आठवणीतलं पुस्तक : ‘You Can Win’
अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर

आठवणीतलं पुस्तक : ‘You Can Win’
काही पुस्तके वाचून संपत नाहीत. ती जगताना पुन्हा पुन्हा आठवत राहतात! आयुष्याच्या वाटेवर अनेक माणसे भेटतात, अनेक अनुभव गाठीशी जमा होतात आणि असंख्य पुस्तके आपल्या हातून वाचली जातात. पण त्यातील काही पुस्तके मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमची जागा करून बसतात. प्रसंग कोणताही असो, मन कधी खचले असो किंवा निर्णय घेताना संभ्रम निर्माण झाला असो,
त्यातील एखादा विचार अचानक आठवतो आणि पुन्हा एकदा जगण्याची उमेद देतो.
शिव खेरा लिखित ‘You Can Win’ हे माझ्यासाठी असेच एक पुस्तक आहे. हे पुस्तक केवळ यश कसे मिळवावे याचे मार्गदर्शन करत नाही, तर यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. सकारात्मक विचार, आत्मविश्वास, योग्य नियोजन, कृतज्ञता, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी किती साध्या पद्धतीने आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, हे पुस्तकातून जाणवते. हे पुस्तक एकदा वाचून कपाटात ठेवून द्यावे असे मला कधीच वाटले नाही. उलट, आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर ते पुन्हा हातात घ्यावेसे वाटते. कारण प्रत्येक वेळी त्यातील एखादा नवा विचार आपल्याशी संवाद साधतो.
आपण अनेकदा दुसऱ्याने आपल्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करतो; पण आपण मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवताना संकोचतो. या पुस्तकाने मला शिकवले की विश्वास हा एकतर्फी व्यवहार नसतो. आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवला, तरच जग आपल्यावर विश्वास ठेवायला शिकते. ‘यश म्हणजे एखादे ठराविक ठिकाण गाठून थांबणे नव्हे, तर तो सतत सुरू असलेला प्रवास आहे’. त्या प्रवासात परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, आव्हाने बदलतात; पण आपला आत्मविश्वास टिकून राहिला, तर आपण पुन्हा उभे राहू शकतो.
म्हणूनच नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मकतेची निवड करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुस्तक वारंवार अधोरेखित करते. एखादी अडचण आली की ‘हे माझ्याच बाबतीत का?’ असा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा ‘यातून मी काय शिकू शकते?’ असा प्रश्न स्वतःला विचारला, तर परिस्थितीकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलतो. आपल्या जीवनातील एक मोठा शत्रू म्हणजे टाळाटाळ. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ हा साधा विचार किती मोठा जीवनमंत्र ठरू शकतो, हे मला या पुस्तकामुळे प्रकर्षाने जाणवले. आजचे काम उद्यावर ढकलत राहिलो की कामाचा डोंगर वाढत जातो आणि त्याबरोबर मानसिक ताणही वाढतो. वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य काम करणे, ही यशाची एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे.
तसेच कृतज्ञता हा माझ्या मनाला भिडलेला पुस्तकातील आणखी एक विचार. आपल्याकडे काय नाही, याची यादी करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानता आले, तर समाधानाचा खरा अर्थ समजतो. शिकण्यालाही वय नसते. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, जिथून आणि जे चांगले शिकता येईल ते शिकत राहिले पाहिजे. ज्ञान आपल्याला केवळ समृद्ध करत नाही, तर आपले आत्ममूल्य आणि आत्मविश्वासही वाढवते.
या पुस्तकाने मला स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःचा आदर करायला शिकवले. आपण स्वतःलाच कमी लेखत राहिलो, तर इतरांकडून सन्मानाची अपेक्षा कशी करणार? त्याचबरोबर नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींपासूनही शक्य तितके अंतर ठेवावे. कारण काही माणसे आपल्या आयुष्यात प्रकाश आणतात, तर काही नकळत आपली ऊर्जा कमी करत राहतात. वेळेचे नियोजन हा पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा धडा. दिवसभरातील महत्त्वाची कामे ओळखून त्यांना प्राधान्य देणे आणि आवश्यक ते काम आधी पूर्ण करणे ही सवय जीवनाला शिस्त देते. ‘नंतर करू’ म्हणत राहिल्याने अनेकदा पश्चात्तापाची वेळ येते.
“अपनी कमजोरियों को अपनी ताकत में बदलो और देखो अपने कर्तृत्व का कमाल”! ही ओळ मला विशेष भावते. कारण आयुष्यात प्रत्येकाकडे काही ना काही कमतरता असतात. पण त्याच कमतरता आपली ताकद बनवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या कर्तृत्वाला नवी दिशा मिळू शकते. मी स्वतः या पुस्तकातून खूप काही शिकले आहे. आयुष्यात अनेकदा अपयशाचे प्रसंग आले. काही वेळा परिस्थिती मनासारखी घडली नाही, काही निर्णय कठीण होते. पण अशा वेळी ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’ हा विचार मला पुन्हा उभे राहण्याची ताकद देत राहिला.
आज मागे वळून पाहताना जाणवते की, काही पुस्तके आपल्याला माहिती देतात, काही ज्ञान देतात; पण एखादे पुस्तक आपल्याला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवते, तेव्हा ते पुस्तक ‘आठवणीतले’ न राहता ‘आयुष्याचा एक भाग’ बनते.
माझ्यासाठी ‘You Can Win’ हे असेच पुस्तक आहे.
परिस्थिती कितीही कठीण असो, मनातला विश्वास हरवू नये. कारण बाहेरची लढाई जिंकण्याआधी आपल्याला ती मनात जिंकावी लागते. आणि म्हणूनच आजही हे पुस्तक मला सांगत राहते, “तुम्ही जिंकू शकता” फक्त सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिका!’
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर



