Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

पर्यटनातील ऐतिहासिक ठेवा ‘अजिंठा’

सौ. स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 2 8 6

पर्यटनातील ऐतिहासिक ठेवा ‘अजिंठा’

छत्रपती संभाजीनगरपासून साधारण १०० किमी अंतरावर अजिंठा लेणी ही भारताची आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे.
अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो.

या लेण्यांमधून वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना चित्र-शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देतात. अजिंठा निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे या लेण्यांची निर्मिती केलेली आहे. या लेण्यांमधील भिंती आणि छतांवरील चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील शिल्पे जगभरात मान्यता पावली आहेत. चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या मानवी भावभावना हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान अशा दोन संप्रदायांचे तत्त्वज्ञान अजिंठा लेण्यात पाहायला मिळते. दुसरे शतक ते चौथे शतक अशा कालावधीत येथे एकूण २९ लेणी कोरलेली आढळतात.

लेणी एकमध्ये वीस खांबांवर आधारित एक दालन आहे. या खांबांवर सुंदर नक्षीकाम आहे. भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा येथील चित्रांत दिसून येतात. बुद्धाच्या विविध प्रकारच्या मुद्रा, पद्मपाणी, दरबार दृश्य, पक्षी, फुले, फळे यांचे छतांवरील अंकन या लेण्यात पहायला मिळते. लेणी दोनमध्ये बुद्धांची आई महामाया आपले स्वप्न पती राजा शुद्धोधनास सांगत आहे.

लेणी चार हे सर्वात मोठे लेणे आहे. यामध्ये २८ खांब असून दरवाजावर द्वारपालांची जोडी आहे. आतमध्ये बुद्धांच्या सहा मोठ्या मूर्ती आहेत. पाचवे लेणे अपूर्णावस्थेत आहे. बुद्धांच्या काही आकृत्या येथे कोरलेल्या आहेत. सहावे लेणे दोन मजली असून सभागृहात बुद्धांची पद्मासन मुद्रेतील मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर मगरींचे व फुलांचे अर्धागोलाकार आर्य बनवलेले आहे. सातव्या लेण्यात आसनस्थ बुद्धाची मूर्ती आणि त्यामागील भिंतीवर प्रभामंडळ कोरलेली आहे. लेणी नऊमध्ये चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे. दहावे लेण्यात ४० खांब असून त्यावर सुंदर कोरीव कामे केलेली आहेत. लेणी क्रमांक अकराचा सभामंडप मोठा आहे. सभामंडपात पूजास्थानी बुद्धाची मूर्ती आहे.

सोळाव्या लेण्यात चित्ररूपात बुद्धाच्या जीवनातील घटना, कथकली नृत्य दाखविण्यात आले आहेत. आतमध्ये बुद्धांची भव्य मूर्ती आहे. तसेच मुद्रा, हत्ती, घोडे, मगर यांचीही चित्रे येथे कोरलेली आहेत. लेणी सतरामध्ये बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत. भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेण्यात आहे. येथील छतावर परीकथा चित्रित केल्या आहेत. लेणी १९ घोड्याच्या नालेच्या आकाराचा विहार आहे. लेणी २१ व २२‌ अंशतः अपूर्ण असले तरी या विहारात नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत. शिष्यांना प्रवचन देणारे बुद्ध, समृद्धीची देवता हरिती, तिचे सेवक, सर्पराज नागाचा दरबार अशी शिल्पे येथे दिसून येतात.

लेणे क्र.२३ क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे लेणे मोठे आहे. लेणे २९ ची भव्यता आणि कलात्मकता वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. जलदेवता, नागराज, द्वारपाल अशी शिल्पे येथे दिसून येतात. विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटरपर्यंत आहेत. हे विहार मुख्यत्वे भिक्खूंना राहण्यासाठी होते, तर चैत्यगृहे सुद्धा पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे