Breaking
अमरावतीआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनसाहित्यगंध

बळीराजाची दिवाळी आणि वास्तव

गजवंती सुभाष विघ्ने बडनेरा, जिल्हा अमरावती

0 6 3 8 3 5

बळीराजाची दिवाळी आणि वास्तव

अगदी काल परवाची गोष्ट आहे. इन्स्टावरती एक दोन मिनिटांची एक पोस्ट होती. त्यामध्ये दिसणारी कष्टकरी महिला कडेवरती बाळ घेऊन ती आपल्याला प्रश्न विचारते, “चिलचिलाती धूप मे हम काम करते है, पसीने से लतफथ हो जाते है, फिरभी हमे तुम कहती हो, तुम गवार हो तुमको कुछ समझता नही, हमे अंग्रेजी नही आती, यह क्या हमारा गुनाह है? हमारे किचड भरे पैर देखकर तुम्हे घिन आती है? जरा सोचो अगर हम खेती मे काम नही करते, तो तुम जो अच्छा खाना खाती हो क्या तुम्हे मिल पाता”? तिचे हे वाक्य माझ्या मेंदूमध्ये झिणझिण्या आणणारे होते, किती खरे होते तिचे म्हणणे..!

खरंच शेतीमध्ये काबाडकष्ट करून शेतकरी, कामकरी आपल्याला खाऊ घालतात, त्यांच्याच भरोशावर आपण बिनधास्तपणे अन्न धान्याची चिंता करत नाही. कधी त्यांच्या श्रमाची जाणीवही आपल्या मनाला होत नाही, असे नाही की आपल्याला ते कळत नाही; तरीपण आपल्याला काय त्यांचे देणे घेणे हीच विचारसरणी असते सर्वसामान्यांची. धान्य बाजारातून घेऊन येणे इतकेच काय ते आपल्याला ठाऊक.

शेतकरी त्यांच्या शेतात राबतो मोठ्या अपेक्षेने. बी, बियाणे पेरणी करून निसर्गाच्या बदलांकडे पाहत चिंता करत राहतो. कधी पेरणी झाल्यावर खूप पाऊस येतो, तर कधी अजिबात येत नाही. दुबार पेरणीही वाया जाते मग अशावेळी प्रश्न पडतो शेतकऱ्यांनी करायचं काय? एकर, दोन एकर शेती असणाऱ्यांची तर फारच परवड होते. सावकाराकडून कर्ज घे, बँकांकडून कर्ज घे आणि कर्ज फेड झाली नाही की कर आत्महत्या. अर्थात या आत्महत्या नुसत्याच शेतीच्या कारणामुळे होत नाही तर त्या अंतर्गत, बाह्य वादामुळे, कलहामुळेही होत असतात. पण तरीही आपण वर्तमानपत्रात वाचतो की, शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली. हा भाग सोडला तरीही शेतकऱ्यांचे दारिद्र्य ठळक नजरेत भरते. मुलांमुलींचे लग्न, इतर कार्य शेतीच्या भरोशावर होत नाही, तरीही तो इकडून तिकडून गाठीला पैसा उभा करतो.

सरकारी नियोजनही व्यवस्थित नसते. सुरुवातीला नेतेमंडळी उदाहरणादाखल काही शेतात जाऊन शेतीचे हाल पाहून घेतात, सगळीकडे हीच परिस्थिती आहे हे माहित झाल्यावरही शेतकऱ्यांना किती पैसा द्यावा यासाठी ही बराच काळ जातो. शेतकरी आपल्या खात्यात काही पैसे येतील म्हणून वाट पाहतो. नुकतेच सरकारने जाहीर केले आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये प्रमाणे जमा करणार. या पाच हजारात तो काय करेल तेही कळत नाही? पण सरकार म्हणते त्यासाठी वीस हजार कोटी कर्जाचा भार शासन उचलणार आहे. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकर जमा होत नाही, कधी कधी किती शेतकरी काही त्रुटींमुळे पैसे जमा न झाल्यामुळे बँकेत येरझरा मारत असतात. खरंच किती ही तगमग, किती जीवाला त्रास.

हवामान बदलामुळे शेतीमध्ये कोणते उत्पन्न घ्यायचे याचे काही शेतकऱ्यांना प्रशिक्षण नसते. फक्त जाहीरपणे सांगून काही तज्ञ मोकळे होतात. शेतकऱ्यांनी या या पिकांची पेरणी करावी किंवा ही पिकं घ्यावीत. शेतमालाला योग्य भाव दिला तर त्यांच्या पेरणीचा, काढणीचा आणि इतर खर्च निघेल. त्यांच्या पदरात काही पडत असेल तर ते टिकतील. प्रत्येक वर्षी ते कर्जही काढणार नाहीत, (अर्थात काही शेतकरी दर वर्षी कर्ज काढतात व काही पीक झाले नाही तर सरकार माफ करेल याची वाट पाहतात हे जरी सत्य असले तरी प्रत्येक शेतकरी मात्र असे करत नाही) त्याचे जीवनमान उंचावेल तसंही आज-काल थोडीफार शेती असल्यामुळे शेतकरी काही श्रीमंत होऊ शकत नाही. पण त्याने पुन्हा दरवर्षी उत्साहाने पिकं घ्यावीत इतपत नफा त्याला मिळाला तर तो उत्साहाने हे सर्व काही करेल, त्याचा फायदा सर्वांनाच होईल.

परंतु आपण पाहतो शेतकऱ्यांचा माल घेऊन व्यापारीचं अधिक गब्बर झाले आहेत. ही सगळी वास्तविकता शासनालाही माहित आहे. त्यासाठी तरी शासन काही पाऊले उचलते का ? हा प्रश्नच आहे. जोपर्यंत भांडवलशाहीला सरकार नियंत्रित करत नाही; तोपर्यंत हे चालायचंच. आज तर सगळं काही खाजगीकरण करण्यातचं सरकार व्यस्त आहे, परंतु याची झळ मात्र सर्वसामान्यांनाच बसते. निवडणूक आयोगही शासनाच्या इशाऱ्यावर चालते, त्यामुळे लोकशाही मजबूत नाही, सत्ता बदल हा पाच किंवा दहा वर्षांनी झालाच पाहिजे. तरीपण सत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करून आपली सत्ता कशी येईल हेच वास्तव चित्र आज दिसत आहे.

सांगायला गेलं तर भरपूर काही आहे, पण आपण शेतकऱ्यांवर भाष्य करत आहोत, त्यांच्यासाठी तरी सरकारने महत्त्वाची पाऊले उचलावीत हीच आजची खरी गरज आहे. आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे कष्टकरी, कामकरी, शेतमजूरांशी आस्थेने, जिव्हाळ्याने वागले पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतकरी होण्याचा अभिमान वाटला पाहिजे. नुसत्याच ‘जय जवान जय किसान ‘अशा गप्पा मारून चालत नाही, तर त्या वास्तवातही उतरल्या पाहिजे. समाजाला त्याची जाणीव झाली पाहिजे हेही महत्त्वाचंच.

लेखन थांबवण्यापूर्वी मला हे ही सांगावेसे वाटते की, ज्याप्रमाणे ‘पोलंड’ या छोट्याशा देशांमध्ये दारिद्र्य निवारणाच्या अनेक युक्त्या केल्या जातात, त्या जर आपल्या भारतासारख्या अफाट देशात नियोजनपूर्वक स्थानिक समाजसेवी संस्थांमार्फत राबविल्या गेल्या तर काही अंशी तरी दारिद्र्य निवारण होऊ शकते. पोलंडमध्ये अन्न वाया जाऊ नये म्हणून हॉटेल्स मध्ये रात्रीला जे जास्तीचे पदार्थ उरतात त्यासाठी हॉटेल जवळच असे अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करून ठेवले जातात किंवा फ्रीजमध्ये ठेवतात. गरजवंत येऊन ते घेऊन जातात, आहे ना किती उपयोगाचे. दुसरं म्हणजे याहूनही कौतुक वाटण्याजोगं ज्या पदार्थांची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे असे पदार्थ मॉल बाहेर फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात आणि गंमत म्हणजे ते रात्रीपर्यंत संपायला येतात.

आता तुम्ही म्हणाल अहो ताई.. हा भारत आहे इथे कुठे शक्य आहे, हे मलाही माहित आहे. गर्दी होईल, गडबड होईल आणि नको तो अनर्थ होईल. मग सर्वांना वाटेल नको तो उपद्व्याप, बरोबर आहे. पण जसे मॉल बाहेर चेकिंगला स्टाफ असतो तसे जर एक दोन लोकं ठेवून किंवा पाहिजे त्या प्रमाणात स्टाफ ठेवून आणि मग, अमुक अमुक समाप्त झाले असा बोर्ड लावून ठेवला तर गर्दी होणार नाही आणि लोकांना याची सवय झाल्यावर आपोआप ही योजना सफल होईल असे वाटते.

हॉटेल्स, मॉल वाल्यांनी जर हे लक्षात घेतलं आणि स्वयंसेवी संस्थांची साथ असली तर मात्र असे प्रयोग इथे शक्य आहेत. तुम्हाला काय वाटते? दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण, दिव्यांचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो, या मंगलमय पर्वावर सगळ्यांचे दुःख कमी होवो त्यांच्या चिंता कमी व्हाव्यात. निरामय आरोग्य आणि सुख समृद्धी प्रत्येक घरी नांदो. दीपावलीच्या या मंगलमय दिव्यांनी त्यांचे मन उजळो. दीपावलीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा..!!

गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा, जिल्हा अमरावती
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 8 3 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे