Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनधाराशिवनागपूरपरीक्षण लेखमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

रायगडावरील संवाद…..!!

कु. धनश्री माशाळकर जिल्हा धाराशिव

0 4 8 2 8 4

रायगडावरील संवाद…..!!

रायगडाला भेट देणं हे माझं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं. आयुष्यात किमान एकदा तरी रायगड पाहायचाच, अशी मनात खोलवर इच्छा होती. केवळ एक किल्ला म्हणून नाही, तर महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी. पुस्तके वाचताना, भाषणे ऐकताना ज्या रायगडाचा उल्लेख येतो, तो प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता। मनात होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडलं, की मनात नेमकं काय होतं हे सांगणं कठीण आहे. डोळे आपोआप पाणावतात, अभिमान वाटतो आणि या पवित्र भूमीत जन्माला आलो, याबद्दल कृतज्ञतेची भावना मन भरून आणते. म्हणूनच यावर्षी रायगडाला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो योग जुळून आला, याला मी माझं भाग्यच मानते.

रायगडाच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर वेगळीच भावना मनात दाटून आली. समोर उभा असलेला किल्ला पाहताना वाटलं, इथे केवळ दगड नाहीत, इथे इतिहास श्वास घेतो आहे. पायऱ्या चढताना शरीर थकत होतं, पण मन मात्र अधिकच स्थिर आणि एकाग्र होत गेलं. प्रत्येक पाऊल जणू त्या काळात घेऊन जात होतं. आम्ही सकाळी पाच वाजता गड चढायला सुरुवात केली. पहाटेची शांतता, थंड हवा आणि समोर उभा असलेला रायगड, सगळंच भारावून टाकणारं होतं. साधारण दोन तासांत गडावर पोहोचलो. चढाई करताना मनात सतत एकच शब्द घोळत होता, “महाराज… महाराज…” भावना इतक्या तीव्र होत्या की, विश्वास बसत नव्हता, मी खरंच त्या भूमीवर उभी आहे का, जिथे महाराजांचे पावलं पडली होती?

महादरवाज्याला नतमस्तक होऊन पुढे चालायला सुरुवात केली. शिर्काई देवीचं मंदिर, तलाव, विजयस्तंभ, राणीमहाल, राजवाडा,.. प्रत्येक स्थळ पाहताना इतिहास डोळ्यांसमोर जिवंत होत होता. रायगडावरून दिसणारा निसर्ग मनाला थांबवून ठेवणारा होता. सह्याद्रीच्या रांगा, वाहणारा वारा आणि आकाशाशी संवाद साधणारा किल्ला, या सगळ्यात एक प्रकारची शुद्धता जाणवली. हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो अंतर्मनाशी संवाद साधणारा होता. पण मनाला माहीत होतं, की दिवसातील सर्वात महत्त्वाचा क्षण अजून यायचा आहे. जगदीश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे गेलो. तिथे पोहोचल्यावर मी शांतपणे जमिनीवर बसले. डोळे मिटले. दोन्ही तळहात त्या मातीवर ठेवले. आणि त्या क्षणी काहीतरी घडलं. दिवसभर ज्या भावनांची अपेक्षा होती, त्या सगळ्या एकाच वेळी उफाळून आल्या. डोळ्यांत अश्रू दाटले. शब्द नव्हते, पण एक खोल जाणीव होती,जणू एक अदृश्य नातं त्या मातीशी, त्या महान व्यक्तिमत्त्वाशी जोडले गेलं होतं. मनातल्या मनात मी महाराजांशी संवाद साधला. एकच वाक्य स्पष्ट होतं,“मी माझ्या आयुष्यात कधीही हार मानणार नाही.”

रायगडावरून परतताना असं वाटत होतं, की मी फक्त एक किल्ला पाहून आले नाही. मी स्वतःला थोडं अधिक ओळखून आले. रायगड ही केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तो आजही आपल्याला धैर्य, निष्ठा आणि आत्मविश्वास शिकवतो. आणि म्हणूनच रायगड हा माझ्यासाठी एक अनुभव आहे, आयुष्यभर मनात जपून ठेवण्यासारखा.

कु. धनश्री माशाळकर
जिल्हा धाराशिव
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे