाचा वर्षाव करणारे सर्व दादा-ताई आपल्या प्रोत्साहनामुळेच माझ्या लेखणीला धार आली. शब्दांना अर्थ लाभला आणि साहित्यसेवेची ओढ अधिकच वाढली.
शब्द जुळवीत जुळवीत कविता घडत गेली,
कौतुकाच्या स्पर्शाने लेखणी अधिक सजत गेली.
एक यश प्रेरणा देतं पुढचं पाऊल टाकायला,
आशीर्वाद असू द्या असेच सदैव सोबत राहायला
ही दुहेरी आनंदवार्ता आपणा सर्वांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
सौ. अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह



